श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ११ वा

यमलार्जुनांचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! वृक्ष पडताना जो प्रचंड आवाज झाला, तो ऐकून नंदादिक गोप वीजच पडली की काय असे वाटून तेथे आले. तेथी गेल्यावर त्या लोकांना, दोन्ही अर्जुनवृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. वृक्ष उनळून पडण्याचे कारण जरी कळण्यासारखे होते, तरी ते स्पष्ट न कळल्याने त्यांची बुद्धी चक्रावून गेली. तेथे त्यांच्या समोरच दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत होता. "हे कोणाचे काम आहे, ही आश्चर्यकारक घटना कशी काय घडली ? असा विचार करून ते भयभीत झाले. (१-३)

तेथे असलेली मुले म्हणाली - "अहो, याचेच हे काम आहे. हा दोन्ही वृक्षांच्या मधून जात होता. उखळ तिरपे झाल्यावर याने जोराने ओढले आणि झाडे उन्मळून पडली. त्यातून बाहेर पडलेले दोन पुरुषसुद्धा आम्ही पाहिले." परंतु गोपांनी मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणू लागले - "एवढा लहानसा मुलगा, इतकी मोठी झाडे पाडील हे कधीच शक्य नाही. श्रीकृष्णाच्या अगोदरच्या लीलांची आठवण येऊन कोणाकोणाला ती शक्यताही वाटू लागली. नंदांनी पाहिले की, त्यांच्या दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत घेऊन चालला आहे. ते हसू लागले आणि त्यांनी लागलीच त्याला सोडवले. कधी कधी गोपींनी फूस लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत. कधी भाबडेपणाने गाऊ लागत. जणू ते त्यांच्या हातातील कठपुतळी झाले होते. कधी त्यांच्या आज्ञेवरून पाट आणीत, तर कधी तराजू आणीत. कधी पादत्राणे आणीत तर कधी आपल्या लोकांना आनंदीत करण्यासाठी दंड थोपटीत. भगवान अशा प्रकारे बाललीलांनी व्रजवासियांना आनंदित करीत आणि जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत, त्यांना असे दाखवीत की, आपण आपल्या सेवकांच्या अधीन असतो. (४-९)

एके देवशी एक फळे विकणारी बाई "फळे घ्या फळे" म्हणत आली. हे ऐकताच सर्व फळे देणारा अच्युत फळे खरेदी करण्यासाठी ओंजळीत धान्य घेऊन गेला. त्याच्या ओंजळीतून धान्य वाटेतच सांडले; पण फळे विकणार्‍या बाईने मात्र त्याचे दोन्ही हात फळांनी भरून टाकले. इकडे भगवंतांनी तिची फळांची टोपली रत्‍नांनी भरून टाकली. (१०-११)

एके दिवशी यमलार्जुन वृक्ष पाडणारा श्रीकृष्ण आणि बलराम मुलांसह खेळत खेळत यमुनेच्या तीरावर गेले आणि खेळातच दंग झाले. तेव्हा रोहिणीदेवीने त्यांना हाका मारल्या. परंतु खेळात रमल्यामुळे रोहिणीच्या बोलावण्याने ते आले नाहीत. तेव्हा रोहिणीने मुलाचे लाड करणार्‍या यशोदेला पाठवले. श्रीकृष्ण आणि बलराम मुलांबरोबर पुष्कळ वेळ खेळत होते. यशोदेने जाऊन त्यांनी मोठ्याने हाका मारल्या. त्यावेळी पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनांतून दूध झिरपत होते. "ए लाडक्या कृष्णा ! कमलनयना ! बाळा ये, दूध पी. खेळून खेळून दमला असशील. आता खेळ पुरे कर. भुकेने तू कासावीस झाला असशील. बाळ रामा ! कुलनंदना ! ये. लहान भावाला घेऊन लगेच ये. पहा, पुत्रा, आज तू अगदी सकाळीच न्याहारी केली होतीस. आता तू जेवायला चल. बलरामा ! बाबा भोजनासाठी पानावर बसले आहेत. ते तुमची वाट पहात आहेत. या, आणि आम्हांला आनंद द्या. मुलांनो ! आता तुम्हीही आपापल्या घरी जा. मुलांनो पहा तर खरे, तुमचे अंग कसे धुळीने माखले आहेते ! लवकर स्नान करा. आज तुमचे जन्मनक्षत्र आहे. आंघोळ करून ब्राह्मणांना गोदान करा. पहा ! पहा ! तुमच्या मित्रांना त्यांच्या आयांनी न्हाऊ-माखू घालून कसे सुंदर सुंदर दागिने घातले आहेत ते. आता तुम्हीसुद्धा न्हाऊन छान छान कपडे घालून, खाऊन, पिऊन मग खेळायला जा. परीक्षिता ! चराचराचे शिरोमणी असलेल्या भगवंतांना प्रेमामुळे ती आपला पुत्र समजत होती. तिने एका हाताने बलरामाला आणि दुसर्‍या हाताने श्रीकृष्णाला पकडून त्यांना ती आपल्या वाड्यात घेऊन आली. नंतर तिने मुलांना न्हाऊ घालून त्यांचे औक्षण केले. (१२-२०)

