|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३ रा
भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते, आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे उच्चस्थितीत होते, त्यावेळी भगवान् प्रगट झाले. (१) त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या. नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते, सरोवरांमध्ये कमळे उमलली होती, वनांतील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या, त्यावर पक्षी किलबिल करीत होते, तर कुठे भ्रमर गुणगुणत होते. पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहात होता. ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, ते यावेळी प्रज्वलित झाले. (२-४) असुरांचा नाश इच्छिणार्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली, तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले. जनार्दनांच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र ! सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा, तसे प्रकट झाले. (५-८) वसुदेवांनी पाहिले की, त्यांच्यासमोर एक अद्भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात आहेत. त्याने हातांमध्ये शंख, गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पीतांबर झळकत आहे. मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता. पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंतच आले आहेत, असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. श्रीकृष्णांचा अवतार झाला, या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याचवेळी ब्राह्मणांना दहा हजार गाई दान देण्याचा संकल्प केला. परीक्षिता ! भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भिती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले. (९-१२) वसुदेव म्हणाले, आपण प्रकृतीच्या पलीकडे असे साक्षात पुरुषोत्तम आहात, हे मी जाणले. आपण केवलस्वरूप अनुभवगम्य व आनंदस्वरूप आहात. आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात. आपणच सर्वाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच असूनही नव्याने प्रविष्ट झालात असे वाटते. जोपर्यंत महत्तत्त्व इत्यादि कारणतत्त्वे वेगवेगळी असतात तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते. पण जेव्हा ती इंद्रिये इत्यादि सोळा विकारांशी एकरूप होतात तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यांत ती प्रविष्ट झाली आहेत असे वाटते. परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाहीत. कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे, तीमध्ये ती अगोदर पासूनच असतात. त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यामध्ये असता, तरीसुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही. कारण आपण सर्व काही आहात, सर्वंचे अंतर्यामी आणि आत्मस्वरूप आहात. गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही. म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत. तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल ? जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो, तो अज्ञानी होय; कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वाग्विलासाखेरीज दुसरे काहीहे नाही हे सिद्ध होते. विचारांतून ज्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध होत नाही, परंतु जी बाधित होते, तिला खरे समजणारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल ? हे प्रभो ! आपण स्वतः सर्व क्रिया, गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात, असे म्हणतात. ही गोष्ट सर्वसत्ताधीश परब्रह्म अशा आपल्याशी विसंगत नाही. कारण तिन्ही गुणांचे आश्रय आपण आहात. म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो. आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्त्वमय शुक्लवर्ण (पोषणकारी विष्णुरूप) धारण करता, उत्पत्तीसाठी रजःप्रधान रक्तवर्ण (सृजनकारी ब्रह्मारूप) आणि प्रलयाच्या वेळी तमोगुणप्रधान कृष्णवर्ण (संहारकारी रुद्ररूप) यांचा स्वीकार करता. प्रभो ! आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात. या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या अधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत. आपण त्या सर्वांचा संहार कराल. हे देवाधिदेवा ! दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भितीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले. आता त्याचे दूत, तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आत्ताच्या आता हातात शस्त्र घेऊन धावत येईल. (१३-२२) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! इकडे देवकीने पाहिले की, आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भिती वाटली. परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली. (२३) देवकी म्हणाली प्रभो ! वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे, जे ब्रह्म, ज्योतिःस्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे, जे अनिर्वचनीय, निष्क्रिय व फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते, बुद्धी इत्यादींचे प्रकाशकरूप म्हणजेच विष्णू, आपण स्वतः आहात. ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य - दोन परार्ध वर्षे - समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात, पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात, कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते, त्यावेळी एकमेव आपणच शेष (शिल्लक) राहता. म्हणून आपले नाव "शेष’ असेही आहे. हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो ! निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागांत विभागलेला असा जो हा महान काल आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे, ती आपली एक लीला आहे. आपण सर्वशक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात. मी आपणास शरण आले आहे. प्रभो ! हा जीव मृत्युरूप कराल सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे. परंतु याला कोठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही. आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणारविंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेत आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा याला घाबरून पळून गेला आहे. प्रभो ! आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात; म्हणून भ्यालेल्या आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करावे. आपले हे चतुर्भुज दिव्यरूप ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणार्या माणसांसमोर हे प्रगट करू नका. हे मधुसूदना ! तुझा जन्म झाला, ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझे धैर्य खचू लागले आहे. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे, हे विश्वात्मन् ! आपले हे शंख, चक्र, गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. जसे एकादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परम पुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात, ही आपली अद्भुत मनुष्य-लीलाच नाही का ? (२४-३१) श्री भगवान् म्हणाले - हे माते ! स्वायंभुव मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू पृश्नी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. जेव्हा ब्रह्मदेवांनी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रियनिग्रह करून तीव्र तपश्चर्या केली. तुम्ही पाऊस, वारा, ऊन, थंडी, उन्हाळा इत्यादि त्या त्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुऊन टाकले. तुम्ही दोघे कधी वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनच राहिलात. माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केलीत. माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्षे निघून गेली. हे पुण्यमयी देवी ! त्यावेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो; कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते. त्या वेळी तुम्हा दोघांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणार्यांचा राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो होतो आणि ’वर मागा’ म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात. त्यावेळेपर्यंत विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता. तुम्हांला संततीही नव्हती. म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही माझ्याकडून मोक्ष मागितला नाही. माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हांला प्राप्त झाला आणि मी तेथून निघून गेलो. आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले. या जगात स्वभाव, औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी ’पृष्निगर्भ’ या नावाने प्रख्यात झालो. नंतर पुढील जन्मामध्ये तू अदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्या वेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो. माझे नाव उपेंद्र होते. शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणत. हे माते ! तुमच्या या तिसर्या जन्मातसुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो. माझे वचन नेहमी सत्य असते. (तीन वेळा का ? श्रीकृष्णांनी म्हणजेच वर देतेवेळी भगवंतांनी विचार केला की, ’माझ्यासारखा पुत्र होईल’ असा मी वर दिला खरा; पण माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्यामुळे मी माझे वचन सत्य करू शकत नाही. अशावेळी मागितलेल्या वस्तूच्या तिप्पट वस्तू दिली असता असत्याचा दोष लागत नाही. तेव्हा आपण स्वतःच तीन वेळा त्यांचा पुत्र व्हावे, म्हाणजे आपले वचन सत्य होईल.) (३२-४३) मी तुम्हाला माझे हे रूप यासाठी दाखविले की, तुम्हांला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे. मी जर असे केले नसते, तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार ओळखू शकला नसता. तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा. अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हांला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. (४४-४५) श्रीशुकदेव म्हणतात - एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता-पिता त्यांच्याकडे पहात असतानाच त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले. तेव्हा वसुदेवांनी भगवंताच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सूतिकागृहाच्या बाहेर निघावे, असे ठरविले. त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली. त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते. परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजांजवळ पोहोचले, तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे. त्यावेळी ढग हळू हळू गर्जना करीत वर्षाव करीत होते, म्हणून शेष आपल्या फणांनी पाऊस अडवीत भगवंतांच्या पाठोपाठ चालू लागला. त्या दिवसात वारंवार पाऊस पडत होता, त्यामुळे यमुनेचे पाणी वाढले होते. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता. पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता. शेकडो भयानक भोवरे निर्माण झाले होते. तरीही ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती, त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली. नंदांच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिले की, सगळे गोप गाढ झोपी गेले आहेत. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावर झोपविले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आहे. कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरुणावर झोपविले आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. तिकडे नंदपत्नी यशोदेला मूल झालाचे समजले. परंतु दमल्यामुले व योगमायेने मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र की कन्या हे समजले नाही. (४६-५३) अध्याय तिसरा समाप्त |