श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १९ वा

गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात, एकदा गोपाळ खेळांमध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदात जंगलात शिरली. त्यांची गुरे एका वनातून दुसर्‍या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकूळ झाली आणि हंबरत हंबरत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरली. श्रीकृष्ण, बलराम आदि गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही, तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या उपजीविकेचे साधनच नाहीसे झाल्याने ते बेचैन झाले. नंतर त्यांनी गाईंच्या पावलांनी तुडवलेले व दातांनी ओरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुणांच्या आधारे, त्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले. जाता जाता त्यांना आढळले की, त्यांची गुरे मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा फोडीत आहेत. तेव्हा त्यांना त्यांनी तेथून वळवले. त्यावेळी ते अतिशय थकले होते. शिवाय त्यांना फार तहानसुद्धा लागली होती. भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघगंभीर वाणीने, गाईंना नावांनी हाका मारू लागले. आपल्या नावाचा आवाज ऐकताच गाई अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या. (१-६)

तेवढ्यात त्या वनाला सगळीकडे अचानक, जी वनवासी जीवांचा काळच अशी आग लागली. त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळांनी चराचराला भस्मसात करू लागली. जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिले की, वणवा चारी बाजूनी आपल्याकडेच येत आहे, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले; आणि मृत्यूच्या भयाने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात, त्याचप्रमाणे ते श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाले. "महावीर श्रीकृष्णा ! श्रीकृष्णा ! परम प्रतापी बलरामा ! आम्ही आपणास शरण आलो आहोत. या दावानलात आम्ही होरपळून जाणार ! तुम्ही आम्हांला वाचवा. श्रीकृष्णा ! आमचे सर्व काही तूच आहेस. मग आमचा नाश कसा होणार ! हे सर्व धर्म जाणणार्‍या शामसुंदरा ! तूच आमचा रक्षणकर्ता. आम्हांला फक्त तुझाच आधार." (७-१०)

श्रीशुकदेव म्हणतात - आपल्या बांधवांची ही दीनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाले - "भिऊ नका ! तुम्ही डोळे मिटा." "ठीक आहे." असे म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतांनी ती भयंकर आग तोंडाने पिऊन टाकली; आणि त्यांना त्या घोर संकटातून सोडविले. यानंतर जेव्हा गोपाळ डोळे उघडून बघतात, तोच त्यांना आपण मांडीर वडाजवळ आहोत असे दिसले. अशा प्रकारे त्यांची आणि गुरांची दावानलापासून सुटका झाल्याचे पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णांची ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसेच दावानलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानू लागले. (११-१४)

संध्याकाळ झाल्यानंतर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गाईंना माघारी बलवून बासरी वाजवीत व्रजाकडे आले. त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत येत होते. इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगांप्रमाणे वाटत होता. जेव्हा त्यांचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना परमानंद झाला. (१५-१६)

अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP