|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १५ वा
धेनुकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केले. आता ते गाई चरावयास पात्र ठरले. ते मित्रांसह गाई चारीत वृंदावनात जात आणि ते आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र करीत. हे वन गुरांच्या चार्याने भरलेले व फुलांनी लहडलेले होते. पुढे गाई, त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवीत श्यामसुंदर, त्यांच्यामागे बलराम आणि त्यापाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले. तेथे कोठे भ्रमर मधुर जुंजारव करीत होते, कोठे हरिणांचे कळप होते, तर कोठे पक्षी किलबिलाट करीत होते. तसेच कोठे कोठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती. त्यांतील कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तेथे वाहात होता. ती रमणीयता पाहून भगवंतांनी तेथे विहार करण्याचे ठरविले. फुला-फळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत, असे पाहून आनंदाने स्मित हास्य करीत श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले - (१-४) श्रीकृष्ण म्हणाले - "हे देवश्रेष्ठा ! देव ज्यांनी पूजा करतात, त्या चरणकमळांना हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहेत. असेही असेल की, ज्या पापामुळे त्यांना वृक्ष जन्म घ्यावा लागला, ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत. हे पुण्यशील आदिपुरुषा ! तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहात असलास, तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहे, हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवनपावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतात. ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत. हे स्तुत्य बंधो ! तू आपल्या घरी आल्याचे गोपिकांप्रमाणे या हरिणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत. या कोकिळा मधुर कुहुरवाने आपले स्वागत करीत आहेत ! घरी आलेल्या अतिथींचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो. अतिथिधर्म पाळणारे हे वनवासी धन्य होत. येथील भूमी आज गवत झुडुपांसह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आहे. येथील वृक्ष वेली तुझ्या हस्तांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानीत आहेत. तुझ्या दयार्द्र दृष्टिक्षेपामुळे नद्या, पर्वत, पशु-पक्षी कृतार्थ होत आहेत आणि व्रजातील गोपी लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षःस्थळाच्या स्पर्शाने कृत्कृत्य झाल्या आहेत. (५-८) श्रीशुकदेव म्हणतात - अशा प्रकारचे सुंदर वृंदावन पाहून श्रीकृष्ण आनंदित झाले. आपल्या सवंगड्यांसह गोवर्धन पर्वतावर व यमुनातीरावर गाईंना चारीत ते रममाण झाले. गोपाळ ज्यांचे चरित्र गात आहेत, असे वनमाला धारण केलेले कृष्ण बलरामासह धुंद भ्रमरांच्या गुण्गुणण्यात आपला स्वर मिळवून मधुर संगीत गात. (९-१०) कधी कधी श्रीकृष्ण राजहंसांच्या कूजनाचे अनुकरण करीत तर कधी नाचणार्या मोरांपेक्षा अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवीत. कधी मेघाप्रमाणे गंभीर वाणीने दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलवीत. त्यांची ती मधुर हाक गाई आणि गोपालांचे चित्त मोहवी. कधी चकोर, क्रौंच, चक्रवाक, भारद्वाज आणि मोर या पक्ष्यांचे आवाज काढीत, तर कधी वाघ-सिंहांच्या गर्जनेने घाबरल्यासारखे दाखवीत. कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडत, तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे पाय वगैरे चेपून त्यांचा थकवा दूर करीत. जेव्हा गोपाळ नाचू-गाऊ लागत, फुशारक्या मारत किंवा एकमेकांशी कुस्ती खेळत, तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहात आणि हसून "शाबास ! शाबास !" म्हणत. कधी कधी स्वतः श्रीकृष्णसुद्धा कुस्ती खेळता खेळता थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालवीच्या शय्येवर एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडत. त्यावेळी काही पुण्यवंत श्रीकृष्णांचे पाय चेपू लागत आणि दुसरे काही पुण्यशील बालक त्यांना पंख्यांनी वारा घालू लागत. हे राजा ! जेव्हा हृदय प्रेमाने उचंबळून येई, तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णांच्या लीलांना अनुरूप अशी मनोहर गीते गाऊ लागत. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या योगमायेने आपले खरे स्वरूप झाकून ठेवले होते. ते अशा काही लीला करीत की ज्या हुबेहुब गोपबालकांच्या सारख्याच वाटत. स्वतः भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये संलग्न असे, तेच भगवान या खेड्यातील बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेळत असत. परंतुउ कित्येक वेळा त्यांची ईश्वरी लीलासुद्धा प्रगट होत असे. (११-१९) राम कृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्र, सुबल, स्तोककृष्ण इत्यादि गोपाळ त्यांना प्रेमाने म्हणाले. हे पराक्रमी बलरामा ! हे दुष्टांचा नाश करणार्या कृष्णा ! येथून थोड्याच अंतरावर ताडवृक्षांनी भरलेले एक मोठे वन आहे. तेथे ताडाची पुष्कळ फळे खाली पडतात आणि पडलेलीही आहेत. परंतु धेनुक नावाचा दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही. हे रामा ! हे कृष्णा ! तो बलाढ्य दैत्य तेथे गाढवाच्या रूपात येऊन राहतो. त्याच्याबरोबर आणखीही पुष्कळसे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रूपात तेथे राहतात. शत्रूचा नाश करणार्या हे कृष्णा ! माणसांना खाणार्या त्या