श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १४ वा

ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

ब्रह्मदेव म्हणाले - प्रभो ! केवळ आपणच स्तुती करण्यास योग्य आहात. आपले हे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल आहे; त्यावर विजेप्रमाणे झगमगणारा पीतांबर शोघून दिसत आहे, गुंजांची कर्णभूषणे आणि मोरपंखांचा मुगुट यामुळे आपले मुख सुंदर दिसत आहे. आपल्या वक्षःस्थळावर वनमाला रुळत आहे, हातामध्ये घास, बगलेत वेताची काठी आणि शिंग व कमरेला खोचलेली बासरी सुरेख दिसत आहे. गोपालबालक असणार्‍या आपले चरण सुकुमार आहेत. मी आपल्याला नमस्कार करीत आहे. हे देवा ! भक्तांच्या इच्छेनुसार धारण केले जाणारे हे स्वरूप मला अनुगृहीत करण्यासाठीच आपण प्रगट केले आहे. हे पांचभौतिक नाही. तरीही याचा महिमा कोणीही जाणू शकत नाही. तर मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप अशा आपला महिमा कोणी चित्त एकाग्र करूनसुद्धा कसा जाणू शकेल. प्रभो ! जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्‍न न करता केवळ आपापल्या ठिकाणीच राहून, संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचे, शरीराने, वाणीने आणि मनाने विनम्रपणे सेवन करतात, किंबहुना तेच आपले जीवन मानतात, त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुधा जिंकल्यासारखेच असते. हे भगवन् ! कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात, त्यांना फक्त क्लेशच क्लेश हाती लागतात, अन्य काही नाही. जसे भुसा कुटणार्‍यांना फक्त श्रमच होतात, तांदूळ मिळत नाहीत. (१-४)

हे अच्युता ! हे अनंता ! या लोकी पूर्वीसुद्धा पुष्कळ योगी होऊन गेले. जेव्हा त्यांनी आपली सर्व कर्मे आपल्याला समर्पित केली, तेव्हा त्या कर्मांनी व आपल्या कथाश्रवणाने त्यांना आपली भक्ती प्राप्त झाली. त्या भक्तीनेच आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्यांनी सहजपणे आपल्या परमपदाची प्राप्ती करून घेतली. हे अनंता ! आपल्या निर्गुण स्वरूपाचा महिमा शुद्ध अंतःकरण असलेलेच जाणू शकतात. विशेष आकाराचा व रूपाचा त्याग करून आत्माकार अंतःकरण झाल्यावर स्वयंप्रकाशरूपाने तो जाणता येतो. एर्‍हवी नाही. ज्या सामर्थ्यवान पुरुषांनी पुष्कळ काळ परिश्रम करून पृथ्वीचे परमाणू, आकाशातील हिमकण व चमकणारी नक्षत्रे यांचीसुद्धा गणती केली असेल, त्यांच्यापैकीसुद्धा असा कोण असू शकेल की, जो जगाच्या कल्याणासाठीच अवतीर्ण झालेल्या सगुण स्वरूपाच्या आपल्या गुणांची गणती करू शकेल ? म्हणून जो मनुष्य अत्यंत उत्सुकतेने आपल्या कृपेची वाट पहात प्रारब्धानुसार प्राप्त होईल, ते सुख किंवा दुःख भोगतो, तसेच कायावाचामनाने स्वतःला आपल्याला समर्पित करून जीवन व्यतीत करतो, तोच मनुष्य आपल्या मोक्षपदाचा अधिकारी होतो. (५-८)

प्रभो ! माझा नीचपणा तर पहा ! आपण अनंत आदिपुरुष परमात्मा आहात आणि मोठमोठे मायावीसुद्धा आपल्या मायेच्या चक्रामध्ये आहेत. असे असूनही मी आपल्यावर आपली माया पसरून माझे ऐश्वर्य दाखविण्याची इच्छा प्रदर्शित केली. प्रभो ! मी आपल्यासमोर केवढा ? अग्नीसमोर ठिणगीची काय गणती ? हे भगवन ! रजोगुणापासून उत्पन्न झाल्यामुळे मी आपल्याला ओळखले नाही. म्हणूनच मी स्वतःला आपल्यापासून वेगळा असा जगाचा स्वामी समजत होतो. मी अजन्मा जगत्कर्ता आहे, या मायाकृत मोहाच्या घनदाट अंधाराने अंध होऊ लागलो होतो. म्हणून आपण मला आपला समजून क्षमा करावी. प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वीरूप आवरणाने घेरलेले हे ब्रह्मांड हेच माझे अवघे सात वितींचे शरीर कोणीकडे आणि जसे झरोक्यातून येणार्‍या सूर्याच्या किरणांमध्ये असंख्य धुळीचे कण उडतांना दिसतात, त्याप्रमाणे ज्यांच्या एकेका रोमातून अशी अगणित ब्रह्मांडे निर्माण होतात, त्या आपला महिमा कोणीकडे ! हे परमात्मन ! बाळ जेव्हा मातेच्या पोटात असते तेव्हा लाथा मारते; परंतु तो मातेचा अपराध ठरतो काय ? ’आहे’ आणि ’नाही’ या शब्दांनी सांगितली जाणारी अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्या उदरात नाही. (९-१२)

