श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८ वा

नामकरण-संस्कार आणि बाललीला -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! यदूंचे कुलपुरोहित महातपस्वी श्रीगर्गाचार्य वसुदेवांच्या सांगण्यावरून नंदांच्या गोकुळात आले. त्यांना पाहून नंदांना अतिशय आनंद झाला. ते हात जोडून उठून उभे राहिले. नंतर त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भगवत्स्वरूप मानून त्यांनी त्यांची पूजा केली. आदरातिथ्यानंतर जेव्हा गर्गाचार्य आरामात बसले, तेव्हा नंदांनी अत्यंत मधुर शब्दात त्यांचे अभिनंदन करून म्हटले - "भगवन ! आपण तर स्वतः पूर्णकाम आहात. तरीसुद्धा, मी आपली काय सेवा करू ? आपल्यासारख्या महात्म्यांचे आमच्यासारख्या सामान्य गृहस्थांच्या घरी येणे हे आमच्याच परम कल्याणासाठी होय. एरव्ही आपले येणे कठीणच. प्रभो ! जी गोष्ट साधारणपणे इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडील आहे, तीसुद्धा माणसाला ज्योतिष शास्त्राच्याद्वारे प्रत्यक्ष जाणता येते. आपण त्याच ज्योतिषशास्त्राची रचना केली आहे. आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात; म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचे नामकरणादी संस्कार आपणच करावेत. कारण ब्राह्मण जन्मानेच मनुष्यमात्राचा गुरू असतो. (१-६)

गर्गाचार्य म्हणाले - मी सगळीकडे यदुवंशीयांचा पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे. मी जर तुझ्या पुत्राचे संस्कार केले, तर लोकांना वाटेल की, हा देवकीचा पुत्र आहे. कंस दुष्ट बुद्धीचा आहे. वसुदेवाबरोबर तुझी घनिष्ठ मैत्री आहे. देवकीच्या कन्येकडून जेव्हापासून त्याने ऐकले आहे की, त्याला मारणारा दुसरीकडे कोठेतरी जन्मला आहे, तेव्हापासून तो असाच विचार करीत आहे की, देवकीच्या आठव्या गर्भापासून कन्येचा जन्म झाला नसला पाहिजे. जर मी तुझ्या पुत्राचा संस्कार केला, तर तो हा बालक वसुदेवाचा पुत्र समजून त्याला मारील. तो आपल्याकडून मोठाच अन्याय होईल. (७-९)

नंद म्हणाले, आपण गुपचूपपणे या एकांत गोशाळेमध्ये स्वस्तिवाचन करून या बालकाचा द्विजातीला योग्य असा नामसंस्कार करावा. इतरांची गोष्ट कशाला, माझ्या लोकांनाही ही गोष्ट समजणार नाही हे मी पाहीन. (१०)

श्रीशुकदेव म्हणतात - संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे, असे गर्गाचार्यांना वाटत होतेच. नंदांनी जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी एकांतात बसून गुप्तपणे दोन्ही बालकांचा नामकरण संस्कार केला. (११)

गर्गाचार्य म्हणाले - हा रोहिणीचा मुलगा आपल्या मित्रांना आपल्या गुणांनी आनंदित करील, म्हणून याचे नाव ’राम’ असे राहील. याच्या शक्तीला काही सीमा नाही, म्हणून लोक याला ’बल’ असे म्हणतील. हा यादव आणि तुमच्यामध्ये काही भेदभाव ठेवणार नाही म्हणून याचे एक नाव ’संकर्षण’ असेही असेल. आणि हा जो सावळ्या वर्णाचा आहे, हा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. मागील युगांमध्ये त्याने अनुक्रमे पांढरा, तांबडा आणि पिवळा असे तीन वेगवेगळे रंग स्वीकारले होते. यावेळी त्याचा कृष्णवर्ण आहे, म्हणून याचे नाव ’कृष्ण’ असेल. नंद महोदय ! हा तुझा पुत्र पूर्वी कधी वसुदेवांचा पुत्र होता, म्हणून हे रहस्य जाणणारे लोक याला ’श्रीमान वासुदेव’ असेही म्हणतील. तुझ्या पुत्राची पुष्कळ नावे आणि रूपेसुद्धा आहेत. जितके गुण आणि जितकी कर्मे, त्या सर्वांना अनुसरून वेगवेगळी नावे आहेत. ती मी जाणतो, सर्वसामान्य लोक जाणत नाहीत. हा तुम्हा लोकांचे परम कल्याण करील. सर्व गोप आणि गाईंना हा अतिशय आनंदित करील. याच्या साहाय्याने तुम्ही मोठमोठ्या संकटांतून अगदी सहज पार पडाल. हे व्रजराज ! पूर्वी एकदा पृथ्वीवर राजा नव्हता, तेव्हा डाकूंची पीडा दिलेल्या सज्जनांचे ह्यानेच रक्षण केले आणि याच्याकडूनच बळ प्राप्त करून त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळविला होता. जे भाग्यवान मनुष्य याच्यावर प्रेम करतात, त्यांचा शत्रू पराभव करू शकत नाहीत. जसे विष्णूंच्या छत्रछायेखाली राहणार्‍या देवांना असुर जिंकू शकत नाहीत. नंद महोदय ! गुण, संपत्ती, सौंदर्य, कीर्ति आणि प्रभाव यांमध्ये तुझा हा मुलगा भगवान नारायणांसारखाच आहे. तू अत्यंत सावधपणे याचे रक्षण कर. अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे परत गेले. त्यांचे म्हणणे ऐकून नंदाला अतिशय आनंद झाला. त्याला वाटले की, आपल्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण झाल्या. (१२-२०)

