|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १८ वा
प्रलंबासुर उद्धार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - नंतर आनंदित झालेल्या स्वजनांसह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत, श्रीकृष्णांनी गाईगुरांनी शोभणार्या व्रजात प्रवेश केला. अशा प्रकारे योगमायेने गोपाळ झालेले राम-कृष्ण व्रजामध्ये लीला करीत होते. असाच एकदा ऐन उन्हाळा होता. प्राण्यांना हा तसा विशेष आवडत नाही. परंतु वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे तेथे वसंत ऋतूच वाटत होता. कारण तेथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम निवास करीत होते ना ! तेथे रातकिड्यांचा कर्कश आवाज, झर्यांच्या खळखळाटामध्ये झाकला गेला होता. त्या निर्झरांतून सदैव पाण्याचे तुषार उडत असत. त्यामुळे ते वन हिरव्यागार वनराईने शोभिवंत झाले होते. (१-४) नदी, सरोवरे व झर्यांच्या लाटांना स्पर्श करून जो वारा वाहात होता, त्यात पांढर्या, लाल, निळ्या कमळांचे पराग मिसळत होते. त्यामुळे हिरवळीने भरलेल्या त्या वनात राहणार्या लोकांना वणवा किंवा सूर्य यांच्या उष्णतेचा मुळीच त्रास नव्हता. नदीमध्ये भरपूर पाणी असे. तिच्या लाटा तटांवर येऊन थडकत. त्यामुळे आसपासच्या जमिनी ओलसर राहात आणि सूर्याचे विषासारखे प्रकर किरणसुद्धा तेथील जमिनी आणि हिरवेगार गवत सुकवू शकत नसत. त्या वनामध्ये फुले विपुल असल्याने तेथे सौंदर्य ओसंडत होते. कुठे रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत, तर कुठे हरिणे चीत्कार करीत. कुठे मोर केकारव करीत, तर कुठे भ्रमर गुंजारव करीत. कुठे कोकिळा कुहू कुहू गात तर कुठे सारस पक्षी कूजन करीत. त्या वनात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करण्याचे ठरविले. म्हणून गोधन घेऊन बासरी वाजवीत ते त्या वनात शिरले. (५-८) राम कृष्ण इत्यादि गोपाळ कोवळी पाने, मोरपिसांचे गुच्छ, फुलांचे हार आणि गेरूसारखे रंग लावून सजले. नंतर कोणी नाचू लागले, कोणी कुस्ती खेळू लागले आणि काहीजण गाऊ लागले. ज्यावेळी श्रीकृष्ण नाचू लागत, त्यावेळी काहीजण गाऊ लागत तर काहीजण बासरी व शिंगे वाजवू लागत. काहीजण हातांनीच ताल धरीत, तर काहीजण "वाहवा ! वाहवा !" म्हणत. परीक्षिता ! त्यावेळी नट जसे नायकाची प्रशंसा करतात, त्याप्रमाणे देव गोपांचे रूप धारण करून तेथे येत आणि गोपजातीमध्ये जन्म घेऊन लपून राहिलेल्या बलराम व श्रीकृष्णांची स्तुती करू लागत. झुलपे असणारे श्रीकृष्ण आणि बलराम कधी एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरत, कधी उंच उड्या मारत, कधी पैज लावून ढेकळे फिकीत, कधी दंड थोपटत, कधी गट करून एकमेकांना ओढीत, कधी एकमेकांशी कुस्ती खेळत. अशा प्रकारे निरनिराळ्या तर्हेचे खेळ खेळत. हे राजा ! कधी कधी जेव्हा इतर गोपाळ नाचू लागत, तेव्हा स्वतः राम-कृष्ण गात किंवा वाजवीत किंवा "शाबास, शाबास !" म्हणून त्यांची प्रशंसा करू लागत. कधी एक दुसर्यावर बेल, जायफळे किंवा आवळे हातात घेऊन फेकित. कधी लपंडाव खेळत. कधी एकमेकांना शिवण्यासाठी पुष्कळ लांबपर्यंत पळत जात, तर कधी पशुपक्ष्यांच्या नकला करीत. कधी बेडकांप्रमाणे उड्या मारीत चालत, तर कधी वाकुल्या दाखवून एकमेकांची थट्टा करीत. कधी झाडावर दोराचा झोका तयार करून झोके घेत तर कधी राजाचा खेळ खेळत. अशा रीतीने सामान्यपणे मुले जे खेळ खेळतात, तसलेच खेळ ते वृंदावनातील नदी, पर्वत, दर्या, कुंज, वन, सरोवर वगैरे ठिकाणी खेळत. (९-१६) एके दिवशी जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण गोपाळांसह त्या वनामध्ये गुरे चारीत होते, तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेषामध्ये एक प्रलंब नावाचा असुर आला. भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी त्याला ओळखले. तरीही त्यांनी त्याची मैत्री मान्य केली, कारण त्यांना त्याला मारायचे होते. क्रीडा प्रकारात तज्ञ असणार्या श्रीकृष्णांनी गोपाळांना जवळ बोलावून म्हटले, "मित्रांनो ! आज आपण यथायोग्य रीतीने दोन गट करून खेळू." गोपाळांनी त्या खेळासाठी बलराम आणि श्रीकृष्णांना नायक बनविले. काहीजण श्रीकृष्णाचे तर काहीजण बलरामाचे साथीदार झाले. नंतर ते वाहून नेण्याच्या प्रकाराचे पुष्कळ खेळ खेळले. यामध्ये विजेता गट हरणार्यांच्या पाठीवर बसत असे व हरणारा त्यांना वाहून नेत असे. अशा प्रकारे वाहणारे व वाहिले जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली गोधनाला चारीर भांडीरक नावाच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचले. (१७-२२) परीक्षिता ! एकदा बलरामाच्या गटातील श्रीदामा, वृषभ इत्यादि मुलांनी खेळामध्ये बाजी मारली, तेव्हा श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर बसवून वाहून नेऊ लागले. हरलेल्या श्रीकृष्णांनी श्रीदाम्याला आपल्या पाठीवर बसवून घेतले, भद्रसेनाने वृषभाला आणि प्रलंबाने बलरामांना ! दानवश्रेष्ठ प्रलंबाने श्रीकृष्णाला हरवणे कठीण आहे हे ओळखून तो त्यांच्याच गटात गेला. तो बलरामांना पाठीवर घेऊन वेगाने पळत सुटला व ठरलेल्या ठिकाणाच्याही पुढे निघून गेला. एखाद्या मोठ्या पर्वताइतक्या वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासुराचे चालणे थांबले; त्याने आपले खरे दैत्यरूप धारण केले. त्याच्या काळ्या शरीरावर सोन्याचे दागिने चमकत होते. गौरवर्ण बलरामांना पाठीवर घेतल्यामुळे तो असा दिसत होता की, जणू वीजयुक्त काळ्या ढगाने चंद्राला धारण केले आहे. त्याचे डोळे धगधगत होते. भयंकर दाढा भुवयांना जाऊन भिडल्या होत्या. त्याचे केस आगीच्या ज्वाळेसारखे दिसत होते. त्याच्या हातापायातील कडी, मुगुट आणि कुंडले यांच्या चमकण्याने तो अधिक भयानक वाटत होता. त्याला आकाशात जात असलेला पाहून बलराम थोडेसे घाबरले. परंतु दुसर्याच क्षणी त्यांना आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि त्यांची भिती पळाली. धन चोरणार्या चोराप्रमाणे आपल्याला चोरून घेऊन आकाशमार्गाने जाणार्या त्या शत्रूच्या डोक्यावर, इंद्राने पर्वतावर वज्राची प्रहार करावा, तसा बलरामांनी क्रोधाने एक ठोसा जोरात लगावला. ठोसा लागताच त्याचे मस्तक फुटले. तो तोंडातून रक्त ओकू लागला, त्याची शुद्ध हरपू लागली आणि इंद्राने वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे मोठ्याने आवाज करीत तो तत्काळ प्राण जाऊन जमिनीवर पडला. (२३-२९) बलवान बलरामांनी प्रलंबासुराला मारलेले पाहून गोपाळांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ते वारंवार "वाहवा ! वाहवा !" म्हणू लागले. गोपाळांची मने प्रेमाने भरून आली. ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले. आणि मरणाच्या दारातून जणू परत आलेल्या त्यांना मिठ्या मारून स्तुतीला पात्र असणार्या त्यांची प्रशंसा करू लागले. (३०-३१) दुष्ट प्रलंबासुर मेल्यामुळे देवांना अत्यंत आनंद झाला. ते बलरामांवर पुष्पवर्षाव करून त्यांची "शाबास ! वाहवा !" म्हणून प्रशंसा करू लागले. (३२) अध्याय अठरावा समाप्त |