वेद म्हणतात की, ज्यावेळी तिन्ही लोक प्रलयकालीन पाण्यामध्ये लीन झालेले होते, त्यावेळी त्या पाण्यात असलेल्या श्रीनारायणांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. त्यांचे हे म्हणणे मुळीच असत्य नाही. तर मग प्रभो ! आपणच सांगा, मी आपला पुत्र नाही काय ? ज्यांच्यापासून माझा जन्म झाला, ते नारायण आपणच नव्हे का ? आपणच नारायण. कारण सर्व जीवांचे आत्मा म्हणून आपण नारायण. (नार=जीवसमूह आणि अयन=आश्रय) आहात. आपण सर्व जीवांचे अधीश्वर म्हणूनही नारायण (नार=जल आणि अयन=प्रवर्तक) आहात. सर्व लोकांचे साक्षी म्हणूनसुद्धा नारायण (नार=जीवसमूह आणि अयन=जाणणारे) आहात. नरापासून उत्पन्न होणार्‍या पाण्यात निवास करीत असल्या कारणाने ज्यांना नारायण (नार=जल आणि अयन=मोवासस्थान) म्हटले जाते, तेसुद्धा आपले एक अंशच आहेत. ते अंशरूपाने दिसणेसुद्धा सत्य नाही, तर आपली मायाच आहे. भगवन ! जर आपले ते नारायणस्वरूप झरे व पाण्यातच असते, तर त्याचवेळी मला कसे दिसले नसते ? आणि मी तपश्चर्या केली, त्याचवेळी माझ्या हृदयात त्याचे दर्शन कसे झाले ? आणि काही क्षणातच ते पुन्हा अंतर्धान कसे पावले ? हे मायेचा नाश करणार्‍या प्रभो ! आता याच अवतारात आपण हे बाहेर दिसणारे सारे जग आपल्या पोटातच मातेला दाखविले. यावरून हे संपूर्ण विश्व आपली माया आहे, हेच सिद्ध होते. जर आपल्यासह हे संपूर्ण विश्व जसे बाहेर दिसते, तसेच आपल्या उदरातसुद्धा दिसले, तर हे सर्व मायेविनाच घडले काय ? आज आपण माझ्यासमोर आपल्या व्यतिरिक्त या विश्वाला आपल्या मायेचा खेळ दाखविला नाही काय ? प्रथम आपण एकटेच होतात. नंतर सर्व गोपाळ, वासरे, काठ्या, शिंकीसुद्धा आपणच झालात. त्यानंतर ती सर्व रूपे चतुर्भुज झाली आणि माझ्यासह सर्व तत्त्वे त्यांची सेवा करू लागली. निरनिराळ्या तितक्याच ब्रह्मांडांचे रूप आपण धारण केले होते. परंतु आता मात्र आपणच अपरिमित अद्वितीय ब्रह्मरूपाने राहिला आहात. (१३-१८)

अजाणतेपणामुळे जे लोक आपल्या स्वरूपाला जाणत नाहीत, त्यांना आपण प्रकृतीमध्ये असलेल्या जीवाच्या रूपाने भासता. आणि त्यांच्यावर आपल्या मायेचा पडदा टाकून सृष्टिनिर्मितीच्या वेळी माझ्या (ब्रह्मा) रूपाने, पालन करतेवेळी आपल्या (विष्णू) रूपाने आणि संहाराच्या वेळी रुद्राच्या रूपाने प्रतीत होता. हे विश्वनिर्मात्या प्रभो ! अजन्मा असूनही आपण देवता, ऋषी, मनुष्य, पशु-पक्षी, जलचर इत्यादि योनींमध्ये अवतार ग्रहण करता, तो दुष्ट पुरुषांची घमेंड नाहीशी करण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी. भगवन ! आपण अनंत, परमात्मा आणि योगेश्वर आहात. ज्यावेळी आपण आपल्या योगमायेचा विस्तार करून लीला करू लागता, त्यावेळी त्रैलोक्यात असा कोण आहे की जो आपली लीला कोठे, कशासाठी, केव्हा आणि किती असते, हे जाणू शकेल ? म्हणून हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे असत्य, अज्ञानरूप आणि दुःखच दुःख देणारे आहे. सच्चिदानंदस्वरूप व अनंत अशा आपल्यामध्ये मायेने उत्पन्न आणि विलीन झाल्यानंतरही आपल्या सत्तेने ते खरे आहे, असे वाटते. प्रभो ! आपणच एकमेव सत्य आहात; कारण आपण सर्वांचे आत्मा आहात. आपण अविनाशी असल्या कारणाने नित्य आहात. आपला आनंद कधीही खंडित होणारा नाही. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. आपण पूर्ण, एक व सर्व उपाधींपासून मुक्त असून अमृतस्वरूप आहात. आपले हे असे स्वरूप सर्व जीवांचेसुद्धा स्वतःचे खरे स्वरूप आहे. जे गुरुरूप सूर्यापासून तत्त्वज्ञानरूप दिव्य दृष्टी प्राप्त करून घेऊन त्यापासून आपल्याला स्वतःच्या रूपात पाहतात ते, या असत्य संसारसागराला जणू पार करून जातात. जे लोक परमात्माच आपला आत्मा आहे असे जाणत नाहीत, त्यांना त्यांच्या त्या अज्ञानामुळेच या नामरूपात्मक अखिल प्रपंचाचा भ्रम होतो. परंतु ज्ञान होताच त्याचा आत्यंतिक लय होतो. जसे दोरीच्या ठिकाणी भ्रमामुळे साप आहे असे वाटते आणि भ्रम निरास होताच साप नाहीसा होतो. (१९-२५)

संसारासंबंधी बंधन आणि त्यापासून मुक्तता ही दोन्ही नावे अज्ञानामुळेच कल्पिलेली आहेत. वास्तविक अज्ञानाचीच ही दोन नावे आहेत. सत्य आणि ज्ञानस्वरूप अशा परमात्म्याशिवाय यांना वेगळे अस्तित्व नाही. जसे सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र असा भेद नाही, त्याचप्रमाणे विचार केला असता अखंड चित्स्वरूप केवळ शुद्ध आत्मतत्त्वामध्ये बंधन नाही की मोक्ष नाही. आपण स्वतःचा आत्मा असून लोक आपल्याला परका मानतात, आणि शरीर इत्यादि जे परके आहेत, त्यांना आत्मा समजतात; शिवाय आपल्याला दुसरीकडे शोधू लागतात. पहा ना ! अज्ञानी जीवांचे हे केवढे अज्ञान ! हे अनंता ! ज्ञानी लोक आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतीत होते, त्याचा त्याग करीत स्वतःच्या शरीरातच आपला शोध घेतात; कारण जरी दोरीमध्ये साप नसला, तरीसुद्धा जाणवणारा तो साप खोटा आहे असा निश्चय केल्याशिवाय, विचारी मनुष्य खर्‍या दोरीला कसे जाणू शकेल ? (२६-२८)

