|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १६ वा
कालियावर कृपा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - राजाने विचारले - ब्रह्मन् ! यमुनेच्या खोल पाण्यात भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्पाचे दमन कसे केले ? शिवाय तो जलचर नसूनही पुष्कळ काळ पाण्यात का आणि कसा राहिला, ते सांगावे. हे महात्मन ! स्वेच्छेनुसार वागणार्या अनंत भगवानांनी गोपालरूपाने ज्या दिव्य लीला केल्या, त्या लीलामृताच्या सेवनाने कोण बरे तृप्त होऊ शकेल ? (२-३) श्रीशुक म्हणाले - यमुना नदीत कालिया नागाचा एक डोह होता. त्यातील पाणी विषाच्या उष्णतेने उकळत असे. एवढेच काय, त्याच्यावरून उडणारे पक्षीसुद्धा होरपळून त्यामध्ये पडत असत. त्या विषारी पाण्याच्या लाटांवरून त्यातील लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा जेव्हा बाहेर येई, तेव्हा त्याच्या स्पर्शाने काठावरील झाडे व प्राणी मरून जात. भगवंतांचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच होता. त्यांनी पाहिले की, विषाचा वेग प्रचंड असून तेच त्याचे बलस्थान आहे; तसेच त्यामुळेच यमुना दूषित झाली आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी कमरेचा शेला घट्ट बांधून ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले आणि दंड थोपटून तेथून विषारी पाणात उडी मारली. सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी पहिल्यापासूनच उकळत होते. त्यावर लाल-पिवळ्या रंगांच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या. भगवंताणी उडी मारल्याने ते पाणी आणखीनच उसळले. त्यावेळी ते पाणी इकडे तिकडे चारशे हात पसरले. अनंत बलशली, भगवंतांच्या बाबतीत यात आश्चर्य कसले ? (४-७) परीक्षिता ! डोहात उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्तीप्रमाणे पोहू लागले. त्यावेळच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला. कालिया नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केले आहे, हे पासून ते सहन न झाल्यामुळे तो श्रीकृष्णांच्या समोर आला. त्याने पाहिले की, समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे. त्याच्या वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्याने पीतांबर परिधान केला आहे. त्याच्या मनोहर चेहर्यावर मंद हास्य झळकत आहे. त्याचे पाय कमळाच्या गाभ्याप्रमाणे कोमल आहेत. इतके असूनही तो येथे निर्भयपणे खेळत आहे. तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले. नागाने वेढलेले श्रीकृष्ण काहीच हालचाल करीत नसलेले पाहून त्यांचे प्रिय सखे गोपाळ अत्यंत दुःखी झाले. कारण त्यांनी आपले शरीर, सुहृद, धन, संपत्ती, स्त्री, पुत्र, इच्छा इत्यादि सर्व काही श्रीकृष्णांनाच समर्पित केले होते. त्यामुळे दुःख, शोक आणि भितीने मूर्च्छित होऊन ते जमिनीवर पडले. गाई, बैल, वासरे अतिशय दुःखी होऊन हंबरडा फोडू लागली. भयभीत होऊन जणू काही रडत श्रीकृष्णांकडे ती एकटक पाहात राहिली. (८-११) इकडे व्रजात पृथ्वी, आकाश आणि शरीर या तिन्हींमध्ये अतिशय भयंकर असे अपशकुन होऊ लागले. लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असल्याचे ते सूचक होते. नंद इत्यादि गोपांनी ते अपशकुन पाहिले आणि बलरामाखेरीज श्रीकृष्ण गाई चारण्यासाठी गेला आहे, हे कळताच ते भितीने व्याकुळ झाले. ते भगवंतांचा प्रभाव जाणत नव्हते; म्हणून ते अपशकुन पाहून त्यांच्या मनात आले की, श्रीकृष्णावर मरणप्राय संकट ओढवणार असे दिसते. या विचाराने ते त्याच क्षणी दुःख, शोक आणि भयाने ग्रस्त