श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १२ वा

अघासुराचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - एके दिवशी नंदनंदनाने वनातच भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजाने बरोबरीच्या गवळ्यांच्या मुलांना जागविले आणि वासरांना पुढे करून तो व्रजमंडलातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुले सुंदर शिंकी, वेताच्या काठ्या, तुतार्‍या आणि बासर्‍या घेऊन तसेच आपली हजारो वासरे बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली. श्रीकृष्णाच्या असंख्य वासरांत आपापली वासरे मिसळून त्यांना चारीत ठिकठिकाणी बाललीला करीत ते चालू लागले. त्या मुलांची जरी काचा, गुंजा, रत्‍ने आणि सोन्याचे दागिने आंगावर घातले होते, तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळे, पालवी, रंगी-बेरंगी फुले, मोरपंख तसेच गेरूसारख्या रंगीत मातीनेही स्वतःला सजविले होते. कोणी एखाद्याचे शिंके चोरून घेई, तर कोणी कोणाची काठी किंवा बासरी ! जेव्हा त्याच्या मालकाला हे कळे, तेव्हा ते घेणारा दुसर्‍याकडे लांब फेकीत असे, दुसरा तिसर्‍याकडे आणि तिसरा आणखी लांब चौथ्याकडे. नंतर ते हसत हसत ज्याचे त्याला देत. श्रीकृष्ण जरा वनाची शोभा पहात थोडा जरी पुढे निघून गेला तर "अगोदर मी त्याला शिवणार ! अगोदर मी शिवणार !" असे म्हणत सर्वजण त्याच्याकडे पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात. कोणी बासरी वाजवीत, तर कोणी शिंगे फुंकीत, कोणी कोणी भ्रामरांच्याबरोबर गुणगुणत तर कोणी कोकिळांच्यासारखे "कुहु-कुहु" करीत. काही मुले आकाशात उडणार्‍या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत, तर काहीजण हंसांच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीने चालत. काहीजण बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखेच डोळे मिटत बसत, तर काहीजण मोरांना नाचताना पाहून त्यांच्याचसारखे नाचत. काहीजण वानरांचे शेपूट धरून ओढीत तर दुसरे त्यांच्याबरोबरीने झाडांवर चढत. काहीजण त्यांच्यासारख्या माकडचेष्टा करीत तर दुसरे काही त्यांच्या बरोबरीने एका डहाळीवरून दुसर्‍या डहाळीवर उड्या मारीत. काही मुले नदीच्या प्रवाहात बेडकांबरोबर पोहोत त्यांना मागे टाकून पुढे जात, कोणी पाण्यात आपली प्रतिबिंबे पाहून त्यांना हसत; तर काहीजण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावे ठेवत. श्रीकृष्ण ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहेत, दास्य करणार्‍या भक्तांचे ते आराध्यदैवत आहेत, आणि मायेने मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने मनुष्य-बालक आहेत. त्याच भगवंतांच्याबरोबर ते पुण्यात्मे बालक खेळत होते. पुष्कळ जन्म श्रम करून जितेंद्रिय योग्यांनाही ज्यांच्या चरणकमलांची धूळ मिळणेही शक्य नाही, तेच भगवान व्रजवासी गवळ्यांना आपणहून दर्शन देत आहेत, त्यांच्या भाग्याचा महिमा काय वर्णावा ? (१-१२) एवढ्यात अघासुर नावाचा महान दैत्य येऊन थडकला. त्याला त्या मुलांची चाललेली सुखमय क्रीडा पाहवली नाही. तो इतका भयंकर होता की, अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पहात. होते. अघासुर हा पूतना आणि बकासुराचा लहान भाऊ असून कंसाने त्याला पाठविले होते. श्रीकृष्ण इत्यादि मुलांना पाहून तो विचार करू लागला की, ’माझ्या सख्ख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच होय. म्हणून आज मी याला बलरामासह मारून टाकीन. हे जर मरून माझ्या भाऊ-बहिणीसाठी तिलांजली बनले, तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील. कारण संतान हेच प्राण्यांचे प्राण होत. जर प्राणच राहिले नाहीत, तर शरीराची काळजी कशाला ?’ असा निश्चय करून त्या दुष्ट दैत्याने प्रचंड अजगराचे रूप धारण करून तो रस्त्यावर पडून राहिला. त्याचे ते शरीर एक योजन लांब व मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड होते. ते अत्यंत अद्‌भुत होते. सर्व बालकांना गिळून टाकावे, या इच्छेने त्याने गुहेप्रमाणे आपले अवाढव्य तोंड उघडून ठेवले होते. त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वर्चा ओठ आभाळाला टेकला होता. त्याचे जबडे गुहांप्रमाणे होते आणि दाढा पर्वतशिखराप्रमाणे वाटत होत्या. तोंडात घोर अंधकार होता. लांबलचक जीभ सडकेप्रमाणे दिसत होती. श्वास तुफानाप्रमाणे आणि डोळे दावाग्नीप्रमाणे धगधगत होते. (१३-१७) अघासुराचे असे रूप पाहून मुलांना वाटले की, हा सुद्धा वृंदावनाचाच एखादा देखावा असावा. ते गमतीने कल्पना करू लागले की, हे अजगराचे उघडलेले तोंड तर नसेल ! कोणी म्हणू लागला, ’मित्रांनो ! सांगा पाहू ! हा जो आमच्यासमोर एकाद्या जीवाप्रमाणे बसला आहे, तो आम्हांला गिळून टाकण्यासाही अजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे दिसत नाही का ?’ दुसरा म्हणाला. ’सूर्याची किरणे पडल्याने खरोखरच हे जे लाल झालेले ढग दिसत आहेत, ते असे वाटत आहेत की, तो याचा वरचा ओठ आहे; आणि त्याच आभाळाच्या सावलीने ही जी जमीन लाल दिसत आहे, तो त्याचा खालचा ओठ आहे.’ तिसरा म्हणाला, "होय ! खरेच आहे ! पहा ना ! या डाव्या-उजव्या बाजूच्या गुहा अजगराच्या जबड्यांसारख्या नाहीत काय. आणि ही उंच उंच शिखरे तर त्याच्या दाढाच वाटतात." चौथा म्हणाला, "अरे मित्रा ! ही लांब-रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखी वाटते आणि या पर्वत शिखरांच्यामधील अंधकार तर त्याच्या तोंडातील आतल्या भागावरही मात करीत आहे." आणखी एकाने म्हटले, "पहा ! पहा ! या जंगलाला आग लागल्यामुळे ही गरम, जळजळीत हवा येऊ लागली आहे. ती म्हणजे या अजगराचा श्वासच वाटतो. आणि त्या आगीने जळालेल्या प्राण्यांची दुर्गंधी तर अशी वाटत आहे, की जणू काही अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मासाचीच ती दुर्गंधी आहे." मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला - "आम्ही जर याच्या तोंडात शिरलो, तर हा आम्हांला गिळून टाकील काय ? अरे ! हा काय गिळून टाकणार ? जर याने तशी आगळीक केली, तर मग हा एका क्षणात कृष्णाकडून बकसासुरा प्रमाणे मारला जाईल. असे म्हणत ती मुले बकासुरालाला मारणार्‍या श्रीकृष्णांचे सुंदर मुख पाहात पाहात टाळ्या पिटीत मोठ्याने हसत हसतच अघासुराच्या तोंडात घुसली. त्या अज्ञानी मुलांनी आपापसात केलेली भ्रामक वक्तव्ये ऐकून भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की, "अरे, यांना हा खरा अजगरसुद्धा खोटा वाटतो." सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करणार्‍या त्यांनी, तो राक्षस आहे, हे ओळखून आपल्या मित्रांना त्याच्या तोंडात जाण्यापासून अडविण्याचे ठरविले. तेवढ्यात सारी मुले वासरांसह त्या असुराच्या पोटात घुसली. परंतु अघासुराने त्यांना गिळले नाही. कारण आपल्या भाऊ-बहिणीच्या वधाची आठवण होऊन, त्यांना मारणारा श्रीकृष्ण केव्हा मुखात येईल, याचीच अघासुर वाट पाहात होता. सर्वांना अभय देणार्‍या श्रीकृष्णांनी, पाहिले की, ज्यांचे रक्षण करणारे केवळ आपणच, ती बिचारी मुले आपल्या हातातून निसटून मृत्युरूप अघासुराच्या जठराग्नीचे भक्ष्य बनली. तेव्हा दैवाच्या या विचित्र लीलेचा त्यांना विस्मय वाटला आणि त्यांचे हृदय दयेने द्रवले. ते विचार करू लागले, ’आता काय करावे ? ज्यामुळे या दुष्टाचा मृत्यू तर व्हावा आणि या भाबड्या मुलांची हत्यासुद्धा होऊ नये. ही दोन्ही कामे कशी होऊ शकतील ?" सर्व काही प्रत्यक्ष पाहणार्‍या श्रीहरींनी काय करायचे ते ठरवून ते स्वतः त्याच्या मुखात शिरले. त्या वेळी ढगांआड लपलेल्या देवता भितीने "हाय ! हाय !" म्हणू लागल्या आणि अघासुराचे हितैषी कंस वगैरे राक्षस आनंदित झाले. (१८-२९) अघासुर, वासरे आणि मुले यांच्यासह श्रीकृष्णांना आपल्या दाढांनी चावून त्यांचे पीठ करू इच्छित होता, परंतु त्याचवेळी अविनाशी श्रीकृष्णांनी, देवतांचा हाहाकार ऐकून अत्यंत वेगाने आपले शारीर त्याच्या गळ्यात नेऊन खूप फुगविले. यानंतर भगवंतांच्या शरीरामुळे, त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वासमार्ग बंद झाला. बुबुळे उलटी झाली. तो व्याकूळ होऊन इकडेतिकडे वळवळू लागला. शेवटी आतल्या आत रोखला गेलेला श्वास ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला. त्याच मार्गाने त्याची सर्व इंद्रियेसुद्धा शरीरातून