|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १० वा
यमलार्जुनांचा उद्धार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] राजाने विचारले - भगवन ! आपण मला हे सांगा की, नलकूबर आणि मणिग्रीव यांना शाप का मिळाला ? त्यांनी असे कोणते निंद्यकर्म केले होते की, ज्यामुळे देवर्षींनाही क्रोध आला होता ? (१) श्रीशुकाचार्य म्हणाले - नलकूबर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेराचे पुत्र होते. ते रुद्राचे गण असूनही त्यांचा गर्व वाढतच गेला. एके दिवशी ते दोघेजण मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वारुणी मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले होते. नशेमुळे त्यांचे डोळे भिरभिरत होते. पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर गाणे-बाजावणे करीत होत्या आणि ते फुलांनी लहडलेल्या वनामध्ये त्यांच्याबरोबर विहार करीत होते. त्यावेळी कमळांच्या ताटव्यांनी शोभणार्या गंगेमध्ये स्त्रियांसह शिरून, हत्तिणींसह हत्ती जसे जलक्रीडा करतात, त्याप्रमाणेच ते जलक्रीडा करू लागले. परीक्षिता ! कर्मधर्मसंयोगाने देवर्षी नारदांनी त्यांना पाहून ते उन्मत्त झाले आहेत, हे जाणले. नारदांना पाहून विवस्त्र अप्सरा लाजला. शापाच्या भितीने त्यांनी ताबडतोब कपडे परिधान केले. परंतु त्या नग्न यक्षांनी मात्र नाही. जेव्हा देवर्षी नारदांनी पाहिले की, ते देवपुत्र असूनसुद्धा ऐश्वर्यमदाने आंधळे आणि मदिरापान करून उन्मत्त झाले आहेत; तेव्हा नारदांनी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांना शाप देत म्हटले. (२-७) नारद म्हणाले - जे लोक विषयांचे सेवन करतात, त्यांच्या बुद्धीला बिघडविणारा महत्त्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा, रजोगुणी कर्मे आणि कुलीनता इत्यादिंचा अभिमानसुद्धा त्यापेक्षा अधिक बुद्धिभ्रंश करणारा नाही. कारण संपत्तीच्या पाठोपाठ स्त्री, जुगार आणि मद्य ही असतातच. श्रीमदाने अंध होऊन इंद्रियांचे गुलाम झालेले क्रूर पुरुष आपल्या नाशवान शरीराला अजरामर समजून आपल्याच सारख्या देहधारी पशूंची हत्या करतात. ज्या शरीराला ’भूदेव’, ’नरदेव’, ’देव’ इत्यादि नावांनी संबोधिले जाते, त्याची शेवटी काय अवस्था होते ? त्यात कीडे पडतात, पशुपक्ष्यांनी खाऊन त्याची विष्ठा बनते किंवा ते जळून राखेचा ढीग होते. त्याच शरीरासाठी प्राण्यांशी द्रोह करण्यामध्ये मनुष्याला कोणता स्वार्थ वाटतो ? असे केल्याने शेवटी नरकाचीच प्राप्ती व्हायची. हे शरीर कोणाची संपत्ती आहे ते सांगा तर खरे ! अन्न देऊन पालन-पोषण करणार्याची आहे की गर्भाधान करणार्या पित्याची ? हे शरीर त्याला नऊ महिने पोटात बाळगणार्या मातेचे आहे की तिच्याही आईवडिलांचे ? जो बलवान पुरुष बळजवरीने याच्याकडून काम करवून घेतो त्याचे, की पैसे देऊन खरेदी करणार्याचे. हे जाळणार्या आगीचे आहे की त्याला खाऊ इच्छिणार्या कोल्ह्या-कुत्र्यांचे ? हे शरीर प्रकृतीपासून उत्पन्न होऊन तीमध्येच सामावून जाणारी एक सामान्य वस्तू आहे. अशा स्थितीत मूर्खाशिवाय दुसरा कोण बुद्धिमान मनुष्य याला आपला आत्मा मानून त्याच्यासाठी दुसर्यांचे प्राण घेईल ? जो उन्मत्त श्रीमदाने आंधळा झालेला आहे, त्याला दृष्टी येण्यासाठी दारिद्र्य हेच सर्वांत प्रभावी अंजन आहे. कारण दरिद्री मनुष्यच इतरांना आपल्यासारखे मानतो. च्या शरीराला एकदा काटा टोचलेला असतो, तो कोणत्याही प्राण्याला असा काटा टोचू नये, असे मानतो. कारण आपल्याला झालेल्या पीडेवरून दुसर्या जीवालासुद्धा असेच दुःख होते, हे त्याला कळते. परंतु ज्याला कधी काटा टोचलाच नाही, तो त्या दुःखाची काय कल्पना करणार ? दरिद्र्याला गर्व असत नाही. सर्व प्रकारच्या मदांपासून तो दूर असतो. उलट दैवशात त्याला जो त्रास सोसावा लागतो, तीच त्याच्यासाठी मोठी तपश्चर्या असते. ज्याला रोजच्या भोजनाची मारामार असते, भुकेने ज्याचे शरीर दुबळे झालेले असते, त्या दद्रिद्री माणसाची इंद्रियेसुद्धा अशक्त झालेली असतात. आणि त्यामुळे भोगांसाठी तो दुसर्या प्राण्यांना दुःख देत नाही. अशा रीतीने तो हिंसेपासून परावृत्त होतो. साधुपुरुष जरी समदर्शी असले तरीसुद्धा त्यांचा सहवास दरिद्री माणसांना सुलभ आहे. कारण त्याचे भोग तर अगोदरच सुटलेले असतात. आता संतांच्या संगतीने त्याची लालसासुद्धा नाहीशी होते आणि लवकरच त्याचे अंतःकरण शुद्ध होते. ज्या महात्म्यांच्या चित्तांमध्ये सर्वांबद्दल समभाव आहे. जे फक्त भगवंतांच्या चरणात लीन असतात, त्यांना, दुर्गुणाची खाण असणार्या आणि धनाच्या मदाने उन्मत्त झालेल्या दुष्टांशी काय कर्तव्य आहे ? त्यांची उपेक्षा करणेच योग्य. हे दोन्ही यक्ष वारुणी मदिरेचे पान करून उन्मत्त आणि धनाच्या मदाने आंधळे झाले आहेत. इंद्रियांचे गुलाम असणार्या या स्त्री-लंपटांचा अज्ञानजनित मद आपण नाहीसा करवा. हे लोकपाल कुबेराचे पुत्र असूनही मदोन्मत्त होऊन अज्ञानात बुडालेले आहेत. आपण विवस्त्र आहोत याचेही त्यांना भान नाही. म्हणून हे दोघेजण आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहेत. तसे झाले तर यांना पुन्हा असा अभिमान निर्माण होणार नाही. तेथेसुद्धा माझ्या कृपेने यांना भगवंतांची स्मृती राहील अणि माझ्या अनुग्रहामुळे देवांची शंभर वर्षे झाल्यानंतर यांना श्रीकृष्णांचे सान्निध्य लाभेल. मग पुन्हा भगवंतांच्या चरणांविषयी प्रेम उत्पन्न होऊन हे आपल्या लोकी निघून जातील. (८-२२) श्रीशुकदेव म्हणतात - असे म्हणून देवर्षी नारद नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले. नलकूबर आणि मणिग्रीव हे दोघे एकाच वेळी अर्जुनवृक्ष होऊन यमलार्जुन नावाने प्रसिद्ध झाले. आपल्या परम भक्त देवर्षी नारदांचे वचन सत्य करण्यासाठी श्रीकृष्ण हळू हळू उखळ ओढीत जेथे यमलार्जुन वृक्ष होते, तिकडे जाऊ लागले. (२३-२४) भगवंतांनी विचार केला की, "देवर्षी नारद मला अत्यंत प्रिय आहेत आणि हे दोघेजणसुद्धा माझा भक्त कुबेर याचे पुत्र आहेत. म्हणून महात्मा नारद जे म्हणाले, ते मी तसेच सत्य करीन." असा विचार करून श्रीकृष्ण दोन्ही वृक्षांच्या मधून निघाले. ते तेथून बाहेर पडले. परंतु उखळ मात्र तिरपे होऊन अडकून बसले. कमरेला दोरी बांधलेल्या त्या मुलाने आपल्या पाठीशी असलेल्या उखळाला जोराने ओढले मात्र, तोच झाडांची सर्व मुळे उखडली गेली. सर्व बलविक्रमाचे केंद्र ते भगवान त्यांचा थोडासा धक्का लागताच झाडांच्या फांद्या, खोडे, डहाळ्या आणि पाने यांचा थरकाप होऊन दोन्ही वृक्ष जोराने कडकडाट करीत जमिनीवर कोसळले. त्या दोन्ही वृक्षांमधून अग्नीप्रमाणे तेजस्वी असे दोन सिद्ध पुरुष बाहेर पडले. त्यांच्या चमकणार्या कांतीने दिशा उजळून निघाल्या. त्यांनी सर्व लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन, त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि हात जोडून शुद्ध हृदयाने ते त्यांची स्तुती करू लागले. (२५-२८) ते म्हणाले, "हे महायोगेश्वर श्रीकृष्ण ! आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरुषोत्तम आहात. हे व्यक्त आणि अव्यक्त संपूर्ण विश्व आपलेच रूप आहे, असे वेदवेत्ते जाणतात. आपणच सर्व प्राण्यांचे शरीर, प्राण, अंतःकरण आणि इंद्रियांचे स्वामी आहात. आपणच सर्वशक्तिमान काल, सर्वव्यापक, तसेच अविनाशी ईश्वर आहात. आपणच महत्तत्त्व आणि सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुणरूप सूक्ष्म प्रकृती आहात. आपणच समस्त स्थूल आणि सूक्ष्म शरीरांची कर्मे, भाव, धर्म आणि सत्तेला जाणणारे सर्वांचे साक्षी परमात्मा आहात. वृत्तींनी ग्रहण केल्या जाणार्या प्रकृतीचे गुण आणि विकारांचे द्वारा आपले ज्ञान होऊ शकत नाही. स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आवरणाने झाकला गेलेला कोणता मनुष्य त्यांच्याही आधीपासून असलेल्या आपल्याला जाणू शकेल ? सर्व प्रपंचाच्या निर्मात्या त्या तुम्हा भगवान वासुदेवांना आम्ही नमस्कार करीत आहोत. हे प्रभो ! आपल्या द्वारा प्रकाशित होणार्या गुणांनीच ज्यांनी आपले माहात्म्य लपवून ठेवले आहे, त्या परब्रह्मस्वरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत. आपण प्राकृत शरीरहित आहात; तरीसुद्धा जेव्हा आपण असे असामान्य पराक्रम प्रगट करीत असता की जे शरीर धारण करणार्यांना अशक्य आहेत. आणि त्यांच्यामुळेच त्या शरीरांमध्ये आपला अवतार आहे, हे लक्षात येते. प्रभो ! तेच सर्व अभिलाषा पूर्ण करणारे आपण, सर्व लोकांचे लौकिक आणि अलौकिक कल्याण करण्यासाठी यावेळी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी अवतीर्ण झाला आहात. हे परम कल्याणस्वरूप ! हे परममंगलस्वरूप ! आपणास नमस्कार असो ! शांत, सर्वांच्या हृदयात वास करणार्या यदुवंशाधिपती श्रीकृष्णांना नमस्कार असो. हे अनंता ! आम्ही आपल्या दासांचे दास आहोत. देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हांला आपले दर्शन झाले. आपण आम्हांला जाण्याची अनुमती द्यावी. हे प्रभो ! आमची वाणी आपल्या गुणांचे वर्णन करीत राहो. आमचे कान आपल्या कथा ऐकण्याकडे लागून राहोत. आमचे हात आपल्या सेवेत आणि मन आपल्या चरणकमलांचे स्मरण करण्यात रममाण होवो ! आमचे मस्तक आपले निवासस्थान अशा जगासमोर नम्र राहो आणि आमचे नेत्र आपले प्रत्यक्ष शरीर अशा संतांचे दर्शन घेत राहोत." (२९-३८) श्रीशुकदेव म्हणतात - त्यांनी गोकुळेश्वर श्रीकृष्णांची अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर दोरीने उखळाला बांधलेले भगवान हसत हसत त्यांना म्हणाले. (३९) श्रीभगवान म्हणाले - "तुम्ही मदाने आंधळे झाला होतात. अगोदरपासूनच मला हे माहीत होते की, परम कारुणिक देवर्षी नारदांनी शाप देऊन तुमचे ऐश्वर्य नष्ट केले आणि हीच तुमच्यावर कृपा केली. जे समदर्शी आहेत आणि ज्यांचे हृदय पूर्णपणे मला समर्पित आहे, त्या साधुपुरुषांच्या दर्शनाने संसारबंधन नाहीसे होते. जसा सूर्यदर्शनाने अंधार नाहीसा होतो. म्हणून नलकूबरा आणि मणिग्रीवा ! तुम्ही माझेच अनन्यचिंतन करीत आपापल्या घरी जा. जी तुमच्यासाठी कल्याणकारी आहे, त्या, तुम्हांला इष्ट असलेल्या व संसारचक्रातून सोडविणार्या अनन्य भक्तीची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे." (४०-४२) श्रीशुकदेव म्हणतात - भगवान असे म्हणाले, तेव्हा त्या दोघांनी त्यांना प्रदक्षिणा घातली आणि वारंवार नमस्कार केला. यानंतर उखळाला बांधलेल्या त्यांची आज्ञा घेऊन ते उत्तर देशेला निघून गेले. (४३) अध्याय दहावा समाप्त |