दैत्याच्या भितीने माणसे, इतकेच काय, पशु-पक्षीसुद्धा त्या जंगलात यात नाहीत. त्याची फळे सुगंधित आहेत, परंतु आम्ही कधी ती खाल्ली नाहीत. चारी दिशांना पसरलेला त्यांचा सुगंध ध्यानात येतो. हे श्रीकृष्णा ! त्यांच्या सुगंधाने आमचे मन मोहित झाले आहे. आणि ती मिळावीत, अशी फार इच्छा आहे. बलराम दादा ! आपली इच्छा असेल तर जाऊ या. (२०-२६) आपल्या मित्रंचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम, दोघेही हसले आणि त्यांची इच्छा पुरविण्यासाठी त्यांच्याबरोबर तालवनाकडे गेले. त्या वनात जाऊन बलरामांनी हातांनी ती ताडाची झाडे हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळे खाली पाडली. गाढवरूपी दैत्याने जेव्हा फळे पडल्याचा आवाज ऐकला, तेव्हा तो पर्वतांसह पृथ्वीचा थरकाप उडवीत तेथे आला. तो बलवान दुष्ट आवेशाने बलरामांसमोर आला आणि त्याने मागच्या पायांनी त्यांच्या छातीवर लाथा मारून खिंकाळत तेथून तो बाजूला सरकला. राजन् ! तो गाढव क्रोधाने पुन्हा खिंकाळत बलरामांच्याजवळ आला आणि त्यांच्याकडे पाठ करून पुन्हा वेगाने त्याने आपल्या मागच्या पायांनी त्यांच्यावर लाथा झाडल्या. बलरामांनी एकाच हातात त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला अकाशात गरगर फिरवीत एका ताडाच्या झाडावर आपटले. फिरवीत असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते. (२७-३२) त्याच्या आपटण्याने ज्याचा वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वतः कडकडाट करीत तुटून पडलाच, पण पडताना दुसर्या एका वृक्षालासुद्धा त्याने पाडले. दुसर्याने तिसर्याला, तिसर्याने चौथ्याला असे करीत पुष्कळसे ताडवृक्ष मोडून पडले. बलरामांनी लीलेने फेकून दिलेल्या गाढवाच्या शरेराच्या आघाताने तेथील सगळे ताडवृक्ष सोसाट्याच्या वार्याने हलावे तसे गदगदा हलले. हे राजा ! जगदीश्वर अनंत भगवानांच्या बाबतीत यात आश्चर्य ते काय ! कारण वस्त्रामध्ये दोरे असावेत, त्याप्रमाणे हे सारे जग त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहे. त्यावेळी धेनुकासुराचे बांधव गाढव, आपला नातलग मारला गेल्याचे पाहून क्रोधाने राम-कृष्णांवर आवेशाने तुटून पडले. राजन् ! त्यांच्यापैकी जे जे कोणी जवळ आले, त्यांना बलराम आणि श्रीकृष्णांनी अगदी सहजगत्या मागचे पाय पकडून ताडवृक्षांवर आपटले. त्यावेळी तेथे जमिनीवर चहूकडे पसरलेली ताडाची फळे, तुटून पडलेले वृक्ष व दैत्यांची प्रेते यांनी जमीन आच्छादली गेली. ढगांमुळे आकाश झाकोळून जावे तसे. त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वाद्ये वाजवून स्तुति करू लागले. ज्या दिवशी धेनुकासुर मेला, त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातील ताडफळे खाऊ लागले आणि जनावरे स्वच्छंदपणे चरू लागली. (३३-४०) त्यानंतर ज्यांचे श्रवण-कीर्तन पुण्यकारक आहे, असे कमलदलाप्रमाणे डोळे असलेले श्रीकृष्ण ज्येष्ठ बंधू बलरामांसह व्रजामध्ये आले. त्यावेळी त्यांचे साथीदार त्यांच्याबरोबर त्यांची स्तुती करीत निघाले होते. त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या केसांवर गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ पसरली होती, मस्तकावर मोरपंखांचा मुगुट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुले घातलेली होती. त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहर्यावर मनोहर स्मितहास्य होते. ते बासरी वाजवीत होते आणि त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ति गात होते. बासरीचा आवाज ऐकूत गोपी एकाच वेळी घरांतून बाहेर आल्या. केव्हापासून त्यांचे डोळे श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. (४१-४२) गोपींनी, नेत्ररूप भ्रमरांनी भगवंतांच्या मुखरविंदाच्या मधाचे पान करून दिवसभराच्या विरहाची आग शांत केली; आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनययुक्त नेत्रकटाक्षांनी केलेला सत्कार स्वीकारून व्रजामध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना त्यावेळी देण्याजोग्या वस्तू हव्या तेवढ्या दिल्या. नंतर तेल-उटणे लावून त्यांना स्नान घातले. त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिंडण्या-फिरण्याने आलेला शीण नाहीसा झाला. नंतर त्यांना सुंदर कपडे घालून, गंध लावून सुगंधी फुलांच्या माळा घातल्या. त्यानंतर दोघेही मातांनी वाढलेले स्वादिष्ट अन्न जेवले. त्यापाठोपाठ लडिवाळपणे त्यांना थोपटून आईंनी सुंदर अंथरुणावर झोपविले. तेव्हा ते आरामात झोपी गेले. (४३-४६) हे राजा ! अशा प्रकारे वृंदावनात राहात असता एके दिवशी श्रीकृष्ण बलरामाखेरीज इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनेवर गेले. त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने गाई आणि गोपाल तहानेने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी प्याले. परीक्षिता ! दैववशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिताच सर्व गाई आणि गोपाळ निश्चेष्ट होऊन यमुनेचा काठीच पडले. त्यांना त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचेसुद्धा ईश्वर असणार्या श्रीकृष्णांनी आपल्या अमृतवर्षाव करणार्या दृष्टीने त्यांना जिवंत केले. कारण त्यांचे रक्षणकर्ते श्रीकृष्णच होते ना ! तेव्हा शुद्धीवर आल्यावर ते सर्वजण पाण्याजवळच उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. राजा ! विषारी पाणी प्यालामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीनेच आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (४७-५२) अध्याय पंधरावा समाप्त |