|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७ वा
छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] राजाने म्हटले - गुरुवर्य ! सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी जे जे अवतार धारण करून पुष्कळशा मनोहर आणि श्रवणीय लीला केल्या; ज्यांचे श्रवण केल्याने प्रेम वाढते आणि विषयांची आशा नाहीशी होते, मनुष्याचे अंतःकरण तत्काळ शुद्ध होते. भगवंतांविषयी भक्ती आणि त्यांच्या भक्तांशी मैत्री जडते, त्या मनोहर लीलांचे आपल्याला योग्य वाटल्यास वर्णन करावे. भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यलोकी प्रगट होऊन मनुष्य स्वभावाचे अनुकरण करीत ज्या बाललीला केल्या, त्याही अद्भुत असतील. तरी आपण त्यासुद्धा मला सांगाव्यात. (१-३) श्रीशुकदेव म्हणतात - एकदा भगवान श्रीकृष्णांचा कूस बदलण्याचा अभिषेक-उत्सव साजरा केला जात होता. त्याच दिवशी त्यांचे जन्मनक्षत्रही होते. त्यामुळे घरात पुष्कळ स्त्रियांची गर्दी झालेली होती. गाणे बजावणे चालले होते. ब्रह्माणांचा मंत्रघोष चालू होता. त्यावेळी यशोदेने मुलाला अभिषेक केला. नंदराणीने ब्राह्मणांचा मोठा सन्मान केला. त्यांना अन्न, वस्त्रे, पुष्पमाळा, गाई इत्यादि प्रिय वस्तू देऊन उत्तम प्रकारे ब्राह्मणपूजन केले. तेव्हा त्यांनी मंगल स्नान घातलेल्या त्या बाळाला आशीर्वाद दिले. नंतर लाडक्याच्या डोळ्यांवर झोप आली आहे, असे पाहून तिने हळूवारपणे अंथरुणावर झोपविले. थोड्याच वेळात जाग येऊन तो स्तनपान करण्यासाठी रडू लागला. त्यावेळी यशोदा उत्सवासाठी आलेल्या गोपगोपींचे स्वागत करण्यात गुंतली होती; त्यामुळे तिला त्याचे रडणे ऐकू आले नाही. तेव्हा रडत रडतच श्रीकृष्ण आपले पाय झटकू लागला. बाळ श्रीकृष्णाला एका छकड्याखाली झोपवले होते. त्याचे पालवीसारखे लाल चिमुकले पाय आपटताच तो छकडा उलटला. त्याच्यावर दूध, दही वगैरे पदार्थ घालून ठेवलेली भांडी होती, ती इकडे तिकडे विखरून गेली. तसेच त्या छकड्याची चाके, कणा, जोखड मोडून अस्ताव्यस्त होऊन पडली. उत्सवासाठी आलेल्या स्त्रिया, यशोदा, रोहिणी आणि नंद वगैरे गोप ही विचित्र घटना पाहून घाबरून गेले. ते म्हणू लागले, "अरे हा छकडा आपोआप कसा काय उलटला बुवा !" त्यांना याचे कोणतेच कारण कळले नाही. तेव्हा तेथे असलेली मुले गोप-गोपींना म्हणाली, "या कृष्णानेच रडताना आपल्या पायाने ठोकरून हा उलटविला, यात शंका नाही." परंतु त्या गोपांनी ’ती पोरांची बडबड’ मानून त्यावर विश्वास ठेवला नाही. कारण त्या मुलाचा असामान्य पराक्रम त्यांना माहीत नव्हता. (४-१०) हा ग्रहांचा कोप आहे, असे यशोदेला वाटले. तिने रडणार्या लाडक्याला मांडीवर घेऊन ब्राह्मणांकडून वेदमंत्रांनी शांतिपाठ करविला आणि त्याला दूध पाजले. बलाढ्य गोपांनी छकडा पुन्हा व्यवस्थित ठेवून त्याच्यावर पहिल्याप्रमाणे सर्व साहित्य ठेवले. ब्राह्मणांनी हवन केले आणि दही, अक्षता, दर्भ आणि पाणी घेऊन त्या छकड्याची पूजा केली. असूया, दंभ, ईर्ष्या, हिंसा आणि अभिमान नसलेल्या सत्यशील ब्राह्मणांचे आशीर्वाद कधी विफल होत नाहीत, असा विचार करून नंदांनी मुलाला उचलून घेतले आणि श्रेष्ठ ब्राह्मणांकडून सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेदाच्या मंत्रांच्याद्वारे अभिमंत्रित आणि पवित्र औषधींनी युक्त पाण्याने त्याला स्नान घालून पुण्याहवाचन करविले; आणि हवन करवून ब्राह्मणांना पंचपक्वान्नांचे भोजन घातले. तेव्हा कोठे नंदांचे समाधान झाले. नंतर त्यांनी मुलाच्या उत्कर्षासाठी ब्राह्मणांना सर्वगुणसंपन्न, वस्त्रे, पुष्पमाळा आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविलेल्या गाई दान दिल्या. तेव्हा ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिले. जे वेदवेत्ते आणि सदाचारी ब्राह्मण असतात, त्यांचे आशीर्वाद कधी निष्फळ होत नाहीत, ही गोष्ट स्पष्टच आहे. (११-१७) एके दिवशी यशोदा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होती. त्यावेळी एकदम मोठ्या शिलाखंडाप्रमाणे तो जड वाटू लागला. त्या भाराने कासावीस होऊन तिने श्रीकृष्णाला जमिनीवर बसविले. याचे तिलाही आश्चर्य