|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ९ वा
श्रीकृष्णाला उखळाला बांधणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसर्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. आतापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले, त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे. (१-२) यशोदा जेव्हा दही घुसळत होती, तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होते आणि ते हलत होते. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिणले होते. हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हलत होती. चेहर्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते. वेणीत घातलेली मोगर्याचे फुले गळून पडत होती. (३) श्रीकृष्ण त्याचेवळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळीत असलेल्या आईजवळ आला. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचे दही घुसळणे थांबवले. यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतले व स्तनातून पाझरणारे दूध ती त्याला पाजू लागली आणि त्याचे मंद हास्ययुक्त मुख न्याहाळू लागली. इतक्यात चुलीवर ठेवलेले दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरविण्यासाठी ती निघून गेली. यामुळे श्रीकृष्णाला राग आला. थरथरणारे लालचुटुक ओठ दातांनी चावीत त्याने जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडके फोडून टाकले, डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि माजघरात जाऊन कोणाला नकळत तो लोणी खाऊ लागला. (४-६) उतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली. तेथे पाहिले तर दह्याचे मडके फुटलेले. ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे, हे तिने ओळखले. त्याचबरोबर तोही तेथे नाही, हे पाहून तिला हसू आवरेना. इकडे तिकडे शोधल्यावर समजले की, एका पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत आहे. शिवाय आपली चोरी उघडकीला येईल, याच्या भितीने चारी बाजूंना पाहात आहे. हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्याजवळ जाऊन पोहोचली. श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की, आई हातात छडी घेऊन आपल्याकडेच येत आहे, तेव्हा उखळावरून त्याने खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला. योगी तपस्येने शुद्ध झालेल्या मनानेसुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाहीत, त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्यामागे धावली. अशाप्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली, तेव्हा थोड्याच वेळात स्थूल व हलणार्या नितंबांच्यामुळे तिची चाल मंदावली. जोराने धावण्यामुळे वेणी ढिली होऊन तीत माळलेली फुले खाली पडू लागली. अखेर कसेबसे तिने त्याला पकडले. श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागावू लागली. त्यावेळी हातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे चोळीत होता. डोळ्यांतून काजळ वाहून तोंडावर आले होते. नजर वर केली, तर ती भितीने बावरलेली दिसत होती. बाळ फार घाबरला आहे, असे पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली. तिने छडी फेकून दिली. पण असा विचार केला की, याला जरब बसविणासाठी दोरीने बांधले पाहिजे. खरे पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. (७-१२) ज्याला बाहेर नाही की आत नाही, आदी नाही की अंत नाही, जो जगाच्या आदि-अंती, आत-बाहेर असून जगद्रूपातही आहे, जो सर्व इंद्रियांच्या पलीकडे असून अव्यक्त आहे, त्याच भगवंताने मनुष्यरूप घेतल्याने त्याला पुत्र समजून, एखाद्या साधारण बालकाला बांधावे, तसे यशोदा त्याला दोरीने उखळाला बांधू लागली. जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीने बांधू लागली, तेव्हा ती दोरी दोन बोटे कमी पडली. तेव्हा तिने दुसरी दोरी त्या दोरीला बांधली. जेव्हा तीसुद्धा कमी पडू लागली, तेव्हा तिने आणखी एक तिला जोडली. अशाप्रकारे जी जी दोरी आणून ती जोडत असे, ती ती पुन्हा दोन बोटे कमीच पडत असे. यशोदेने घरातील सर्व दोर्या जोडल्या तरीसुद्धा त्या कमीच पडल्या. हे पाहून गोपी हसू लागल्या. त्यामुळे तिलाही हसू आले आणि आश्चर्यही वाटले. श्रीकृष्णांनी पाहिले की, आईचे शरीर घामाने ओले चिंब झाले आहे, वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडली आहे. तेव्हा तिची करुणा येऊन त्याने स्वतःच स्वतःला बांधून घेतले. परीक्षिता ! श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव इद्यादिंसह हे संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे. तरीसुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपण भक्तांच्या अधीन असल्याचे दर्शविले. गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदांकडून जो कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला, तो ब्रह्मदेव, शंकर आणि वक्षःस्थळावर असलेली लक्ष्मी यांनासुद्धा प्राप्त झाला नाही. हे गोपिकानंदन अनन्य भक्तांना जितले सुलभ आहेत, तितके देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांनासुद्धा नाहीत. (१३-२१) यानंतर आई घरातील काम करण्यात व्यग्र झाली असता उखळाला बांधलेल्या कृष्णाने, जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते, ते दोन अर्जुनवृक्ष पाहिले. नलकूबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होती. त्यांच्याजवळ विपुल ऐश्वर्य होते. त्यांना झालेला गर्व पाहूनच देवर्षी नारदांनी त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते. (२२-२३) अध्याय नववा समाप्त |