श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १७ वा

कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - नागांचे निवासथान रमणकद्वीप कालिया नागाने का सोडले होते ? आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा असा कोणता अपराध केला होता ? (१)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! पूर्वी गरुडाच्या आहारासाठी जाणे आवश्यक असणार्‍या सर्पांनी असा नियम केला होता की, दरमहा ठराविक वृक्षाखाली गरुडाला एक साप भेट म्हणून द्यायचा. या नियमानुसार प्रत्येक अमावस्येला, आपल्या रक्षणासाठी म्हणून सगळे साप शक्तिशाली गरुडाला आपापला भाग देत असत. त्या सर्पांपैकी कद्रूचा पुत्र कालिया नाग आपले विष आणि बळ यांच्या घमेंडीत उन्मत्त झाला होता. गरुडाला तुच्छ मानून स्वतः बळी देणे सोडून उलट गरुडाला दिलेला बळीच तो खात असे. (२-४)

परीक्षिता ! हे ऐकून भगवंतांचा प्रिय पार्षद असलेल्या शक्तिशाली गरुडाला अतिशय क्रोध आला. म्हणून त्याने कालियाला मारून टाकण्यासाठी अत्यंत वेगाने त्याच्यावर आक्रमण केले. विषारी कालियाने पाहिले की, अत्यंत वेगाने गरुढ आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे, तेव्हा अनेक फणा उभारून तो त्याच्यावर तुटून पडला. विषारी दात हेच त्याचे शस्त्र होते, म्हणून दातांनी तो त्याला डसला. त्यावेळी तो भयानक जिभा हालवीत होता. दीर्घ फूत्कार टाकीत होता आणि त्याचे डोळे अतिशय भयानक दिसत होते. भगवंतांचे वाहन असणार्‍या प्रचंड वेगवान गरुडाने क्रोधाने त्याला झटकून टाकले आणि अत्यंत पराक्रमी अशा त्याने डाव्या सोनेरी पंखाने कालिया नागाला तडाखा दिला. त्याच्या पंखाच्या प्रहाराने कालिया अत्यंत घायाळ झाला, आणि तेथून निघून यमुनेच्या खोल असल्यामुळे जाण्यास कठीण अशा या डोहात आला. एके दिवशी भुकेलेल्या गरुडाने तपस्वी सौभरींनी मनाई करूनही आपले इच्छित भक्ष्य असणार्‍या माशाला बळजबरीने पकडून खाल्ले. मत्स्यराज मारला गेल्याने बिचारे मासे अतिशय दुःखी झाले. हे पाहून सौभरींना त्यांची दया आली. त्यांनी हा डोहात राहणार्‍या सर्व जीवांच्या हितासाठी गरुडाला शाप दिला. "गरुड जर या डोहात येऊन माशांना खाईल तर त्याच क्षणी तो प्राणाला मुकेल. हे माझे म्हणणे खरे असेल." हे कालियाखेरीज इतर कोणत्याही सापाला माहीत नव्हते. म्हणून गरुडाच्या भितीने तो तेथे राहू लागला होता. आणि आता श्रीकृष्णांनी त्याला तेथून घालवून दिले. (२-१२)

नंतर श्रीकृष्ण दिव्य माळा, गंध, वस्त्रे, महामूल्य रत्‍ने आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आले. जसे प्राण परत आल्यानंतर इंद्रिये सचेतन होतात, त्याप्रमाणे त्यांना पाहून सर्व गोप-गोपी उठून उभे राहिले. त्यांची हृदये आनंदाने भरून आली. अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले. परीक्षिता ! श्रीकृष्णांना भेटून यशोदा, रोहिणी, नंद, गोपी आणि गोप यांच्या जिवात जीव आला. त्यांचे मनोरथ सफल झाले. बलरामाला भगवंतांचा प्रभाव माहीत होता. श्रीकृष्णांना हृदयाशी धरून तो हसू लागला. पर्वत, वृक्ष, गायी, बैल, वासरे अशा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. गोपांच्या कुलगुरू ब्राह्मणांनी पत्‍नींसह नंदाकडे येऊन म्हटले, "कालियाच्या तावडीतून सुटून तुझा मुलगा परत आला, ही मोठीच भाग्याची गोष्ट आहे. श्रीकृष्णाच्या सुटकेच्या निमित्ताने तू ब्राह्मणांना दान दे." राजा ! ब्राह्मणांचे म्हणणे ऐकून नंदांनी प्रसन्न मनाने पुष्कळ सोने अणि गाई ब्रह्मणांना दान केला. भाग्यवती यशोदासुद्धा काळाच्या जबड्यातून परत आलेल्या मुलाला मांडीवर घेऊन, हृदयाशी कवटाळून वारंवार आसवे ढाळू लागली. (१३-१९)

हे राजेंद्रा ! व्रजवासी लोक आणि गुरे त्यादिवशी अतिशय थकली होती. शिवाय त्यांना तहान-भूकही लागली होती. म्हणून त्या रात्री ते यमुनातीरावरच झोपले. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे तेथील वनाला वणवा लागला. त्या आगीने, झोपलेल्या व्रजवासीयांना मध्यरात्री चारही बाजूंनी वेढून घेतले आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली. आगीची आच लागल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीलामनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले. ते म्हणाले, "हे थोर श्रीकृष्णा ! हे अतिशय पराक्रमा बलरामा ! पहा ! पहा ! ही भयंकर आग तुमच्याच असलेल्या आम्हांला जाळू पहात आहे. हे प्रभो ! आम्ही तुमचेच आहोत. म्हणून या भयंकर काळरूप आगीपासून आम्हांला वाचवा. तुमचे सर्वत्र अभय देणारे चरणकमल आम्ही नाही सोडू शकत." अनंत व अनंत शक्तींना धारण करणार्‍या जगदीश्वराने स्वजन अशा प्रकारे व्याकूळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली. (२०-२५)

अध्याय सतरावा समाप्त

GO TOP