श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६ वा

पूतना उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे नाही; म्हणून संकट येईल, या भितीने ते मनोमन भगवंतांना शरण गेले. पूतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती. ल्हान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते. कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्त्यांमधून लहान मुले मारण्यासाठी फिरत असे. जेथील लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भिती घालविणार्‍या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण करीत नाहीत, तेथेच राक्षसांचे फावते. आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पूतना इच्छेनुसार रूप धारण करीत होती. एके दिवशी नंदांच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वतःला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळात शिरली. तिने अंबाड्यावर मोगर्‍याची वेणी माळली होती. सुंदर वस्त्रे परिधान केली होती. जेव्हा तिची कर्णफुले हालत असत, तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे केस शोभिवंत दिसत होते. तिचे नितंब आणि स्तन उभार होते, तर कंबर बारीक होती. आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती. हातात कमळ घेऊन येणार्‍या त्या रूपवती रमणीला पाहून गोपींना वाटले की, जणू स्वतः लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली आहे. (१-६)

बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधीत सहजपणे नंदांच्या घरात शिरली. तेथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले. परंतु राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो, त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवले होते. चराचराचा आत्मा असणार्‍या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे, हे जाणून आपले डोळे बंद केले. जसे एखाद्याने नकळत, झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पूतनेने उचलून मांडीवर घेतले. (७-८)

मखमली म्यानात लपविलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पूतनेचे हृदय क्रूर होते. परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती. रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले, पण तिच्या सौंदर्यप्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहातच राहिल्या. इकडे तिने त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला. त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष लावलेले होते. तेव्हा भगवंतांनी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणांसह तिचे दूध प्राशन केले. तिची सर्व मर्मस्थाने खिळखिळी झाली. "अरे सोड ! सोड ! पुरे कर !" असे ओरडत वारंवार आपले हात-पाय आपटीत ती रडू लागली. तिने डोळे फिरवले आणि तिचे शरीर घामाने थबथबले. तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरांसह पृथ्वी आणि ग्रहांसह अंतरिक्ष डगमगू लागले. सातही पाताळे आणि दिशा दुमदुमून गेल्या. विजा कोसळतात की काय या शंकेने पुष्कळसे लोक जमिनीवर कोसळले. परीक्षिता ! अशा प्रकारे पूतनेच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की, ती गतप्राण झाली. ती मूळ रूपाने प्रगट झाली, केस विस्कटले. इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन वृत्रासुर जसा पडला होता, तशीच ती सुद्धा बाहेर गोठ्यात हातपाय पसरून पडली. (९-१३)

राजेंद्रा ! पूतनेच्या शरीराने खाली पडता पडता सुद्धा सहा कोस अंतरातील झाडे उन्मळून पाडली. ही तर मोठीच अद्‌भुत घटना घडली. पूतनेचे शरीर अत्यंत भयानक होते. तिचे तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते. तिच्या नाकपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते. लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरले होते. डोळे अंधार्‍या विहीरीप्रमाणे खोल, नितंब नदीच्या उंच किनार्‍याप्रमाणे भयंकर, हात, जांघा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते. तसेच पोट, पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होते. पूतनेचे ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले. तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय, कान आणि डोके अगोदरच फुटल्यासारखे झाले होते. जेव्हा गोपींनी पाहिले की, बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत, तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले. (१४-१८)

यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचे शेपूट अंगावरून फिरविणे इत्यादि उपायांनी त्या बाळाचे सर्वप्रकारे (दुष्ट शक्तींपासून) रक्षण केले. त्यांनी प्रथम त्याला गोमूत्राने स्नान घातले. नंतर सर्व अंगाला गायीच्या अंगावरील धूळ लावली आणि त्यानंतर बाराही अंगांना भगवंताच्या नामांनी शेण लावून पीडा शमन केले. त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करन्यास केले. तसेच बालकाच्या अंगावर बीजन्यास केले. (१९-२१)

गोपी म्हणू लागल्या - "अजन्मा भगवान तुझ्या पायांचे, मणिमान गुडघ्यांचे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, हयग्रीव पोटाचे, केशव हृदयाचे, ईश वक्षस्थळाचे, सूर्य कंठाचे, विष्णू हातांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करोत. तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत, गदाधारी श्रीहरी पाठीमागे, धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूंना, शंखधारी उरुगाय चारी कोपर्‍यांमधे, उपेंद्र वर, गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूंनी रक्षणासाठी राहोत. हृषीकेश इंद्रियांचे आणि नारायण प्राणांचे रक्षण करोत. श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत. पृष्निगर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत. खेळताना गोविंद रक्षण करोत. निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत. चालताना वैकुंठ आणि बसलेल्यावेळी श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाचे वेळी तुझे रक्षण करोत. डाकिनी, राक्षसी, कूष्मांडा इत्यादि बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच्च, यक्ष, राक्षस आणि विनायक, कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका इत्यादि, शरीर, प्राण तसेच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद, अपस्मार इत्यादि रोग, स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्धग्रह आणि बालग्रह इत्यादि सर्व अनिष्ट घटक, भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावोत. (२२-२९)

श्रीशुकाचार्य म्हणतात - अशा प्रकारे प्रेम करणार्‍या गोपींनी रक्षामंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दूध पाजून पाळण्यात निजविले. त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुरेहून गोकुळात पोहोचले. तेव्हा पूतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले. ते म्हणू लागले, वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल. किंवा हेही शक्य आहे की, वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील. कारण ते जसे म्हणाले होते, तसेच संकट येथे दिसून आले. तोपर्यंत व्रजवासींनी कुर्‍हाडींनी पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेऊन एकेक अवयव चितेवर ठेवून जाळून टाकले. कृष्णाने दूध प्याल्यामुळे ज्याची सर्व पापे तत्काळ नष्ट झाली, असा तो तिचा देह जळत असता, त्यातून धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला. पूतना एक राक्षसी होती. लोकांच्या लहान मुलांना मारणे आणि त्यांचे रक्त पिणे हेच तिचे काम होते. श्रीकृष्णांनासुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेनेच स्तनपान करविले होते. तरीसुद्धा तिला सद्‌गती मिळाली. तर मग जे लोक परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात, त्यांच्यासंबंधे काय बोलावे ? सर्वांना वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणार्‍या चरणांनी पूतनेचे शरीर दाबून, भगवंतांनी तिचे स्तनपान केले होते. जरी ती राक्षसी होती, तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळाली. तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत (ब्रह्मदेवाने वासरे व गोपबालक यांना लपवून ठेवले त्यावेळी) प्रेमाने प्याले, त्या गाई आणि मातांची गोष्ट काय सांगावी ? पुत्रप्रेमाने आपणहून पाझरणारे ज्यांचे दूध भगवंत भरपूर प्याले, त्यांना भगवान देवकीनंदनांनी मोक्षापर्यंत सर्व काही दिले. राजन् ! ज्या गोपी व गाई नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहात होत्या, त्या अज्ञानजनित संसारचक्रात कधीही अडकू शकत नाहीत. (३०-४०)

नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला, तेव्हा, ’हे काय आहे ? हा सुगंध कोठून येत आहे ?’ असे म्हणत ते व्रजामध्ये पोहोचले. तिथे गोपांनी त्यांना पूतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितला. पूतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे, हे ऐकून ते लोक अतिशय विस्मयचकित झाले. परीक्षिता ! मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला, उदार नंदांनी उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगून ते अतिशय आनंदित झाले. हा ’पूतना-मोक्ष’ भगवान श्रीकृषणाची अद्‌भुत बाललीला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे श्रवण करतो, त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागते. (४१-४४)

अध्याय सहावा समाप्त

GO TOP