श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २४ वा

अविदर्भाच्या वंशाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - राजा विदर्भाला भोज्या नावाच्या पत्‍नीपासून कुश, क्रथ आणि रोमपाद असे तीन पुत्र झाले. विदर्भवंशात रोमपाद हा कुलदीपक होता. (१)

रोमपादाचा पुत्र बभ्रू, बभ्रूचा कृती, कृतीचा उशिक आणि उशिकाचा चेदी. राजन ! या चेदीच्या वंशातच शिशुपाल इत्यादी राजे झाले. क्रथाचा पुत्र झाला कुंती, कुंतीचा धृष्टी, धृष्टीचा निर्वृत्ती. निर्वृत्तीचा दशार्ह आणि दशार्हाचा व्योम. (२-३)

व्योमाचा जीमूत, जीमूताचा विकृती, विकृतीचा भीमरथ, भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ झाला. दशरथापासून शकुनी, शकुनीपासून करंभी, करंभीपासून देवरात, देवरातापासून देवक्षत्र, देवक्षत्रापासून आयू आणि आयूपासून सात्वताचा जन्म झाला. परीक्षिता ! सात्वताला भजमान, भजी, दिव्य, वृष्णी, देवावृध, अंधक आणि महाभोज असे सात पुत्र झाले. भजमानाच्या दोन पत्‍न्या होत्या. एकीपासून निम्लोची, किंकिण आणि धृष्टी असे तीन पुत्र झाले. दुसर्‍या पत्‍नीपासूनसुद्धा शताजित, सहस्राजित आणि अयुताजित असे तीन पुत्र झाले. (४-८)

देवावृधाच्या पुत्राचे नाव बभ्रू होते. देवावृध आणि बभ्रू यांच्यासंबंधी असे म्हटले जाते की, "आम्ही लांबून जसे ऐकले होते, तसेच आता जवळून पाहात आहोत." (९)

बभ्रू मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृध देवांच्या समान आहे. कारण बभ्रू आणि देवावृधाकडून उपदेश घेऊन चौदा हजार पासष्ट माणसांनी परमपद प्राप्त करून घेतले आहे. सात्वताच्या पुत्रांमध्ये महाभोजसुद्धा मोठा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले. (१०-११)

परीक्षिता ! वृष्णीचे सुमित्र आणि युधाजित असे दोन पुत्र झाले. युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे दोन पुत्र होते. अनमित्रापासून निम्न जन्मला. (१२)

निम्नाचेच सत्राजित आणि प्रसेन नावाचे पुत्र होते. अनमित्राचा शिनी नावाचा पुत्र होता. शिनीपासूनच सत्यकाचा जन्म झाला. (१३)

याच सत्यकाचा युयुधान नावाचा पुत्र होता, तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला. सात्यकीचा जय, जयाचा कुणी आणि कुणीचा पुत्र युगंधर झाला. अनमित्राच्या तिसर्‍या पुत्राचे नाव वृष्णी होते. श्वफल्काच्या पत्‍नीचे नाव गांदिनी होते. तिला सर्वांत ज्येष्ठ अक्रूराव्यतिरिक्त आसंग, सारमेय, मृदुर, मृदुविद, गिरी, धर्मवृद्ध, सुकर्मा, क्षेत्रोपेक्ष, अरिमर्दन, शत्रुघ्न, गंधमादन आणि प्रतिबाहू असे बारा पुत्र झाले. त्यांना सुचीरा नावाची एक बहीणसुद्धा होती. अक्रूराचे देववान आणि उपदेव असे दोन पुत्र होते. श्वफल्काचा भाऊ चित्ररथ. याला पृथू, विदूरथ इत्यादि पुष्कळ पुत्र झाले. ते वृष्णिवंशीय होते. (१४-१८)

सात्वताचा पुत्र अंधक. याचे कुकुर, भजमान, शुची आणि कंबलबर्ही असे चार पुत्र होते. त्यांमध्ये कुकुराचा पुत्र वह्नी, वह्नीचा विलोमा, विलोमाचा कपोतरोमा आणि कपोतरोमाचा अनू होता. अनूचा मित्र तुंबुरू. अनूचा पुत्र अंधक. अंधकाचा दुंदुभी, दुंदुभीचा अरिद्योत, अरिद्योताचा पुनर्वसू आणि पुनर्वसूचा आहुक नावाचा एक पुत्र आणि आहुकी नावाची एक कन्या होती. आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे चार पुत्र झाले. (१९-२१)