नंदादि वृद्ध गोपांनी महावनामध्ये मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत, असे पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केले पाहिजे, याविषयी विचारविनिमय सुरू केला. त्यापैकी उपनंद नावाचा वयाने व ज्ञानाने मोठा एक गोप होता व तो देश, काल व परिस्थिती यांचे रहस्य जाणणारा असून राम-कृष्णांचे कल्याण इच्छिणारा होता. तो म्हणाला, सध्या येथे मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत. ती मुख्यतः लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहेत. म्हणून, गोकुळ आणि गोकुळवासी यांचे कल्याण इच्छिणार्‍या आपण इथून दुसरीकडे गेले पाहिजे. पहा ! मुलांना मारणार्‍या राक्षसीच्या तडाख्यातून हा मुलगा कसाबसा वाचला. त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच याच्यावर हा मोठा छकडा पडला नाही. वादळरूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटातच टाकले होते. तेथून पुन्हा हा दगडावर आपटला, तेव्हासुद्धा देवाने याला वाचवले. यमलार्जुनांच्या मध्ये येऊनसुद्धा हा किंवा दुसरे मूल मेले नाही. हे सुद्धा भगवंतांनीच आमचे रक्षण केल्यामुळे. म्हणून जोपर्यंत एखादे फार मोठे अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करीत नाही, तोपर्यंतच आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार येथून दुसरीकडे निघून जाऊ. वृंदावन नावाचे एक वन आहे. तेथे पवित्र पर्वत, गवत आणि वनस्पती आहेत. ते आमच्या जनावरांसाठी हितकारक आहे. गोप, गोपी आणि गाईंसाठी ते योग्य स्थान आहे. जर हे म्हणणे तुम्हांला पटत असेल, तर आजच आपण तिकडे जावयास निघू. उशीर करू नका. छकडे जोडा आणि आमची गुरे-वासरे पुढे जाऊ देत. (२१-२९)

उपनंदाचे म्हणणे ऐकून सर्व गोप एकमताने ’छान ! छान !’ म्हणाले. त्यांनी आपल्या गाईंचे कळप एकत्रित केले आणि छकड्यांवर सर्व सामग्री ठेवून ते वृंदावनाकडे निघाले. परीक्षिता ! गवळ्यांनी वृद्ध, मुले, स्त्रिया यांना आणि सर्व सामान छकड्यांवर ठेवले आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्यबाण घेऊन अत्यंत सावधानपणे चालू लागले. गाई-वासरांनी त्यांनी पुढे घातले आणि त्यांच्या पाठोपाठ रणशिंगे आणि तुतार्‍या जोरजोराने वाजवीत पुरोहितांसह ते चालले. वक्षःस्थळांवर ताजी केशराची उटी लावून, सुंदर वस्त्रे परिधान करून, गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून, रथांवर बसलेल्या गोपी आनंदाने श्रीकृष्णांच्या लीला गात चालल्या होत्या. तसेच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका छकड्यात बसल्या होत्या. त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे बोल ऐकण्यात गुंग झाल्या होत्या. सर्वकाळ आनंद देणार्‍या वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्धचंद्रकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या. परीक्षिता ! वृंदावन, गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाळवंट पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांना खूप आनंद झाला. (३०-३६)

दोघेही राम-कृष्ण आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलण्याने व्रजवसियांना आनंद देत योग्य वेळी वासरे चारावयास नेऊ लागले. गवळ्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडत आणि व्रजभूमी जवळच वासरांना चारीत. ते कधी बासरी वाजवीत, तर कधी गोफणीने दगड फेकीत. काही वेळा आपल्या पायातील घुंघरांच्या नादावर नाचत तर कधी गाय-बैलांचे सोंग घेऊन खेळत. कधी वळू बनून हंबरत. आपापसात लढत तर कधी पशु-पक्ष्यांचे आवाज काढून सामान्य मुलांसारखे खेळत. (३७-४०)

एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांबरोबर यमुनातटावर वासरे चारीत असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आला. श्रीकृष्णांनी पाहिले की, हा खोट्या वासराचे रूप घेऊन वासरांच्या कळपात शिरला आहे. त्यांनी बलरामाला दाखविले आणि हळू हळू ते त्याच्यावर भाळल्यासारखे दाखवून त्याच्याजवळ पोहोचले. श्रीकृष्णांनी शेपटासह त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला आकाशात फिरविले आणि मेल्यानंतर कवठाच्या झाडावर आपटले. त्याचे ते लांब-रुंद दैत्यशरीर कवठाची कित्येक फळे पाडत स्वतः खाली पडले. हे पाहून मुलांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. "वाः ! वाः !" करून ते कन्हैय्याची प्रशंसा करू लागले. देवसुद्धा आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले. (४१-४४)