बाहेर पडली. त्याच वेळी भगवन मुकुंदांनी आपल्या अमृतदृष्टीने मेलेली वासरे व मित्र यांना जिवंत केले आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन ते अघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले. त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक अद्‌भुत अशी मोठी ज्योत बाहेर पडली. त्यावेळी त्या ज्योतीच्या प्रकाशाने दाही दिशा झगमगल्या. ती थोडावेळ आकाशात स्थिर होऊन भगवंतांच्या बाहेर येणाची वाट पाहू लागली. जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा ती ज्योत सर्व देवतांच्या देखत त्यांच्यामध्ये मिसळून गेली. त्यावेळी देवतांनी फुलांचा वर्षाव करून, अप्सरांनी नृत्य करून, गंधर्वांनी गाऊन, वादकांनी वाद्ये वाजवून, ब्राह्मणांनी स्तुतिपाठ म्हणून आणि पार्षदांनी जयजयकार करून अतिशय आनंदाने भगवान श्रीकृष्णांचे पूजन केले. कारण त्यांनी अघासुराला मारून त्या सर्वांवर मोठे उपकार केले होते. ते अद्‌भुत स्तुतिपाठ, सुंदर वाद्ये, मंगलमय गीते, जयजयकार इद्यादि आनंदोत्सवाचे अनेक मंगल ध्वनी ब्रह्मलोकी जाऊन पोहोचले. ते ऐकून ब्रह्मदेव ताबडतोब तेथे आले आणि श्रीकृष्णांचा हा महिमा पाहून चकित झाले. परीक्षिता ! जेव्हा अजगराचे ते अद्‌भुत कातडे वृंदावनात सुकून गेले, तेव्हा ते व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसपर्यंत खेळण्याची एक अद्‍भुत गुहा बनून राहिले होते.भगवंतांनी हे जे आपल्याला मृत्यूरूप अजगराच्या मुखातून वाचविले होते आणि अघासुराला संसार बंधनातून सोडविले होते, ती लीला भगवंतांनी आपल्या कुमार अवस्थेत म्हणजेच वयाच्या पाचव्या वर्षीच केली होती. परंतु पौगंड अवस्थेत म्हणजे सहाव्या वर्षी त्यांनी आश्चर्यचकित होऊन व्रजामध्ये येऊन ती नुकतीच घडल्याचे सांगितले. अघासुर मूर्तिमंत अघ (पाप)च होता. भगवंताच्या केवळ स्पर्शाने त्याची सर्व पापे धुतली गेली आणि त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणारी सारूप्यमुक्तीची प्राप्ती झाली. परंतु ही आश्चर्याची गोष्ट नाही; कारण माणसाच्या बालकासारखी लीला रचणारे हे तेच परमपुरुष परमात्मा आहेत, जे व्यक्त-अव्यक्त आणि कार्यकारणरूप अशा सर्व विश्वाचे एकमात्र विधाता आहेत. ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भावनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या द्वारा एकदा जरी हृदयामध्ये स्थिर केली, तरी तीच केवळ भक्तांना मिळणारी मुक्ती प्रदान करते. तर मग आत्मानंदाच्या नित्य अनुभवाने ज्यांनी मायेचा निरास केला, तेच अंतरंगात शिरल्यामुळे अघासुराला सद्‌गती मिळाली, यात काय आश्चर्य ! (३०-३९) सूत म्हणतात - शौनकादि ऋषींनो ! श्रीकृष्णांनी ज्याला जीवदान दिले होते, त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्‌भुत चरित्र ऐकले तेव्हा त्याने पुन्हा श्रीशुकांना त्यांच्याच पवित्र लीलांसंबंधी प्रश्न विचारला. कारण त्यांच्या लीलांनी परीक्षिताचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. (४०) परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! आपण म्हणालात की, भगवंतानी केलेली पाचव्या वर्षातील लीला मुलांनी व्रजामध्ये सहाव्या वर्षी नुकतीच घडल्याप्रमाणे सांगितली. भूतकाळी केलेली लीला वर्तमानकाळाप्रमाणे त्यांनी कशी काय सांगितली ? महायोगी गुरुदेव ! हे जाणून घेण्याचे मला मोठेच कुतुहल वाटत आहे. आपण कृपा करून सांगावे. ही देखील त्या श्रीकृष्णांचीच माया असावी. कारण याखेरीज असे होऊ शकत नाही.गुरुदेव ! मी नाममात्र क्षत्रिय असूनही आमचे भाग्य एवढे मोठे की, आम्ही आपल्याकडून परम पवित्र श्रीकृष्णलीलामृताचे वारंवार पान करीत आहोत. (४१-४३) सूत म्हणतात - भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ शौनका ! परीक्षिताने जेव्हा असे विचारले, तेव्हा श्रीशुकांना भगवंतांची ती लीला आठवली; त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिये व अंतःकरण भगवंतांच्या लीलेने स्वतःकडे खेचले. थोड्या वेळाने हळू-हळू मोठ्या कष्टाने पुन्हा भानावर आल्यावर ते परीक्षिताला सांगू लागले. (४४)

अध्याय बारावा समाप्त

GO TOP