यांच्या धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवकी अशा सात बहिणी होत्या. वसुदेवांनी या सर्वांशी विवाह केला होता. (२२-२३)

उग्रसेनाचे कंस, सुनामा, न्यग्रोध, कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि तुष्टिमान असे नऊ पुत्र होते आणि कंसा, कंसावती, कंका, शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा पाच कन्या होत्या. त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवांच्या लहान भावांशी झाला होता. (२४-२५)

विदूरथापासून शूर, शूरापासून भजमान, भजमानापासून शिनी, शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून हृदीक झाले. हृदीकाला देवबाहू, हतधन्वा आणि कृतवर्मा असे तीन पुत्र झाले. देवमीढाचा पुत्र शूर. याच्या पत्‍नीचे नाव मारिषा होते. शूराला तिच्यापासून वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आनक, सृंजय, श्यामक, कंक, शमीक, वत्सक आणि वृक असे दहा पुण्यवान पुत्र झाले. वसुदेवांच्या जन्माच्यावेळी देवतांचे नगारे आणि नौबती आपोआप वाजू लागल्या होत्या. म्हणून त्यांचे आनकदुंदुभी असे नाव पडले. तेच भगवान श्रीकृष्णांचे वडील. वसुदेव इत्यादींच्या पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी अशा पाच बहिणी होत्या. वसुदेवाचे वडील शूरसेन. यांचा कुंतिभोज नावाचा मित्र होता. कुंतिभोज निपुत्रिक होता, म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली. म्हणून तिचे नाव कुंती. (२६-३१)

कुंतीने दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली. एके दिवशी त्या विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासठी तिने पवित्र होऊन सूर्यमंत्राने सूर्याचे आवाहन केले. त्याचवेळी सूर्यदेव तेथे आले. तांना पाहून कुंतीचे हृदय आश्चर्याने भरून गेले. ती म्हणाली, "भगवन ! मला क्षमा करा. मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता. आता आपण परत जावे." सूर्यदेव म्हणाले - "देवी ! माझे दर्शन निष्फळ होऊ शकत नाही. म्हणून हे सुंदरी ! आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल. पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही, असे मी करीन." (३२-३४)

असे म्हणून तिच्या उदरात गर्भ स्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेले. त्याचवेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. कुंतीने लोकनिंदेच्या भितीने जड अंतःकरणाने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडले. तिचा विवाह तुझे पणजोबा पराक्रमी पांडू यांच्याशी झाला. (३५-३६)

श्रुतदेवेचा विवाह करूष देशाचा राजा वृद्धशर्मा याच्याशी झाला. हाच पूर्वी सनकादी ऋषींच्या शापामुळे हिरण्याक्ष झाला होता. केलय देशाचा राजा धृष्टकेतू याने श्रुतकीर्तीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला संतर्दन इत्यादी पाच कैकय राजकुमार झाले. राजाधिदेवीचा विवाह जयसेनाशी झाला. त्याला विंद आणि अनुविंद असे दोन पुत्र झाले. ते दोघेही अवंती नगरीचे राजे झाले. चेदिराज दमघोष याने श्रुतश्रवेचे पाणिग्रहण केले. त्याचा पुत्र होता शिशुपाल. याचे वर्णन पूर्वीच केलेले आहे. देवभागाची पत्‍नी कंसा. हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्बल असे दोन पुत्र झाले. देवश्रवाची पत्‍नी कंसवती. हिच्यापासून सुवीर आणि इषुमान नावाचे दोन पुत्र झाले. आनकाची पत्‍नी कंका. हिच्यापासून शत्रुहित आणि पुरुजित असे दोन पुत्र झाले. सृंजयाला पत्‍नी राष्ट्रपालीपासून वृष, दुर्मर्षण इत्यादी अनेक पुत्र झाले. श्यामकाला शूरभूमी नावाच्या पत्‍नीपासून हरिकेश आणि हिरण्याक्ष नावाचे दोन पुत्र झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. वृकाला दुर्वार्क्षीपासून तक्ष, पुष्कर, शाल इत्यादी अनेक पुत्र झाले. शमीकाला सुदामिनीपासून सुमित्र, अर्जुनपाल इत्यादी अनेक पुत्र झाले. कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे दोन पुत्र झाले. (३७-४४)