वाटले. यानंतर तिने भगवंतांचे स्मरण केले आणि ती घरकामाला लागली. (१८-१९) तृणावर्त नावाचा एक दैत्य कंसाचा सेवक होता. कंसाच्या सांगण्यावरून प्रचंड वावटळीच्या रूपाने तो आला आणि बसलेल्या बालकाला उडवून घेऊन गेला. त्याने सगळे गोकूळ झाकळून टाकले. त्यामुळे लोकांचे डोळे धुळीने भरून त्यांना काहीसे दिसेनासे झाले. त्याने प्रचंड आवाजाने दाही दिशांचा थरकाप उडविला. संपूर्ण गोकूळ थोडा वेळ धुळीने आणि अंधाराने झाकोळून गेले होते. यशोदेने मुलाला जेथे ठेवले होते, तेथे जाऊन पाहिले, तर तेथे तो नव्हता. तृणावर्ताने उडविलेल्या धुळीने सर्वजण इतके त्रस्त झाले की, दुसर्याला तर सोडाच, पण स्वतःलाही ते पाहू शकत नव्हते. ते जोरदार वादळ आणि धुळीच्या वर्षावात मुलाचा पत्ता नाही, हे पाहून यशोदेला अत्यंत शोक झाला. पुत्राच्या आठवणीने ती अत्यंत व्याकुळ झाली आणि वासरू मेल्यावर गाईची जी अवस्था होते, तशी तिची दशा झाली व ती जमिनीवर कोसळली. तुफान शांत झाल्यावर धूळ कमी झाली, तेव्हा यशोदेच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य गोपी धावत तेथे आल्या. नंदनंदन न दिसल्याने त्या अत्यंत शोकाकुल झाल्या व त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागला. त्याही रडू लागल्या. (२०-२५) इकडे तृणावर्त वावटळीच्या रूपाने जेव्हा श्रीकृष्णाला आकाशात घेऊन गेला, तेव्हा त्याचे प्रचंड वजन त्याला सहन न झाल्याने त्याचा वेग शांत झाला. तो अधिक चालू शकला नाही. (२६) स्वतःपेक्षाही जास्त वजनदार असल्याने तृणावर्त श्रीकृष्णाला शिलाखंड समजू लागला. कृष्णाने त्याचा गळा असा पकडला की, तो त्या अद्भुत बालकाला आपल्यापासून बाजूला करू शकला नाही. श्रीकृष्णाने इतक्या जोराने त्याचा गळा पकडला होता की तो दैत्य निश्चेष्ट झाला. त्याची बुबुळे बाहेर आली, बोलणे बंद झाले व प्राण निघून गेले. अखेर त्या बालकासह तो व्रजामध्ये येऊन पडला. तेथे ज्या स्त्रिया रडत होत्या, त्यांनी पाहिले की, एक आक्राळविक्राळ राक्षस आकाशातून एका मोठ्या शिळेवर येऊन आपटला आणि त्याचे सर्व अवयव मोडून पडले. जणू श्रीशंकरांच्या बाणांनी घायाळ होऊन पडलेला त्रिपुरासुरच. श्रीकृष्ण त्याच्या वक्षःस्थलावर लोंबकळत होते, हे पाहून नंदादी गोप-गोपींना विस्मय वाटला. लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून मातेकडे आणून दिले. मृत्यूमुखातून बालक सुखरूपपणे परत आले. जरी राक्षस त्याला आकाशात घेऊन गेला होता, तरीसुद्धा तो मृत्यूच्या तोंडून सुटून सुखरूप परत आला, हे पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणू लागले - "अहो ! हे केवढे आश्चर्य ! किती अद्भुत घटना घडली ते पहा ना ! या मुलाला राक्षसाने मृत्यूच्या मुखात टाकले होते, परंतु हा परत आला आणि त्या हिंसाचारी दुष्टाला त्याच्या पापानेच गिळून टाकले. साधुपुरुष आपल्या समतेनेच भयांपासून वाचतात, हेच खरे ! आम्ही असे कोणते तप किंवा भगवंतांची पूजा केली होती ? किंवा पाणपोई घालणे, धर्मशाळा बांधणे इत्यादि लोकोपयोगी कामे केली होती ? किंवा यज्ञ, दान वगैरे केले होते ? किंवा लोकांचे भले केले होते की ज्यामुळे हा बालक मृत्यूच्या तावडीतून सुटून आपल्या स्वजनांना सुखी करण्यासाठी पुन्हा परत आला. काय आमचे भाग्य ! त्या महावनामध्ये पुष्कळशा अद्भुत घटना घडताहेत हे पाहून नंदाला आश्चर्य वाटले. त्याला वसुदेवाचे म्हणणे पुन्हा पटले. (२७-३३) एकदा यशोदा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन मोठ्या प्रेमाने त्याला दूध पाजत होती. हे राजा ! त्याचे जवळ जवळ दूध पिऊन झाले होते. तेव्हा यशोदा त्याचे मधुर हास्ययुक्त मुख कुरवाळत होती. त्याचवेळी श्रीकृष्णांना जांभई आली आणि मातेने त्यांच्या मुखात असे पाहिले की, त्यात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, समुद्र, द्वीप, पर्वत, नद्या, भवने आणि सर्व चराचर पदार्थ भरले आहेत. परीक्षिता ! आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून यशोदा थरथर कापू लागली. तिने अत्यंत आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले. (३४-३७) अध्याय सातवा समाप्त |