परीक्षिता ! थोड्याच दिवसांत गोकुळात रामकृष्ण हात व गुडघे टेकून रांगू लागले. (२१)

ते दोघे भाऊ रांगत रांगत गोकुळातील धुळीतून चालत असत. त्यावेळी त्यांच्या पायातील घुंगरू रुणझुण वाजत असत. त्या कर्णमधुर आवाजाने आनंदित होऊन नकळत एकाद्या अनोळखी माणसाच्या मागे जात. नंतर जेव्हा पाहात हा दुसराच कोणीतरी आहे, तेव्हा ते थांबत आणि भ्यालासारखे आपल्या मातांकडे परत येत. त्यांना पाहून मातांचा स्नेह दाटून येत असे. त्यांच्या स्तनांतून दुधाच्या धारा वाहू लागत. त्यावेळी माता त्यांना दोन्ही हातांनी हृदयाशी कवटाळीत आणि स्तनपान देत. जेव्हा ते दूध पिऊ लागत आणि अधून मधून आपल्या मातांकडे पाहात, तेव्हा त्यांचे ते मंद मंद हास्य, कुंदकळ्यांसारखे दात आणि भाबडा चेहरा पाहून त्या आनंद समुद्रात डुंबू लागत. जेव्हा ते दोघे आणखी थोडे मोठे झाले, तेव्हा गोकुळात अशा काही बाललीला करू लागले की, त्या गोपी पाहातच राहात. कधी कधी ते वासरांचे शेपूट धरून ठेवीत आणि वासरे भिऊन इकडे तिकडे पळू लागली की, ते दोघेही त्यांच्याकडून ओढले जात. गोपी आपल्या घरातील कामधंदा सोडून जेव्हा हे सगळे पाहत असत, तेव्हा हसून हसून त्यांची मुरकुंडी वळत असे आणि त्या आनंदात मग्न होत असत. कन्हैय्या आणि बलराम दोघेही अतिशय चंचल आणि फारच खोडकर होते. ते कधी हरीण, गायींसारख्या शिंगे असणार्‍या जनावरांकडे पळत जात तर कधी धगधगणार्‍या आगीजवळ जात. कधी दाताने चावणार्‍या प्राण्यांजवळ जात तर कधी तलवारी उचलून घेत. कधी पाण्याकडे जात, कधी पक्ष्यांजवळ जात, तर कधी काट्या-कुट्यांत जात. त्यांच्या माता त्यांना त्यापासून अडवू पाहात, पण त्यांचे काही चालत नसे. अशा स्थितीत त्या घरातील कामसुद्धा धड करू शकत नव्हत्या. अशा द्विधा मनःस्थितीत त्या फारच वेचैन राहात. (२२-२५)

हे राजर्षे ! थोड्याच दिवसात रांगणे संपवून राम-कृष्ण सहजपणे गोकुळात हिंडू-फिरू लागले. आता भगवान कृष्ण आणि बलराम आपल्याच वयाच्या गवळ्यांच्या मुलांना बरोबर घेऊन खेळण्यासाठी बाहेर पडत आणि व्रजातील गोपींना आनंदित करीत निरनिराळे खेळ खेळत. त्यांच्या लहानपणाच्या मनोहर खोड्या पाहून त्या यशोदेच्या घरी येऊन तिला सांगू लागत. (२६-२८)