झाले. कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण, मन होते ना ! राजा ! व्रजातील मुले, वृद्ध आणि स्त्रिया यांचे कृष्णांवर गाईंसारखेच अतिशय प्रेम होते. त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहाण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले. भगवान कृष्णाचे दुसरे रूप असे बलराम ते लोक इतके व्याकुळ झाल्याचे पाहून हसू लागले. परंतु काही बोलले नाहीत. कारण त्यांना धाकट्या भावाचा प्रभाव माहित होता. ते प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले. वाटेतच त्यांना भगवंतांची चरणचिन्हे दिसली. त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले. (१२-१७) परीक्षिता ! वाटेमध्ये गाई आणि इतरांच्या पावलांच्या ठशांव्यतिरिक्त अधून मधून भगवंतांची चरणचिन्हे सुद्धा दिस्त होती. त्यावर कमल, जव, अंकुश, व्रज आणि ध्वजाची चिन्हे दिसत होती. ती पाहताच ते लगबगीने चालू लागले. त्यांनी लांबूनच पाहिले की, डोहात कालिय नागाच्या विळख्यात बांधले गेलेले श्रीकृष्ण निश्चेष्ट असून तीरावर गोपाळ किंकर्तव्यमूढ अवस्थेत पडलेले आहेत. ते पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकुळ होऊन मूर्छित झाले. गोपींचे मन अनंत गुणांनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरंगात रंगले होते. त्या नित्य भगवंतांचे प्रेम, स्मितहास्य, नेत्रकटाक्ष तसेच गोड वाणी यांचेच स्मरण करीत. त्यांनी जेव्हा पाहिले की, आपल्या प्रियतमाला नागाने विळखा घातला आहे, तेव्हा त्या अत्यंत दुःखाने करपून गेल्या. आपल्या प्रियतमाखेरीज त्यांना तिन्ही लोक भकास वाटू लागले. आपल्या लाडक्याच्या पाठोपाठ डोहात उडी मारावयास निघालेल्या यशोदेला गोपींनी कसेबसे धरून ठेवले. त्यांच्याही नेत्रांतून दुःखाने अश्रुधारा वाहात होत्या. सर्वांच्या नजरा श्रीकृष्णांच्या मुखाकडेच लागल्या होत्या. काहीजणी व्रजमोहन श्रीकृष्णांच्या कथा एकमेकींना सांगत परस्परांना धीर देत होत्या. काहीजणी तर मृतवत पडलेल्या होत्या. श्रीकृष्णच जीव की प्राण असणारे नंदादि गोप डोहात घुसू लागले, हे पाहून श्रीकृष्णांचा प्रभाव जाणणार्या भगवान बलरामांनी त्यांना थोपवून धरले. (१८-२२) आपल्याशिवाय अन्य गती नसलेले व्रजातील सगळे लोक, स्त्रिया, मुले आणि गुरे आपल्यासाठी इतकी दुःखी झालेली आहेत, हे पाहून मानवी लीला करणारे भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात राहून मग बाहेर आले. त्यावेळी त्यांनी आपले शरीर फुगविल्यामुळे सापाला वेदना होऊ लागल्या. तो वेटोळे सोडून क्रोधाने फणा उभारून फूत्कार सोडू लागला. तो त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला. त्यावेळी त्याच्या नाकातून विषारी श्वास बाहेर पडत होता. त्याचे डोळे इतके लाल झाले होते की, जणू भट्टीवर तापविलेले खापरच ! त्याच्या तोंडातूनही आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यावेळी कालिया आपली दुभंगलेली जीभ फिरवून आपल्या दोन्ही ओठांचे कोपरे चाटीत होता आणि भयानक डोळ्यांनी विषाग्नीच्या ज्वाळा बाहेर टाकीत होता. गरुडाप्रमाणे श्रीकृष्ण त्याच्याबरोबर खेळत पवित्रे बदलू लागले, आणि तो सापसुद्धा दंश करण्यासाठी योग्य संधीची वाट पहात पवित्रे बदलू लागला. अशा प्रकारे इकडे, तिकडे, मान फिरवून त्याची शक्ती क्षीण झाली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा उंच फणा वाकवून उडी मारून त्यावर ते स्वार झाले. नागाच्या मस्तकावर असणार्या लाल मण्यांमुळे भगवंतांच्या सुकुमार पावलांची लाली अधिकच वाढली. सर्व कलांचे आद्य गुरू श्रीकृष्ण आता