|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४ था
कंसाच्या हातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्यकथन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! जेव्हा वसुदेव परत आले, तेव्हा नगराच्या बाहेरील आणि आतील सर्व दरवाजे आपोआप पहिल्याप्रमाणे बंद झाले. यानंतर बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून द्वारपाल उठले. ते ताबडतोव कंसाकडे गेले आणि देवकीला मूल झाल्याचे त्यांनी सांगितले. भयभीत कंस याच गोष्टीची वाट पहात होता. ते ऐकताच तो ताबडतोब पलंगावरून उठून लगबगीने सूतिकागृहाकडे गेला. हा आपल्या काळाचाच जन्म आहे, असे समजून तो व्याकूळ झाला होता आणि यामुळे केस विस्कटलेल्या अवस्थेतच तो अडखळत चालला होता. तेथे येताच सती देवकी दीनवाणी होऊन रडत रडत त्या आपल्या भावाला म्हणाली, "हे माझे हित चिंतिणार्या बंधो ! ही कन्या तुला सुनेप्रमाणे आहे. शिवाय स्त्रीला मारणे मुळीच योग्य नाही. हे बंधो ! तू माझ्या पुष्कळ अग्नीसमान तेजस्वी बालकांना दैववशात मारले आहेसच. निदान आता ही कन्या तरी मला दे. हे राजा, माझी अनेक मुले मारल्यामुळे दुःखी झालेली मी तुझी बिचारी धाकटी बहीण आहे. म्हणून हे बंधो ! मला अभागिनीला हे शेवटचे मूल तरी दे." (१-६) श्रीशुकदेव म्हणतात - मुलीला कवटाळून देवकीने अत्यंत दीनपणे रडत रडत अशी याचना केली. परंतु दुष्ट कंसाने तिला अपशब्द बोलून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली. आपल्या त्या नवजात भाचीचे पाय पकडून तिला जोराने एका खडकावर आपटले. त्याच्या हृदयातील प्रेमाला जणू स्वार्थाने मुळासकट उपटून टाकले होते. परंतु श्रीकृष्णाची ती धाकटी बहीण त्याच्या हातातून निसटून ताबडतोब आकाशात गेली आणि तीच, आपल्या आठ हातात शस्त्रास्त्रे घेतलेली मोठी देवी झालेली त्याला दिसली. ती दिव्य माळा, वस्त्रे, चंदन आणि रत्नमय अलंकारांनी विभूषित होती. तिच्या हातामध्ये धनुष्य, त्रिशूळ, बाण, ढाल, तलवार, शंख चक्र आणि गदा ही आठ आयुधे होती. सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा, किन्नर आणि नाग तिची स्तुती करीत होते. देवी कंसाला म्हणाली, "अरे मूर्खा ! मला मारून तुला काय मिळणार आहे ? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसर्या ठिकाणी कोठेतरी जन्माला आला आहे. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नकोस." असे म्हणून भगवती योगमाया तेथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली. (७-१३) देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याचवेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला. अग ताई ! अहो भावोजी ! अरेरे ! मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो, त्याचप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली. मी इतका दुष्ट आहे की, माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल बरे ! मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. फक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली. तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणूनच ते सर्वकाळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही. त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे, हे चालूच असते. परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही. (१४-१९) जे लोक हे तत्त्व जाणत नाहीत, ते या शरीरालाच आत्मा समजतात. यामुळेच पुत्रादि देहांशी संयोग व वियोग होतो, तेव्हा सुख-दुःखरूपी संसारातून सुटका होत नाही. म्हणून हे ताई ! मी जरी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस; कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपापल्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असे मानतो की ’आपण मरणारा आहे किंवा मारणारा आहे’ तो पर्यंत शरीराच्या जन्म-मृत्यूचा अभिमान धरणारा हा अज्ञानी जीव पीडा देणारा वा पीडा भोगणारा होतो. माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी; कारण तुम्ही सज्जन आहात. असे म्हणून कंसाने देवकी-वसुदेवांचे पाय धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. यानंतर त्याने योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले. कंसाला पश्चात्ताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याचवेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले, "हे कंसा ! तू म्हणतोस ते खरे आहे. अज्ञानामुळेच जीव शरीर इत्यादिंना ’मी’ असे समजतो. यामुळेच आप-परभाव निर्माण होतो. आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह आणि मदाने लोक आंधळे होतात. आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसर्या वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत, याचे त्यांना भान राहात नाही. (२०-२७) श्रीशुकदेव म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपट भावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला. ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि योगमायेने जे सांगितले होते, ते सर्व कथन केले. कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते. दैत्य असल्यामुळे स्वभावतःच ते देवांचा द्वेष करीत होते. आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला म्हणाले. "भोजराज ! असे असेल तर आम्ही आजच शहरे, गावे, गवळ्यांच्या वस्त्या इत्यादि ठीकाणी जेवढी लहान मुले असतील, मग ती दहा दिवसांच्या आतील किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो. रणांगणाला भिणारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत ? ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकूनच नेहमी घाबरलेले असतात. जेव्हा आपण त्यांच्यावर बाणवर्षाव करून त्यांना घायाळ करता, तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव पळू लागतात. काही देव तर आपली शस्त्रास्त्रे जमिनीवर टाकून हात जोडून दीनपणा प्रगट करू लागतात. तर काही जण शेंड्या सोडून कासोटे फेडून आपल्याला शरण येतात आणि म्हणतात की, "आम्ही भयभीत झालो आहोत, आमचे रक्षण करा." जे शत्रू शस्त्रास्त्रप्रयोग विसरले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडले आहेत, जे भयभीत झाले आहेत, जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ज्यांची आयुधे मोडली आहेत किंवा ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरविली आहे, अशांना आपण मारीत नाही. जिथे भांडण तंटा नसेल तेथेच देवांचे शौर्य. रणभूमीच्या बाहेरच ते फुशारकी मारतात. ते, तसेच एकांतवासात राहणारा विष्णू, वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे ? आमचे मत असे आहे की, असे असले तरी देवांची उपेक्षा करता कामा नये; कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट धरतो आणि मग असाध्य होतो, किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूची आधी उपेक्षा केली तर मग तो आपले सामर्थ्य वाढवितो आणि मग त्याचा प्रभाव करणे अवघड होऊन बसते. देवांचा आधार विष्णू आहे आणि जिथे सनातन धर्म आहे, तिथे तो राहतो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ; ही सनातन धर्माची मुळे होत. म्हणून हे भोजराज ! वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादि हविर्द्रव्य देणार्या गाईंचा आम्ही संपूर्ण निःपात करू. ब्राह्मण, गाई, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रियदमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीरे आहेत. तो विष्णूच सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे. परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे, हाच त्याला मारण्याचा उपाय आहे. (२८-४२) श्रीशुकदेव म्हणतात - अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला - मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणार्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संतपुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला. त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त, विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता; म्हणूनच त्यांनी संतांचा द्वेष केला. जे लोक संचाचा अनादर करतात, त्यांचे ते कुकर्म, त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ति, धर्म, इह-परलोक, आशा-आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते. (४३-४६) अध्याय चवथा समाप्त |