अग यशोदे ! हा तुझा कान्हा अतिशय खोडकर झाला आहे. गाईची धार काढण्याची वेळ झालेली नसतानासुद्धा हा वासरांना सोडतो आणि आम्ही रागावलो की, खो खो करून हसू लागतो. हा चोरीच्या निरनिराळ्या युक्त्या योजून आमचे गोड गोड दही-दूध चोरून खातो. त्याने स्वतः खाल्ले तर गोष्ट वेगळी; परंतु तो वानरांना घालतो आणि जेव्हा पोट भरल्यामुळे ते खाऊ शकत नाहीत तेव्हा आमचे माठ फोडून टाकतो. त्याला घरात जर एकादी वस्तू मिळाली नाही, तर तो घरातल्या लोकांवर रागावतो आणि आमच्या मुलांना रडवून पळून जातो. जेव्हा आम्ही दूध-दही शिंक्यावर ठेवतो आणि याचे हात तिथपर्यंत पोहोचत नाहीत, तेव्हा हा वेगवेगळ्या युक्त्या योजतो. कुठे दोन-चार चौरंग एकावर एक ठेवतो. कुठे उखळावर चढतो, तर कधी उखळावर चौरंग ठेवतो. एवढे करूनही जेव्हा काम भागत नाही, तेव्हा हा त्या भांड्यांना छिद्र पाडतो. कोणत्या शिंक्यावर कोणत्या भांड्यांत काय ठेवले आहे, याची त्याला पूर्ण माहिती असते. जेव्हा आम्ही या वस्तू अंधारात लपवून ठेवतो, तेव्हा तू याला जे पुष्कळे रत्‍नांचे अलंकार घातले आहेस, त्यांच्या प्रकाशातच हा सर्व काही पाहतो. जेव्हा गोपी घरकामामध्ये व्यग्र असतात, तेव्हा हा हे सारे करतो. एवढे करूनही आपण त्या गावचेच नसल्याचे भासवतो. काही वेळा घरामध्ये लघवी वगैरेही करतो. निरनिराळ्या उपायांनी चोर्‍या करूनही पुतळ्यासारखा कसा स्तब्ध उभा आहे पाहा !" श्रीकृष्णाच्या भ्यालेल्या सुंदर मुखकमलाकडे पाहात गोपी याप्रमाणे यशोदेकडे तक्रारी सांगत असत. यशोदा मात्र त्याच्याकडे पाहून केवळ हसत असे. त्याला रागवण्याचे गोष्ट तिच्या मनातसुद्धा येत नसे. (२९-३१)

एके दिवशी बलराम वगैरे गवळ्यांची मुले श्रीकृष्णांबरोबर खेळत होती. त्यांनी यशोदेला सांगितले, "आई ! कन्हैयाने माती खाल्ली आहे." मुलाचे हित इच्छिणार्‍या यशोदेने श्रीकृष्णाचा हात पकडला. त्यावेळी श्रीकृष्णाचे डोळे भितीने गंगरले होते. यशोदेने रागावून विचारले, "काय रे खोडसाळा ! तू कोणाला नकळत माती का खाल्लीस ? पहा तुझ्या बरोबरीची मुले काय म्हणतात ते ! तुझा बलरामदादा सुद्धा तेच सांगतो." (३२-३४)

श्रीकृष्ण म्हणाले - " आई ! मी माती खाल्ली नाही. हे सर्वजण खोटे बोलत आहेत. तुला जर यांचेच म्हणणे खरे वाटत असेल, तर तू आपल्या डोळ्यांनीच माझ्या तोंडात पाहा!" यशोदा म्हणाली, "ठीक आहे. असे जर आहे, तर तोंड उघड पाहू !" मातेने असे म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी आपले तोंड उघडले. अनंत ऐश्वर्यसंपन्न असे ते केवळ लीला करण्यासाठीच मनुष्यबालक बनले होते. (३५-३६)