त्याच्या मस्तकारव सुंदर नृत्य करू लागले. भगवान नृत्य करणार असे पाहून त्यांचे प्रिय भक्त गंधर्व, सिद्ध, देव, चारण आणि देवांगना मोठ्या प्रेमाने मृदंग, ढोल, नगारे इद्यादि वाद्ये वाजवीत, सुंदर सुंदर गीते गात, पुष्पवर्षाव करीत भेटवस्तू घेऊन स्तुती करीत भगवंतांकडे आले. परीक्षिता ! कालिया नागाला एकशे एक फणा होत्या. तो आपली जी जी फणा वाकवीत नसे, ती ती, कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबीत. यामुळे कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली. तो नाका तोंडातून भयंकर रक्त ओकू लागला. शेवटी त्याला चक्कर आल्याने तो बेहोश झाला. तो डोळ्यांतून वीष बाहेर फेकू लागे आणि क्रोधामुळे जोरजोरात फूत्कार टाकीत जी जी फणा वर उचलीत असे, तिच्यावर नृत्य करीत श्रीकृष्ण आपल्या लाथेने वाकवून ती तुडवीत. त्यावेळी त्या पुराण पुरुषाच्या पायांवर जे रक्ताचे थेंब पडत, ते पाहून असे वाटत असे की, जणू काही पान फुलांनी त्यांची पूजा केली जात आहे. राजा ! भगवंतांच्या या अद्भुत तांडवनृत्यामुळे कालियाचे फणारूपी छत्र छिन्नविछिन्न झाले. त्याचे अंग खिळखिळे झाले आणि तोंडातून रक्ताची उलटी होऊ लागली. आता त्याला सर्व जगाचे गुरू असणार्या पुराणपुरुष नारायणांचे स्मरण झाले आणि तो मनोमन त्यांना शरण गेला. उदरामध्ये संपूर्ण विश्व धारण करणार्या श्रीकृष्णाच्या वजनाने कालिया गलितगात्र झाला. त्यांच्या टाचेने केलेल्या आघातांमुळे त्याचे छत्रासारखे फणे छिन्नविछिन्न झाले. आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण गेल्या. भितीने यावेळी त्यांची वस्त्रे, अलंकार अस्ताव्यस्त झाले होते आणि केसांच्या वेण्या विस्कटल्या होत्या. त्यावेळी त्या साध्वी नागपत्न्या अतिशय घाबरल्यामुळे आपल्या मुलांना पुढे करीत लोटांगण घालून, हात जोडून त्यांनी चराचराचे स्वामी अशा श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि आपल्या अपराधी पतीला सोडविण्याच्या इच्छेने त्या शरणागतवत्सल अशा त्यांना शरण गेल्या. (२३-३२) नागपत्न्या म्हणाल्या - प्रभो ! दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झाला आहे; म्हणून या अपराध्याला दंड देणेच योग्य आहे. आपल्या दिष्टीने शत्रू आणि पुत्र समानच असतात. म्हणून आपण ज्याला दंड देता तो त्याच्या कल्याणासाठीच असतो. आपण आमच्यावर ही मोठीच कृपा केली आहे; कारण आपण दुष्टांना जो दंड देता, त्यामुळे त्याची सर्व पापे नाहीशी होतात. हा प्राणी अपराधी आहे, म्हणून याला ही सर्पयोनी मिळाली. म्हणून आम्ही आपल्या या क्रोधालासुद्धा आपला अनुग्रहच समजतो. मागील जन्मात याने निश्चितच स्वतः मानरहित होऊन आणि दुसर्यांचा सन्मान करीत मोठी तपश्चर्या केली असावी किंवा सर्व जीवांवर दया करण्याचा मोठा धर्म केला असावा. म्हणूनच तर सर्व जीवस्वरूप आपण याच्यावर संतुष्ट झाला आहात. भगवन् ! हा आपल्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होण्याचा अधिकारी झाला, हे त्याच्या कोणत्या साधनेचे फळ आहे, हे आम्हांला माहीत नाही. यासाठी लक्ष्मीदेवीलासुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत भोगांचा त्याग करून नियमांचे पालन करीत तपश्चर्या करावी लागली होती. प्रभो ! जे आपल्या चरणरजाला शरण जातात, ते भक्तजन स्वर्गाचे राज्य किंवा पृथ्वीचे सार्वभौमत्व इच्छित नाहीत, ब्रह्मपद इच्छित नाहीत की त्यांना रसातळाचे राज्य नको असते. त्यांना अणिमादि योगसिद्धींची अभिलाषा असत नाही की मोक्षाची इच्छा असत नाही. स्वामी ! हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्मला असून अत्यंत्त