|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५ वा
गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - उदार नंदमहाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले. नंतर वेदवेत्त्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याहवाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म-संस्कार केला. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधिपूर्वक पूजा केली. त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गाई दान दिला. तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे सात ढीग दान दिले. कालगतीने (नवीन पाणी, अशुद्ध भूमी इ.), स्नानाने (शरीर इ.) तपश्चर्येने (इंद्रिये इ.) संस्कारांनी (गर्भ इ.) यज्ञाने (ब्राह्मण इ.) दानाने (धन, धान्य इ.) आणि संतोषाने (मन इ.) द्रव्ये शुद्ध होतात. आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. त्यावेळी ब्राह्मण, मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक, वंशाचे वर्णन करणारे व स्तुतिपाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले. त्यामध्ये सुगंधीत द्रव्ये शिंपडली गेली. त्यांना ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजविले गेले. गाई, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गेरूने रंगविले. तसेच मोरपंख, फुलांचे हार, तर्हेतर्हेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. राजा ! सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदांच्या घरी आले. (१-८) यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींनासुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्रे, अलंकार आणि डोळ्यात काजळ वगैरे घालून त्या नटल्या. गोपींची मुखकमले नुकत्याच लावलेल्या कुंकूरूपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती. मोठमोठ्या नितंब असलेल्या त्या, भेटवस्तू घेऊन लगबगीने यशोदेकडे गेल्या; त्यामुळे त्यांची वक्षःस्थळे हालत होती. गोपींच्या कानांमध्ये चमकणार्या वस्त्रांची कुंडले झगमगत होती. गळ्यामध्ये सुवर्णाहार चमचम करीत होते. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुले वाटेत ओघळून पडत होती. हातामध्ये बांगड्या चमकत होत्या. लगबगीमुळे त्यांच्या कानांतील कुंडले, वक्षःस्थळे आणि हार हलत होते. अशा प्रकारे नंदांच्या घरी जाताना त्यांची आगळीच शोभा दिसत होती. त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की, "भगवान याचे दीर्घ काळ रक्षण करो." असे म्हणून हळद-तेल-मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या. (९-१२) सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजाच्या व्रजामध्ये प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी निरनिराळी मंगल वाद्ये वाजविण्यात येऊ लागली. आनंदाने बेहोष होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गाई दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य इत्यादि कलांवर उदरनिर्वाह करणार्यांना नंदांनी आनंदाने त्यांनी त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे, असे त्यांना वाटत होते. नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्रे, हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती. परीक्षिता ! त्याच दिवसापासून नंदांच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान् श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे तसेच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थान बनले. (१३-१८) परीक्षिता ! काही दिवसांनंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसर्या गोपांवर सोपवून नंद कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले. आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे, असे जेव्हा वसुदेवांना समजले, तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वसतिस्थानाकडे ते गेले. वसुदेवांना पाहताच नंद ताबडतोव उठून उभे राहिले. जणूकाही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले. हे राजा ! नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर-सत्कार केला. ते आरामात बसले, त्यावेळी वसुदेवांचे चित्त आपल्या पुत्राकडे लागले होते. नंदांना खुशाली विचारून ते म्हणाले. (१९-२२) (वसुदेव म्हणाले) - "बंधो ! तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झाले नव्हते. एवढेच काय, आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती. पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पुनर्जन्मच समजले पाहिजे. जसे नदीच्या प्रवाहात वाहणार्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रारब्ध असणार्या प्रियजनांचेसुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहाणे संभवत नाही. हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांसह ज्या महावनात राहतोस, तेथे पाणी, गवत आणि झाडे वेली भरपूर आहेत ना ? ते जनावरांना अनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहेत ना ? बंधो ! माझा मुलगा त्याच्या (रोहिणी) आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहात आहे. त्याचे पालन-पोषण तू आणि यशोदा करीत आहात. म्हणून तो तुम्हांलाच आपले माता-पिता मानीत असेल. तो सुखरूप आहे ना ? ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते, तोच धर्म, अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो, तो धर्म, अर्थ आणि काम हितकारक नाही. (२३-२८) नंद म्हणाले - कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. शेवटी एक मुलगी वाचली होती, तीसुद्धा स्वर्गाकडे गेली. प्राण्यांचे सुख-दुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते यात काहीही संशय नाही. भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे. जीवनाच्या सुख-दुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो, तो ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही. (२९-३०) वसुदेव म्हणाले - बंधो ! आता तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास. आपली भेटही झाली. आता तू येथे अधिक दिवस राहू नकोस. कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत. (३१) श्रीशुकदेव म्हणतात - वसुदेव जेव्हा असे म्हणाला, तेव्हा नंदादि गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या छकड्यांवर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली. (३२) अध्याय पाचवा समाप्त |