हे भगवंता ! आपल्या चरणकमलांचा थोडासाही कृपाप्रसाद मिळालेला मनुष्यच आपल्या महिम्याचे रहस्य जाणू शकतो. दुसरा कोणीही पुष्कळ काळपर्यंत ते शोधत राहिला, तरी जाणू शकत नाही. म्हणून हे नाथ ! मला या जन्मामध्ये किंवा कोणत्याही पशु-पक्षी इत्यादिंच्या जन्मामध्येसुद्धा असे सौभाग्य प्राप्त होवो की मी आपल्या दासांपैकी एखादा दास होऊन आपल्या चरणकमलांची सेवा करावी. हे प्रभो ! आजपर्यंत जगात केलेले मोठमोठे यज्ञ आपल्याला तृप्त करू शकले नाहीत. (म्हणूनच की काय) आपण वासरे आणि बालक होऊन व्रजातील गायी आणि गौळणींचे दूधरूप अमृत मोठ्या आवडीने प्यालात. खरेच, त्यांचे केवढे हे भाग्य ! अहो ! नंद इत्यादि व्रजवासी गोप धन्य होत. केवढे त्यांचे भाग्य ! कारण परमानंदस्वरूप सनातन पूर्ण ब्रह्म असे आपण त्यांचे संबंधी आहात. हे अच्युता ! या व्रजवासियांच्या भाग्याचा महिमा लांबच राहो. मन इत्यादि अकरा इंद्रियांच्या देवतांच्या रूपाने राहणारे महादेवादि आम्हीसुद्धा अतिशय भाग्यवान आहोत; कारण या व्रजवासियांच्या मन इत्यादि इंद्रियांचे पेले करून आम्ही आपल्या चरणकमलांच्या अमृतापेक्षाही गोड, मदिरेपेक्षाही मादक, मधुर अशा मकरंदाचे वारंवार पान करीत आहोत. प्रभो ! या व्रजभूमीतील कोणत्याही वनामध्ये आणि विशेषेकरून गोकुळामध्ये कोणत्याही योनीमध्ये आमचा जन्म सिद्ध होवो, ती आमच्यासाठी मोठी भाग्याचीच गोष्ट ठरेल. कारण इथे जन्म झाल्यावर आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी भक्ताच्या चरणांची धूळ आमच्यावर पडेलच की, जी वेदसुद्धा अनादि कालापासून आजपर्यंत धुंडीतच आहेत. कारण या व्रजवासियांचे संपूर्ण जीवनच आपण आहात. हे देवा ! या व्रजवासियांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात आपण संपूर्ण फलस्वरूप अशा आपल्यापेक्षा अधिक कोणते फळ कोठून द्याल, याचा विचार करून माझे चित्त गोंधळात पडले आहे. आपण त्यांना आपले स्वरूप देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ म्हणाल, तर तेही शक्य नाही. कारण आपले स्वरूप तर त्या पूतनेनेसुद्धा भक्त असल्याचा केवळ बहाणा करून आपल्या आप्तांसह प्राप्त करून घेतले. आणि येथे तर यांनी आपले घर, धन, स्वजन, प्रिय, शरीर, पुत्र, प्राण, मन इत्यादि सर्वकाही आपल्यालाच समर्पित केले आहे. हे श्रीकृष्णा ! जोपर्यंत जीव तुमचा होत नाही, तोपर्यंत राग द्वेषादि चोर राहतात, घर तुरुंग बनते आणि मोह पायातील बेडीप्रमाणे जखडून ठेवतो. हे प्रभो ! आपण प्रपंचरहित असूनसुद्धा शरणागत भक्तांना आनंद देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेऊन प्रपंचाला अनुसरून वागता. हे प्रभो ! फार काय सांगावे ! जे लोक आपला महिमा जाणणारे असतील, ते खुशाल जाणोत. माझे मन, वाणी आणि शरीर तर आपला महिमा जाणण्यास सर्वथैव असमर्थ आहे. हे श्रीकृष्णा ! आपण सर्वांचे साक्षी आहात; आपण सर्वकाही जाणताच ! आपणच सर्व जगाचे स्वामी आहात. हे संपूर्ण विश्व आपल्यामध्येच राहिलेले आहे. आता मला अनुज्ञा द्यावी. हे भगवन श्रीकृष्ण ! आपण यदुवंशरूपी कमळाला विकसित करणारे सूर्य आहात. तसेच पृथ्वी, देव, ब्राह्मण आणि पशुरूप समुद्राची अभिवृद्धी करणारे चंद्र आहात. आपण पाखंडी लोकांचा धर्मरूप अंधकार नष्ट करणारे आहात. पृथ्वीवर राहणार्‍या राक्षसांना नष्ट करणारे आपण सूर्यादिकांनासुद्धा पूजनीय आहात. भगवन ! माझे कल्पांतापर्यंत आपल्याला नमस्कार असोत. (२९-४०)

श्रीशुकदेव म्हणतात - जग निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. यानंतर तीन वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि नंतर ते आपल्या इष्ट स्थानी गेले. भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना निरोप दिला आणि पूर्वीच्या जागी असलेल्या वासरांना घेऊन ते जिथे त्यांनी आपल्या मित्रांना सोडले होते, त्या आपल्या वाळवंटात आले. परीक्षिता ! आपले जीवनसर्वस्व असणार्‍या श्रीकृष्णांच्या वियोगामध्ये जरी एक वर्ष निघून गेले होते, तरीसुद्धा त्या मुलांना ती वेळ अर्ध्या क्षणासारखीच वाटली. कारण ते भगवंतांच्या मायेने मोहित झाले होते ना ! जगातील सर्व जीव त्याच मायेने मोहित झाल्यामुळेच वारंवार आपल्याच आत्म्याला विसरतात. मायेने चित्त मोहित झालेले जीव येथे काय काय म्हणून विसरत नाहीत बरे ! (४१-४४)