क्रोधी आहे. असे असूनही इतरांना सर्वथैव दुर्लभ असणारे चरणरज याला प्राप्त झाले आहे. जे प्राप्त करण्याच्या केवळ इच्छेनेही संसारचक्रात पडलेल्या जीवाला साक्षात वैभवाची प्राप्ती होते. (३३-३८) प्रभो ! आम्ही आपणास प्रणाम करीत आहोत. आपण अनंत ऐश्वर्याचा ठेवा आहात. आपण सर्वांच्या ठिकाणी विराजमान असूनही अमर्याद आहात. आपण सर्व प्राणी आणि पदार्थांचे आश्रय तसेच सर्व पदर्थांच्या रूपांमध्येसुद्धा विराजमान आहात. आपण प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा आहात. आपण ज्ञान विज्ञानाचा खजिना आहात. आपली शक्ति अनंत आहे. आपले स्वरूप अप्राकृत विकाररहित व निर्गुण आहे. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. आपण प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न करणारे काल आहात. कालशक्तीने आश्रय करणारे आहत. कालशक्तीचे आश्रय आहात आणि कालाच्या क्षण, कल्प इत्यादि सर्व अवयवांचे साक्षी आहात. आपण विश्वरूप असूनही त्यापासून वेगळे असे त्याचे द्रष्टे आहात. आपण ते विश्व बनविणारे निमित्तकारण व त्याच्या रूपात बनणारे उपादानकारण सुद्धा आहात. प्रभो ! पंचमहाभूते, त्यांच्या तन्मात्रा, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि चित्त आपणच आहात. तिन्ही गुण आणि त्यांच्या कार्यरूप अभिमानाच्या योगाने आपण आपल्या साक्षात्काराला झाकून ठेवले आहे. आपण अनंत, सूक्ष्म, विकाररहित आणि सर्वज्ञ आहात. शास्त्रांच्या मतभेदानुसार आपण तसतसे होत असता. शब्द व अर्थ यांचा संबंध जोडणारी शक्ती आपणच आहात. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. प्रत्यक्ष, अनुमान इत्यादि जितकी म्हणून प्रमाणे आहेत, त्या प्रमाणांचे मूळ आपणच आहात. आपण सर्वज्ञ असून सर्व शास्त्रे आपल्यापासूनच निघाली आहेत. प्रवृत्तिमार्ग आणि निवृत्तिमार्ग व या दोघांचे मूल वेदसुद्धा आपणच आहात. आम्ही आपणांस वारंवार नमस्कार करीत आहोत. आपण वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूहाच्या रूपामध्ये असलेले भक्तांचे व यादवांचे स्वामी श्रीकृष्ण आहात. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. आपण त्रिगुणांचे प्रकाशक असून त्यांच्याद्वारा स्वतःला झाकूनही ठेवता. गुणवृत्तींमुळेच आपले थोडेसे ज्ञान होते. आपण ते गुण आणि त्यांच्या वृत्तींचे साक्षी असून स्वयंप्रकाश आहात. आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. आपण मूळ प्रकृतीमध्ये विहार करीत असता. सर्व जग आपल्यापासूनच प्रगट होते. हे हृषीकेशा ! मौन हा स्वभाव असलेले आपण मुनी आहात. आपणांस आमचा नमस्कार असो ! आपण स्थूल सूक्ष्म अशा सर्व गतींना जाणणारे तसेच सर्वांचे साक्षी आहात. आपण नामरूपात्मक विश्व नसून अधिष्ठानदृष्ट्या विश्वरूपसुद्धा आहात. आपण विश्वाचे साक्षी व त्याचे कारणही आहात. आपल्याला आमचा नमस्कार असो. (३९-४८) प्रभो ! आपण स्वतः कर्म करीत नाही, तरी सुद्धा कालशक्ति व प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा आपण या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करता; आपण सत्यसंकल्प आहात; आपण जीवांच्या संस्काररूपात असलेल्या स्वभावांना आपल्या दृष्टिक्षेपाने जागृत करून विश्वाची लीला करता. त्रैलोक्यामधील सत्त्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी प्राणी या आपल्याच लीलामूर्ती आहेत. तरीसुद्धा यावेळी आपल्याला सत्त्वगुणी जनच प्रिय आहेत. कारण आपला हा अवतार आणि या लीला साधुजनांचे पालन तसेच धर्माचे रक्षण आणि विस्तार यासाठीच आहे. हे शांतस्वरूपा ! स्वामींनी प्रथमच केलेला आपल्या प्रजेचा