|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २ रा
भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - बलवान कंसाने जरासंधाच्या साहाय्याने प्रलंबासुर, बकासुर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविद, पूतना, केशी, धेनुक बाणासुर, भौमासुर इत्यादि पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला. (१-२) तेव्हा ते भयभीत होऊन कुरू, पंचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषध, विदेह आणि कौशल या देशांत जाऊन राहिले. काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक-एक करून देवकीची सहा मुले मारली, तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले. (३-५) मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली. "देवी ! कल्याणी ! तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी रोहिणी राहात आहे. त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत. सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. हे कल्याणी ! नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. सर्व वर देण्यास समर्थ असणार्या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप, दीप, नैवेद्य इत्यादि अर्पण करून तुझी पूजा करतील. लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादि अनेक नावे ठेवतील. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात ’संकर्षण’ म्हणतील, तो लोकरंजन करणार असल्यामुळे त्याला राम म्हणतील, आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे ’बल’ सुद्धा म्हणतील. (६-१३) जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने "जशी आपली आज्ञा’ असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला, तेव्हा तेथील नागरीक दुःखी अंतःकरणाने देवकीचा गर्भपात झाला, असे म्हणू लागले. (१४-१५) भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात. त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते. जगाचे मंगल करणार्या, सर्वात्मक व आत्मरूप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्व दिशा चंद्राला धारण करते, त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धारण केले. (येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता.) घड्यामध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसर्याला न देणार्या गर्विष्ठ ज्ञान्याच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचासुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहात असूनही लोकांना जाणवला नाही. (हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती.) देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते. तिच्या देहर्यावर पवित्र हास्य होते; आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृह झगमगत होते. कंसाने जेव्हा तिला पाहिले, तेव्हा तो मनात म्हणू लागला की, "यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिले आहेत. कारण यापूर्वी कधीही देवकी अशी दिसत नव्हती. आता या बाबतील मला लवकरात लवकर काय केले पाहिजे बरे ? देवकीला मारणे तर उचित होणार नाही. कारण स्वार्थासाठी वीरपुरुष आपलापराक्रम कलंकित करीत नाही. शिवाय ही स्त्री असून, माझी बहीण आहे. तसेच गर्भवती आहे. हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तत्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. जो अत्यंत क्रूरपणे वागतो, तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात, इतकेच नव्हे तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो." कंस जरी देवकीला मारू शकत होता, तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रूर विचारापासून परावृत्त झाला. आता भगवंतांच्याबद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्यांच्या जन्माची वाट पाहू लागला. (भगवत् सान्निध्यामुळेच त्याचे दुष्ट विचार मावळले.) तो उठता, बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपेत आणि चालता-फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसत असे. (१६-२४) भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि नारदादि ऋषी तेथे आले आणि श्रीहरींची स्तुती करू लागले." प्रभो ! आपण सत्यसंकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीच्यापूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य असता. (म्हणून असत्य सृष्टी सत्य वाटते.) पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पाच भासमान सत्यांचे आपणच कारण आहात आणि अंतर्यामीरूपाने त्यांमध्ये विराजमान सुद्धा आहात." आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुर वाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहोत. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे. सुख आणि दुःख ही याला दोनफळे आहेत. सत्त्व, रज आणि तम ही तीन मुळे आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार रस आहेत. कान, त्वचा, नेत्र, जीभ आणि नाक हे याला जाणण्याचे पाच प्रकार आहेत. उत्पन्न होणे, स्थिर असणे, वाढणे, बदलणे, क्षय होणे आणि नष्ट होणे हे याचे सहा स्वभाव आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र अशा सात धातू या वृक्षाच्या साली आहेत. पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ फांद्या आहेत. याला मुख, डोळे, कान, नाक, गुद, शिश्न अशी नऊ द्वारे म्हणजेच ढोली आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राण ही याची दहा पाने आहेत. या संसाररूप वृक्षावर जीव व ईश्वर हे दोन पक्षी आहेत. या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी आहेत. या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र आपणच आहात. आपल्यामध्येच याचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेनेच याचे रक्षण सुद्धा होते. ज्यांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेले आहे, तेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणार्या ब्रह्मदेव इत्यादि देवांना अनेक रूपांत पाहतात, ते ज्ञानी नव्हेत. आपण ज्ञानस्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूपे धारण करता. आपली ती रूपे विशुद्ध सत्त्वमय असून ती संतांना सुख देणारी व दुष्टांचे अकल्याण करणारी असतात. हे कमलनेत्र ! सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या आश्रयस्वरूप आपल्या रूपात पूर्ण एकाग्रतेने आपले चित्त लावू शकणारे आणि आपल्या चरणकमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसार सागराला, वासराच्या खुराने पडलेला खड्डा ओलांडावा तसे, सहजपणे पार करणारे विरळाच होत. संतांनी हाच मार्ग पत्करला आहे. हे प्रकाशरूप परमात्मन ! आपले भक्त जगाचे खरे हितैषी असतात. ते स्वतः तर या भयंकर आणि कष्टाने पार करता येण्यासारख्या संसार सागराला आपल्या चरणकमलांच्या नैकेने पार करतातच; परंतु इतरांच्या कल्याणासाठी ती येथेच ठेवतात. कारण आपण भक्तांवर अनुग्रह करणारे आहात. हे कमलनयन ! जे लोक आपल्या चरणकमलांना शरण येत नाहीत, तसेच आपल्याबद्दल ज्यांच्या मनात भक्ती नाही, त्यांची बुद्धीसुद्धा शुद्ध होत नाही. ते स्वतःला खोटे-खोटेच आपण मुक्त आहोत असे मानतात. त्यामूळे उत्तम कुळ, तपश्चर्या, ज्ञान इत्यादि साधने प्राप्त होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारे का होईना, मोक्षपदाच्या जवळ पोहोचले तरी त्यांचे पतन होते. परंतु हे माधवा ! ज्यांचे आपल्या चरणांवर निस्सीम प्रेम आहे, असे आपले भक्त कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत. कारण हे प्रभो ! आपण त्यांचे रक्षण करत असल्यामुळे ते विघ्नकर्त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून निर्भयपणे विहार करतात. आपण जगाच्या स्थितीसाठी, सर्व प्राण्याचे कल्याण करणारे विशुद्ध सत्त्वमय, मंगलरूप धारण करता. ते रूप प्रगट होण्यानेच आपल्या भक्तांना वेद, कर्मकांड, अष्टांगयोग, तपश्चर्या, समाधी इत्यादि साधनांनी त्या रूपाचा आधार घेऊन आपली आराधना करता येते. हे प्रभो ! आपले हे विशुद्ध सत्त्वमय निजस्वरूप जर नसेल, तर अज्ञान आणि त्यामुळे उत्पन्न होणारी भेदबुद्धी नष्ट करणारे प्रत्यक्ष ज्ञान कोणालाच होणार नाही. तीन गुणही आपलेच आहेत आणि आपल्यामुळेच ते प्रकाशित होतात, परंतु या गुणांच्या प्रकाशात आपल्या स्वरूपाचे फक्त अनुमानच बांधता येते. हे भगवन ! मन आणि वेद-वाणी यांच्या योगाने आपल्या स्वरूपाचे केवळ अनुमान करता येते. कारण आपण त्यांचे साक्षी आहात. म्हणून आपले गुण, जन्म आणि कर्म यांमुळे आपल्या नाम आणि रूपाचे निरूपण करता येत नाही. तरीसुद्धा आपले भक्त उपासनेने आपला साक्षात्कार करून घेतात. जो मनुष्य आपल्या मंगल नामांचे आणि रूपांचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करतो, तसेच आपल्या चरणकमलातच आपले चित्त गुंतवून ठेवतो, त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही. हे हरे ! आमच्या भाग्यामुले सर्वेश्वर अशा आपल्या अवताराने आपल्या चरणरूप पृथ्वीचा भार नाहीसा झाला. प्रभो ! आम्हांला आपल्या सुंदर चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळणार आणि आपल्या कृपेने स्वर्गलोकही कृतार्थ झालेला पाहायला मिळणार, हे आमचे केवढे सौभाग्य ! हे प्रभो ! आपण अजन्मा असून जन्म घेता, याचे कारण ही आपली एक लीला आहे, असेच आम्हांला वाटते. कारण, हे नित्यमुक्त ! जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात. प्रभो ! आपण जसे अनेक वेळा मत्स्य, हयग्रीव, कूर्म, नृसिंह, वराह, हंस, राम परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि तिन्ही लोकांचे रक्षण केलेत, त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा. हे यदुश्रेष्ठ ! आम्ही आपल्या चरणांना वंदन करीत आहोत. हे देवकीमाते ! आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान पुरुषोत्तम आपल्या शक्तींसह आले आहेत, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता आपण मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला अजिबात भिऊ नका. आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करील. (२५-४१) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! ब्रह्मदेवादि देवांनी ज्यांच्याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही, अशा भगवंतांची अशी स्तुती केली आणि ते स्वर्गाकडे गेले. (४२) अध्याय दुसरा समाप्त |