श्रीकृष्णांना पाहताच अतिशय उतावळेपणाने ते मित्र म्हणाले - "बंधो ! ये. तुझे स्वागत असो ! आम्ही तुझ्याशिवाय एक घाससुद्धा खाल्ला नाही. आता आनंदाने जेवू या." तेव्हा हसत हसत भगवंतांनी त्या मुलांबरोबर जेवण केले आणि त्यांना अजगराचे कातडे दाखवून ते वनातून व्रजाकडे परत आले. श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोरपिसांचा मुगुट असून गळ्यात फुलांच्या माळा होत्या. रंगीत धातूंनी शरीरावर चित्रे काढली होती. ते उच्च स्वराने बासरी, पाने आणि शिंगे वाजवत आनंदोत्सव साजरा करीत होते. गोपाळ त्यांच्या पाठोपाठ चालत त्यांची लोकपावन कीर्ति गात होते. मधून मधून वासरांना हाकारीत त्यांनी व्रजात प्रवेश केला. त्यांना पाहताच गोपींच्या डोळ्यांत आनंद मावेना. त्याच दिवशी मुलांनी व्रजामध्ये जाऊन सांगितले की, "आज या यशोदा-नंद-नंदनाने भयंकर मोठा अजगर मारून त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवले." (४५-४८)

परीक्षित म्हणाला - ब्रह्मन् ! श्रीकृष्ण स्वतःचा पुत्र नसून इतर गोपगोपींचे त्याच्यावर इतके र्पेम कसे होते ? इतके प्रेम तर त्यांचे स्वतःच्या मुलांवरही नव्हते. याचे कारण काय, ते सांगावे. (४९)

श्रीशुकदेव म्हणतात - राजन ! जगातील सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात. पुत्र, धन, इत्यादिंवर जे प्रेम असते, ते त्या वस्तू आत्म्याला प्रिय वाटतात म्हणून. हे राजेंद्रा ! म्हणूनच सर्व प्राण्यांचे आपल्या आत्म्यावर जितके प्रेम असते, तितके आपले म्हटल्या जाणार्‍या पुत्र, धन, घर इत्यादिंवरही असत नाही. हे नृपश्रेष्ठा ! जे लोक देहालाच आत्मा मानतात, ते सुद्धा आपल्या शरीरावर जेवढे प्रेम करतात, तेवढे शरीराशी संबंधित असणार्‍यांवर करीत नाहीत. जेव्हा विचारांती असे समजते की, "हे शरीर म्हणजे मी नाही, हे शरीर माझे आहे" तेव्हा या शरीरावरसुद्धा आत्म्याइतके प्रेम राहात नाही. म्हणूनच तर देह आसन्नमरण झाल्यावरसुद्धा जगण्याची आशा प्रबळ असतेच. (तात्पर्य, देह जाणार, हे निश्चित झाल्यावरही तो राहावा, असे वाटते ते आत्म्यासाठीच.) यवरून हे सिद्ध होते की, सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात. या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मा समज. जगाच्या कल्याणासाठीच मायेचा आश्रय घेऊन ते येथे देह धारण करणार्‍यासारखे वाटतात. जे लोक श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात, त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत, ते सर्व श्रीकृष्णस्वरूपच आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही. सर्व वस्तू आपल्या कारणातच राहात असतात. त्या कारणाचे सुद्धा परम कारण भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आता सांग, कोणत्या वस्तूला श्रीकृष्णांपेक्षा वेगळी म्हणावे ? सत्पुरुषांचे सर्वस्व असणार्‍या पुण्यकीर्ति मुरारींच्या पदपल्लवरूपी नौकेचा ज्यांनी आश्रय घेतला, त्यांच्या दृष्टीने हा भवसागर, वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्यातील पाण्याएवढाच आहे. त्यांना परमपदाची प्राप्ती खात्रीने होते आणि संकटांचे निवासस्थान अशा या संसारात यावे लागत नाही. (५०-५८)

तू मला विचारले होतेस की, भगवंतांनी पाचव्या वर्षी केलेली लीला, बालगोपालांनी सहाव्या वर्षी कशी सांगितली ? त्याचे हे सर्व रहस्य मी तुला सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी बाल-गोपालांबरोबर केलेला वनविहार, अघासुराचा वध, हिरवळीवरचे जेवण, वासरे व गोपालांचे अलौकिक चिद्‌विलासरूप आणि ब्रह्मदेवांनी केलेली ही श्रेष्ठ स्तुती - हे सर्व जो मनुष्य ऐकतो आणि कथन करतो, त्याला सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कुमार अवस्थेला अनुरूप असे लपंडाव, सेतुबंधन, वानरांप्रमाणे उढ्या मारणे इत्यादि अनेक खेळ खेळत आपली कुमार अवस्था व्रजामध्येच संपविली. (५९-६१)

अध्याय चौदावा समाप्त

GO TOP