अपराध सहन करावा. हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही. म्हणून आपण याला क्षमा करावी. भगवन् ! कृपा करा. आता हा सर्प मरणाच्या दारी आहे. साधुपुरुष अबलांवर दया करीत असतात. म्हणून आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना, आम्हांला परत द्या. आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही काय करावे याविषयी आपण आम्हांला आज्ञा करावी. कारण जो श्रद्धेने आपल्या आज्ञांचे पालन करतो, त्याची सर्व प्रकारच्या भयांपासून सुटका होते. (४९-५३) श्रीशुक म्हणतात - भगवंतांनी केलेल्या लत्ता प्रहारांनी फणा घायाळ होऊन तो नाग बेशुद्ध झाला होता. नागपत्न्यांनी अशी स्तुती केली, तेव्हा त्यांनी त्याला दयाबुद्धीने सोडून दिले. कालियाची इंद्रिये आणि प्राण यांमध्ये हळू हळू चेतना आली. अतिशय कष्टाने तो श्वासोच्छ्वास करू लागला आणि थोड्या वेळानंतर अतिशय दयेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला - (५४-५५) कालिया म्हणाला - नाथ ! आम्ही जन्मतःच दुष्ट, तमोगुणी आणि दीर्घद्वेषी आहोत. आपला स्वभाव सोडणे जीवांना अतिशय कठीण आहे; म्हणूनच तर लोकांना जन्मांतरीच्या स्वभावामुळे मिथ्या प्रपंचाविषयी आसक्ति वाटते. हे विश्वविधात्या ! आपणच गुणांच्या भेदानुसार हा जगात अनेक प्रकारचे स्वभाव, सामर्थ्य, बल, योनी, बीज, चित्त आणि आकृती निर्माण केल्या आहेत. भगवन् ! आपल्याच सृष्टीमधील जन्मतःच अतिशय रागीट असे आम्ही सर्प आहोत. आपल्या त्याग करण्यास कठीण अशा मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्नांनी या मायेचा त्याग कसा करू शकू ? सर्वज्ञ आणि संपूर्ण जगाचे स्वामी असे आपणच या सर्वाला कारणीभूत आहात. म्हणून आता आपण आपल्याला योग्य वाटेल, त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या. (५६-५९) श्रीशुक म्हणतात - कालिया नागाची प्रार्थना ऐकून कार्यासाठी मनुष्य झालेले भगवान म्हणाले, "सर्पा ! आता तू इथे राहू नकोस. तू आपले नातलग, पुत्र आणि स्त्रियांसह ताबडतोब येथून समुद्रात निघून जा. आता गाई आणि माणसे यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत." तुला दिलेल्या माझ्या या आज्ञेचे जो मनुष्य दोन्ही वेळेला स्मरण आणि पठण करील, त्याला सर्पांपासून कधीही भय असणार नाही. जो मनुष्य या माझ्या क्रीडास्थानात स्नान करून पाण्याने देव आणि पितरांचे तर्पणा करील, तसेच उपवास करून माझे स्मरण करीत माझी पूजा करील, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. ज्याच्या भितीने रमणक द्वीप सोडून तू या डोहामध्ये येऊन राहिला आहेत, तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही. (६०-६३) श्रीशुक म्हणतात - अद्भुत लीला करणार्या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली, तेव्हा कालिया नाग आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने व मोठ्या आदराने त्यांची पूजा केली. (६४) त्यांनी दिव्य वस्त्र, पुष्पमाळा, रत्ने, बहुमूल्य अलंकार, दिव्य गंध, उटणे आणि अति उत्तम कमळपुष्पांच्या हाराने, जगताचे स्वामी असलेल्या गरुडध्वज भगवंतांचे पूजन करून त्यांना प्रसन्न केले. यानंतर अतिशय प्रेमाने त्यांना प्रदक्षिणा घातली, वंदन केले आणि त्यांची अनुमती घेतली. त्यानंतर समुद्रात सर्पांना राहण्याचे जे एक ठिकाण आहे, त्या रमणक द्वीपाकडे त्याने आपल्या पत्न्या, पुत्र आणि बांधवांसह, प्रयाण केले. लीलामनुष्य भगवन श्रीकृष्णांच्या कृपेने त्याच वेळी यमुनेचे पाणी केवळ विषविरहितच नव्हे तर अमृताप्रमाणे मधुर झाले. (६५-६७) अध्याय सोळावा समाप्त |