श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १ ला

भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन,
वसुदेव-देवकीविवाह आणि कंसाकडून देवकीपुत्रांची हत्या -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजा परिक्षिताने विचारले - भगवन ! आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशांच्या राजांची अद्‍भुत चरित्रे, तसेच धर्मप्रेमी यदूंचेसुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात, आपला अंश असलेल्या श्रीबलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान् श्रीकृष्णांचे चरित्र आम्हांला ऐकवावे. प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या, त्या विस्ताराने आम्हांला सांगा. अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात, जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला, आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल ? युद्धात देवांनासुद्धा जिंकणारे भीष्मादि अतिरथीरूपी प्रचंड मासे ज्यात होते, असा कौरवसेनेचा अपार सागर, माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने, वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे, इत्यक्या सहजतेने पार केला. कौरव आणि पांडव या दोन्ही वंशांचे बीज, असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते, त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली. तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले. हे विद्वन ! सर्व शरीर धारण करणार्‍याच्या आत आत्मरूपाने राहून अमृततत्वाचे आणि बाहेर कालरूपाने राहून मृत्यूचे दान करणार्‍या आणि मनुष्यरूपाने प्रगट होणार्‍या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे. (१-७)

आपण आताच सांगितले की, बलराम रोहिणीचे पुत्र होते (९.२४.४६). त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्येसुद्धा आपण त्यांची गणना केलीत. दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांना पुत्र होणे कसे शक्य आहे ? भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून व्रजभूमीकडे का गेले ? तसेच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कोठे कोठे निवास केला ? केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या ? तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले ? मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्षे निवास केला ? आणि त्यांना किती पत्‍न्या होत्या ? हे सर्वज्ञ मुनिवर ! श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणार्‍या मला त्यांच्या या व इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात. आपल्या मुखकमलातून पाझरणार्‍या, भगवंतांच्या अमृतकथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणार्‍या मला असह्य अशी ही तहानभूक मुळीच सतावीत नाही. (८-१३)

सूत म्हणतात ! शौनका ! भगवंतांच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवांनी परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले आणि कलिमलांना नाहीसे करणार्‍या श्रीकृष्ण चरित्राचे वर्णन करण्यास प्रारंभ केला. (१४)

श्रीशुकाचार्य म्हणाले - हे श्रेष्ठ राजर्षे ! तू जो काही निश्चय केला आहेस, तो अतिशय सुंदर आहे; कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो. (१५-१६)

त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती पृथ्वी ब्रह्मदेवांना शरण गेली. त्यावेळी तिने गाईचे रूप धारण केले होते. तिच्या डोळ्यांतून आसवे वाहात होती. ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती. ब्रह्मदेवांकडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले. ब्रह्मदेवांनी ते ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर व अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनार्‍यावर गेले. तेथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुषसूक्ताने जगत्पालक, सर्वांतर्यामी, देवाधिदेव श्रीविष्णूंची स्तुती केली. त्यांनी समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली. त्यानंतर ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवांनो ! भगवंतांची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा. वेळ लावू नका. पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील, तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनीही जन्म घ्यावा. (१७-२३)

स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा, जे भगवंतांची कला असल्याकारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्र मुखे आहेत, ते भगवंतांचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. जिने सार्‍या जगाला मोहित केले आहे, ती भगवंतांची ऐश्वर्यशालिनी योगमायासुद्धा, त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीलाकार्य संपन्न करण्यासाठी, अंशरूपाने अवतार घेईल. (२४-२५)

श्रीशुकदेव म्हणतात - प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवांनी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजून घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परम धामाकडे गेले. पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरानगरीत राहून माथुर शूरसेन या देशांवर राज्य करीत होता. त्या वेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती. भगवान श्रीहरी नेहमी तेथे विराजमान असतात. एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्य नवपरिणीत पत्‍नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. उग्रसेनाचा पुत्र कंस, याने आपली चुलत बहीण देवकी हिला खूष करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले. देवकाचे (देवकीचा पिता) आपल्या कन्येवर प्रेम होते, म्हणून तिला सासरी पाठविते वेळी त्याने तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले चारशे हत्ती, पंधरा हजार घोडे, अठराशे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित दोनशे सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या. निघण्याच्या वेळी वर-वधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदंग आणि दुंदुभी वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवीत होता, त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की, अरे मूर्खा ! जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेत, तिचा आठवा पुत्र तुला मारील. (२६-३४)