वसुदेवांच्या पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला देवकी इत्यादी पत्‍न्या होत्या. त्यांत देवकी मुख्य होती. रोहिणीपासून वसुदेवांना बलराम, गद, सारण, दुर्मद, विपुल, ध्रुव, कृत इत्यादी पुत्र झाले होते. (४५-४६)

पौरवीपासून त्यांना भूत, सुभद्र, भद्रवाह, दुर्मद, भद्र इत्यादी बारा पुत्र झाले. कौसल्येला वंशाचा दिवा असा कोशी नावाचा एकच पुत्र झाला होता. त्यांना रोचनेपासून हस्त, हेमांगद इत्यादी आणि इलेपासून उरुवल्क इत्यादी प्रधान यदुवंशी पुत्र झाले. परीक्षिता ! धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतिदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत इत्यादी अनेक पुत्र झाले. उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष इत्यादी दहा राजे झाले आणि श्रीदेवेचे वसू, हंस, सुवंश इत्यादी सहा पुत्र झाले. हे राजा ! देवरक्षितेपासून गद इत्यादी नऊ पुत्र झाले. धर्माने जसा आठ वसूंना जन्म दिला, तसा वसुदेवांनी सहदेवेपासून पुरुविश्रुत इत्यादी आठ पुत्रांना जन्म दिला. वसुदेवांना देवकीपासून आठ पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संतर्दन, भद्र, शेषावतार श्रीबलराम आणि आठवा पुत्र म्हणजे स्वतः श्रीभगवानच होते. तसेच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा हीसुद्धा वसुदेवांचीच कन्या होती. (४७-५५)

जगात जेव्हा जेव्हा धर्माचा र्‍हास आणि पापाची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. परीक्षिता ! भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेत; त्यांच्या आत्मस्वरूपिणी योगमाये व्यतिरिक्त त्यांच्या जन्म किंवा कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही. त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म, स्थिती आणि मृत्यूला कारण आहे; आणि त्यांची कृपाच मायेचा निरास करून आत्मस्वरूप प्राप्त करून देणारी आहे. जेव्हा राजांच्या रूपांतील असुर कित्येक अक्षौहिणी सेना एकत्र करून सगळ्या पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागले. तेव्हा पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामांसह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पनासुद्धा करता येणार नाही, अशी कार्ये केली. (५६-६०)

त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणार्‍या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख, शोक आणि अज्ञान नाहीसे करणार्‍या परम पवित्र यशाचा विस्तार केला. त्यांचे यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आहे. एकदा जरी कानांच्या ओंजळींनी त्याचे आचमन केले, तरी कर्माच्या वासना समूळ नष्ट होतात. भोज, वृष्णी, अंधक, मधू, शूरसेन, दशार्ह, कुरू, सृंजय आणि पांडव नेहमी भगवंतांच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करीत असत. त्यांनी आपल्या सर्वांगसुंदर शरीराने, तसेच आपल्या प्रेमळ हास्य, मधुर अंतःकरण, प्रसादपूर्ण वचन आणि पराक्रमपूर्ण लीलांच्या द्वारा सर्व भूलोकाला आनंदविभोर केले होते. सुंदर कानातील मकराकृती कुंडलांनी चमकणार्‍या गालांनी शोभणारे आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाला उधाण आणणारे त्यांचे मुखकमल कितीही पाहून स्त्री-पुरुष तृप्त होत नसत. ते आनंदित तर होतेच, परंतु पापण्यांच्या लवण्यावरही रागावत. भगवान मथुरेमध्ये वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले. तेथील कार्य पूर्ण केले. नंतर अनेक शत्रूंचा संहार केला. अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला. त्याचबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणार्‍या वेदांची लोकांत स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतःच स्वतःचे पूजन केले. त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भार हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली. तसेच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेनेच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजविला. नंतर उद्धवाला आत्मतत्त्वाचा उपदेश करून ते परमधामाला गेले. (६१-६७)

अध्याय चोतेविसावा समाप्त

GO TOP