जे सर्व लोकांचे एकमेव रक्षक आहेत, तेच आता गुराखी बनले. ते पहाटेच उठून न्याहारीचे पदार्थ घेऊन वासरांना चारीत वनात फिरत असत. एके दिवशी गवळ्यांची मुले आपापल्या वासरांचे कळप घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले. त्यांनी अगोदर वासरांना पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः पाणी प्याले. त्या मुलांनी, तेथे एक प्रचंड प्राणी बसलेला पाहिला.तो जणू काही व्रजाने तुटून पडलेला पर्वताचा तुकडाच वाटत होता. तो बक नावाचा एक मोठा असुर होता. तो बक नावाचा एक मोठा असुर होता. त्याने बगळ्याचे रूप घेतले होते. त्याची चोच अत्यंत तीक्षण होती आणि तो अतिशय बलवान होता. त्याने एकदम झेप घेऊन श्रीकृष्णाला गिळून टाकले. जेव्हा बलराम वगैरे मुलांनी बगळ्याने श्रीकृष्णाला गिळून टाकलेले पाहिले, तेव्हा प्राण निघून गेल्यावर इंद्रियांची जशी अवस्था होते, तशी त्यांची अवस्था झाली. पितामह ब्रह्मचेवाचासुद्धा पिता असलेला तो गोपाल-बालक जेव्हा बगळ्याच्या टाळूखाली पोहोचला, तेव्हा तो आगीप्रमाणे त्याची टाळू जाळू लागला. म्हणून त्या दैत्याने श्रीकृष्णाला शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न करता लगेच बाहेर टाकले आणि नंतर अतिशय क्रोधाने आपल्या कठोर चोचीने त्यांना मारण्यासाठी तो त्यांच्यावर तुटून पडला. कंसाचा मित्र बकासुर भक्तवत्सल श्रीकृष्णांवर झडप घालणार, इतक्यात दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या आणि मुलांच्या देखत गवताची काडी फाडावी तसे त्याला फाडले. यामुळे देवांना आनंद झाला. तेव्हा सर्व देव श्रीकृष्णांबर नंदवनातील मोगरा इत्यादि फुलांचा वर्षाव करू लागले. तसेच नगारे, शंख इत्यादि वाजवून आणि स्तोत्रांनी त्यांना प्रसन्न करू लागले. हे पाहून गवळ्यांची मुले आश्चर्यचकित झाली. श्रीकृष्ण बगळ्याच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून बलराम वगैरेंना आनंद झाला. जणू प्राणाचा संचार झाल्याने इंद्रियांत चैतन्य यावे. त्यांनी श्रीकृष्णांना मिठ्या मारल्या. नंतर आपापली वासरे वळवून सर्वजण व्रजामध्ये आले आणि तेथे त्यांनी घरच्या लोकांना सर्व घटना सांगितली. (४५-५३)

ते ऐकून गोपी-गोप आश्चर्यचकित झाले. कन्हैया जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला, असे वाटून अतिशय उत्सुकता, प्रेम आणि आदराने ते श्रीकृष्णांना अतृप्त नेत्रांनी निरखून पाहू लागले. ते आपापसात म्हणू लागले - "पहा ना ! या बालकाला किती वेळा मृत्युमुखात जावे लागले ! परंतु ज्यांनी याचे अनिष्ट करण्याचे इच्छिले, त्यांचेच अनिष्ट झाले; कारण त्यांनी पहिल्यापासूनच दुसर्‍यांचे वाईट केले होते. एवढे सगळे होऊनही ते भयंकर असुर याचे काहीच वाकडे करू शकले नाहीत. याला मारण्याच्या उद्देशाने येतात, परंतु ज्योतीवर झडप घालणार्‍या पतंगाप्रमाणे स्वतःच नष्ट होतात. ब्रह्मवेत्त्या महात्म्यांची वचने खोटी होत नाहीत, हेच खरे ! पहा ना ! महात्म्या गर्गाचार्यांनी जे सांगितले होते, ते सर्व तंतोतंत खरे ठरले." अशा प्रकारे नंद इत्यादि गोपगण मोठ्या आनंदाने राम-कृष्णांसंबंधी गोष्टी करीत. ते त्यात इतके तन्मय होऊन जात की, त्यांना संसारातील दुःखांचा विसर पडे. अशाप्रकारे कृष्ण आणि बलराम गवळ्यांच्या मुलांबरोबर कधी लपंडाव खेळत, कधी पूल बांधीत तर कधी वानरांप्रमाणे उड्या मारीत. अशाप्रकारे बालोचित खेळ खेळून त्या दोघांनी व्रजामध्ये आपली बाल्यावस्था व्यतीत केली. (५४-५९)

अध्याय अकरावा समाप्त

GO TOP