कंस अत्यंत पापी व दुष्ट होता, तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर, निलज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले. (३५-३६)

वसुदेव म्हणाले - तू भोजवंशाची कीर्ति वाढविणारा आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ति गातात. असे असता एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास ? हे वीरा ! जे जन्म घेतात, त्यांच्या शरीराबरोबरच मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा शंभर वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. जेव्हा शरीराचा अंत होतो, तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते. ज्याप्रमाणे चालतेवेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो, किंवा जशी अळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून आणि इंद्रादिकांचे ऐश्वर्य ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो आणि आपले मूळ स्वरूप विसरतो. त्याचप्रमाणे जीव कर्मानुसार कामना करून दुसर्‍या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो. देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीरांकडे धावता धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते, तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे सूर्य-चंद्रादि वस्तू पाणी, तेल इत्यादि द्रव पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वार्‍याने द्रवपदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात, त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर प्रेम करून ते आपणच आहे, असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या-जाण्याला आपले येणे-जाणे मानू लागतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते, त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये. कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील, त्याला या जीवनात शत्रूकडून आणि जीवानंतर परलोकापासून भय असतेच. ही तुझी धाकटी बहीण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी दीन झाली आहे. म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने ह्या बिचारीचा वध करणे बरे नव्हे ! (३७-४५)

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजाविले. परंतु तो क्रूर, राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. (४६) कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की, कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टाळली पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरविले की, "जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे, तो पर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे. प्रयत्‍न करूनही जर तो टळला नाही, तर त्यात प्रयत्‍न करणार्‍याचा काही दोष नाही. म्हणून या मृत्युरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे. जर मला पुत्र झाले, आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर (निदाह ही तरी वाचेल). न जाणो उलटही होईल. कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो. ज्यावेळी जंगलात आग लागते, त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही, या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही. त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण कळणे अत्यंत अवघड आहे." आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवांनी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली. कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता, म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला क्लेश होत होते, तरीसुद्धा त्यांनी वरवर आपला चेहरा प्रफुल्लित करीत, हसत हसत ते म्हणाले, (४६-५३)

वसुदेव म्हणाले - हे सौम्य ! आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भिती नाही. भय तर पुत्रापासून आहे, म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन. (५४)

श्रीशुकदेव म्हणतात - वसुदेव खोटे बोलणार नाही, हे कंस जाणून होता म्हणून त्याने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले. योग्य वेळी सर्वदेवतास्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टाने कंसाकडे आणून दिले. कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. सज्जनांना असह्य असे काय असते ? ज्ञानी पुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते ? नीच पुरुषांना न करण्यासारखे काय असते ? आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते ? हे राजा ! वसुदेवांचा जीवन-मृत्यूमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला. आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भिती नाही; कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. "ठीक आहे" असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले. परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. (५५-६१)

परिक्षिता ! इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाले की, " अरे कंसा ! गोकुळात राहणारे नंद इत्यादि गोप, त्यांच्या पत्‍न्या, वसुदेव इत्यादि वृष्णिवंशी यादव, देवकी इत्यादि यदुवंशातील स्त्रिया आणि नंद, वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत. यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत, तेसुद्धा देवच आहेत." त्यांनी असेही सांगितले की, "दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत." असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले, तव्हा कंसाचा निश्चयच झाला की, हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे. म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे पुत्र होत गेले, त्यांना विष्णू समजून मारून टाकले. पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता-पिता, बंधू किंवा इष्ट-मित्र यांचीही हत्या करतात. कंसाला हे माहीत होते की, आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते. म्हणूनच त्याने यादवांशी वैर मांडले होते. बलवान कंसाने यदू, भोज आणि अंधक वंशांचे राजे असलेल्या आपल्या पित्याला - उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वतः शूरसेनदेशाचे राज्य करू लागला. (६२-६९)

अध्याय पहिला समाप्त

GO TOP