त्यांच्या मुखामध्ये चराचर विश्व, आकाश, दिशा, डोंगर, द्वीप आणि समुद्रांसहित सर्व पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र आणि तार्‍यांसह संपूर्ण ज्योतिमंडल, पाणी, तेज, पवन, आकाश, वैकारिक अहंकाराचे कार्य असणारी इंद्रिये, पंचतन्मात्रा, तीन गुण, जीव, काल, स्वभाव, कर्म, वासना, शरीर इत्यादि विभिन्न रूपात दिसणारे हे विश्व आणि स्वतःसह सारे गोकुळ श्रीकृष्णांच्या उघडलेल्या लहानशा मुखात पाहून यशोदा साशंक झाली. ती विचार करू लागली, ’हे स्वप्न आहे की भगवंतांची माया ? माझ्या बुद्धीत तर काही भ्रम निर्माण झाला नाही ना ? का माझ्या या मुलातच जन्मतः काही योगसिद्धी आहे ? जे चित्त, मन, कर्म आणि वाणीच्याद्वारा पूर्णपणे व सुलभतेने अनुमानाचा विषय असू शकत नाही, ते हे सर्व विश्व ज्याच्या आश्रयाने आहे आणि ज्याच्या सत्तेनेच याची प्रचीती येते, ज्याचे स्वरूप सर्वथैव अचिंत्य आहे, त्या परमपदाला मी नमस्कार करते. ही मी आहे आणि हे माझे पती आहेत, तसेच हा माझा मुलगा आहे, त्याचबरोबर मी व्रजराजाच्या सर्व संपत्तीची स्वामिनी, धर्मपत्‍नी आहे, या गोपी, गोप आणि गोधन माझे आहे - अशा प्रकारची माझी कुबुद्धी ही ज्यांची आश्रय आहेत, त्यांनाच मी शरण आहे." अशा प्रकारे जेव्हा यशोदेला ईश्वरी तत्त्वाचे ज्ञान झाले, तेवढ्यात सर्वशक्तिमान प्रभूंनी आपल्या पुत्रस्नेहरूप वैष्णवी योगमायेचा तिच्या हृदयात संचार केला. यशोदा ती घटना ताबडतोब विसरली. तिने आपल्या लाडक्याला उचलून मांडीवर घेतले. तिच्या हृदयाला पूर्वीप्रमाणेच प्रेमाचा पान्हा फुटला. (३७-४४)

सर्व वेद, उपनिषदे, सांख्य, योग आणि भक्तजन ज्यांच्या महात्म्याचे गीत गातात त्या श्रीहरींना ती आपला पुत्र मानू लागली. (४५)

राजाने विचारले - ब्रह्मर्षे ! नंदाने असे कोणते फार मोठे पुण्य केले होते ? तसेच भाग्यवती यशोदेनेसुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली होती की, जिच्यामुळे स्वतः श्रीहरींनी तिचे स्तनपान केले. भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाललीला केल्या, त्या इतक्या पवित्र आहेत की, त्यांचे श्रवण कीर्तन करणार्‍या लोकांचेसुद्धा सर्व पाप-ताप नाहीसे होतात. त्रिकालदर्शी ज्ञानी पुरुष आजसुद्धा त्यांचे गायन करीत असतात. त्यांच्या जन्मदात्यांनाही त्या पाहायला मिळाल्या नाहीत. (आणि नंद यशोदा मात्र त्यांचे सुख लुटीत आहेत, याचे कारण काय ?) (४६-४७)

श्रीशुकदेव म्हणाले - नंद पूर्वी एक श्रेष्ठ वसू होते. त्यांचे नाव द्रोण होते आणि त्यांच्या पत्‍नीचे नाव धरा होते. त्यांनी ब्रह्मदेवांच्या आदेशांचे पालन करण्याच्या इच्छेने त्यांना म्हटले - "भगवन ! आम्ही जेव्हा पृथ्वीवर जन्म घेऊ, तेव्हा जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचेवर आमची अनन्य भक्ती निर्माण होवो; जिच्या योगाने संसारातील लोक सहजपणे दुर्गतीला पार करून जातात." ब्रह्मदेव म्हणाले, "ठीक आहे." तेच परम यशस्वी द्रोण व्रजामध्ये नंद नावाने जन्मले आणि तीच धरा यशोदा झाली. परीक्षिता ! भगवान आता त्यांचे पुत्र झाले आणि सर्व गोप-गोपींच्यापेक्षा नंद आणि यशोदा यांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम जडले. ब्रह्मदेवांचे वचन सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम यांचेसह व्रजामध्ये राहून त्यांना आपल्या बाललीलांनी आनंदित करू लागले. (४८-५२)

अध्याय आठवा समाप्त

GO TOP