श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय २३ वा

अनू, द्रुह्यू, तुर्वसू आणि यदुच्या वंशाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य सांगतात - अनूला सभानर, चक्षू आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले. समानराचा कालनर, कालनराचा सृंजय, सृंजयाचा जनमेजय, जनमेजयाचा महाशील, महाशीलाचा पुत्र महामना. महामनाला उशीनर अणि तितिक्षू असे दोन पुत्र झाले. उशीनराला शिबी, बन, शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले. शिबीला वृषादर्भ, सुवीर, मद्र आणि कैकेय असे चार पुत्र झाले. तितिक्षूला रुशद्रथ, रुशद्रथाचा हेम, हेमाच सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र होता. (१-४)

राजा बलीच्या पत्‍नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग, वंग, कलिंग, सुह्म, पुंड्रु आणि अंध्र असे सहा पुत्र उत्पन्न केले. यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसविले. अंगाचा पुत्र झाला खनपान. खनपानाचा दिविरथ, दिविरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ. हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध होता. त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली. शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनीबरोबर झाला. विभांडक ऋषींना हरिणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग. रोमापादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही, तेव्ह गणिकांकरवी नृत्य, संगीत, वाद्ये, हाव-भाव, आलिंगन आणि विविध भेटवस्तूंनी ऋष्यशृंगाला रोमपादाने आणविले, तेव्हा पाऊस पडला. जेव्हा त्यानेच इंद्र-देवतेला उद्देशून यज्ञ केला, तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथानेही त्याच्याचकरवी यज्ञ करवून चार पुत्र प्राप्त करून घेतले. रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष. (५-१०)

पृथुलाक्षाचे बृहद्रथ, बृहत्कर्मा आणि बृहद्‌भानू असे तीन पुत्र झाले. बृहद्रथाचा बृहन्मना झाला आणि बृहन्मनाचा जयद्रथ. जयद्रथाच्या पत्‍नीचे नाव संभूती होते. तिच्यापासून विजय झाला. विजयाचा धृती, धृतीचा धृतव्रत, धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला. (११-१२)

अधिरथाला संतान नव्हते. एके दिवशी तो गंगातटाकी विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला. कुंतीला तो कुमारी अवस्थेत झाला होता. अधिरथाने त्यालाच आपला पुत्र मानले. त्याच राजा कर्णाच्या पुत्राचे नाव वृषसेन होते. ययातीचा पुत्र द्रुह्यूपासून बभ्रूचा जन्म झाला. बभ्रूचा सेतू, सेतूचा आरब्ध, आरब्धाचा गांधार, गांधाराचा धर्म, धर्माचा धृत, धृताचा दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता होय. प्रचेताला शंभर पुत्र झाले. ते उत्तर दिशेला म्लेंच्छांचे राजे झाले. तुर्वसूचा वह्नी, वह्नीचा भर्ग, भर्गाचा भानुमान, भानुमानाचा त्रिभानू, त्रिभानूचा उदारबुद्धी करंधम आणि करंधमाचा पुत्र मरुत्त होता. मरुत्त निपुत्रिक होता, म्हणून त्याने पुरुवंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानले होते. परंतु दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला. परीक्षिता ! आता मी ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो. (१३-१८)

यदूचा वंश परम पवित्र आणि मनुष्यांची सर्व पापे नाहीशी करणारा आहे. जो मनुष्य याचे श्रवण करील, तो सर्व पापांपासून मुक्त होईल. या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला आहे. यदूला सहस्रजित, क्रोष्टा, नल आणि रिपू असे चार पुत्र होते. सहस्रजितापासून शतजित याचा जन्म झाला. शतजिताचे महाहय, वेणुहय आणि हैहय असे तीन पुत्र होते. हैहयाचा धर्म, धर्माचा नेत्र, नेत्राचा कुंती, कुंतीचा सोहंजी, सोहंजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र होता. धनकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतवर्मा आणि कृतौजा असे चार पुत्र झाले. कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. त्याने भगवंतांचे अंशावतार श्रीदत्तात्रेय यांचेकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. पृथ्वीवरील कोणताही सम्राट यज्ञ, दान, तपश्चर्या, योग, शास्त्रज्ञान, पराक्रम, विजय इत्यादी गुणांच्या बाबतीत कार्तवीर्य अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकणार नाही. सहस्रबाहू अर्जुन पंचाऐंशी हजार वर्षेपर्यंत सहाही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला. या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही. त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते [कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रवान् । तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥] त्यच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले. जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधू आणि ऊर्जित. (१९-२७)

जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालजंघ होते. तालजंघाला शंभर पुत्र झाले. त्या तालजंघ नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला. त्या शंभर पुत्रांमध्ये वीतिहोत्र सर्वांत थोरला होता. वीतिहोत्राचा पुत्र मधू. मधूचे शंभर पुत्र होते. त्यातील सर्वांत थोरला वृष्णी होता. राजा ! ह्याच मधू, वृष्णी आणि यदू यांच्या मुळे हा वंश माधव, वार्ष्णेय आणि यादव या नावांनी प्रसिद्ध झाला. यदुनंदन कृष्टूच्या पुत्राचे नाव वृजिनवान होते. वृजिनवानाचा पुत्र श्वाही, श्वाहीचा रुशेकू, रुशेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू होते. तो परम योगी, महान भोगैश्वर्यसंपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता. तो चौ रत्‍नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता. परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्‍न्या होत्या. त्यापैकी प्रत्येकीला एक एक लाख मुले झाली होती. अशी त्याची शंभर कोटी मुले होती. त्यांपैकी पृथुश्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते. पृथुश्रव्याच्या पुत्राचे नाव धर्म होते. धर्माचा पुत्र उशना. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते. उशनाचा पुत्र रुचक. रुचकाला पाच पुत्र झाले. त्यांची नावे ऐक. पुरुजित, रुक्म, रुक्मेषु, पृथू आणि ज्यामघ. ज्यामघाच्या पत्‍नीचे नाव शैब्या असे होते. ज्यामघाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान झाले नाही. परंतु त्याने आपल्या पत्‍नीच्या भितीने दुसरा विवाहही केला नाही. एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचे अपहरण केले. जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिले, तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली. "कपट्या ! माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला बसवून आणले आहेस ?" ज्यामघ म्हणाला - "ही तुझी सून आहे." शैब्या हसून पतीला म्हणाली, (२८-३७)

"मी तर पहिल्यापासूनच वांझ आहे आणि मला कोणी सवतही नाही. तर मग ही माझी सून कशी होईल ?" ज्यामघ म्हणाला, "राणी ! तुला जो पुत्र होईल, त्याची ही पत्‍नी होईल." राजा ज्यामघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला. योग्यवेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे नाव विदर्भ ठेवले. त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला. (३८-३९)

अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP