|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २२ वा
पांचाल, कौरव आणि मगध-देशीय राजांच्या वंशांचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! दिवोदासाचा पुत्र मित्रेयू होता. मित्रेयूचे च्यवन, सुदास, सहदेव आणि सोमक असे चार पुत्र होते. सोमकाचे शंभर पुत्र होते; त्यापैकी सर्वांत थोरला जंतू आणि सर्वांत लहान पृषत होता. पृषताचा पुत्र द्रुपद होता. द्रुपदाची द्रौपदी नावाची कन्या आणि धृष्टद्युम्न इत्यादी पुत्र होते. धृष्टद्युम्नाचा पुत्र धृष्टकेतू होता. भर्म्याश्वाच्या वंशात उत्पन्न झालेले हे राजे ’पांचाल’ म्हणविले जातात. अजमीढाचा दुसरा पुत्र ऋक्ष होता. त्याचा पुत्र संवरण. संवरणाचा विवाह सूर्याची कन्या तपती हिच्याशी झाला. कुरूचे परीक्षित, सुधन्वा, जह्नू आणि निषधाश्व असे चार पुत्र होते. (१-४) सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला च्यवन. च्यवनाला कृती, कृतीला उपरिचरवसू आणि उपरिचरवसूला बृहद्रथ इत्यादि अनेक पुत्र झाले. त्यामध्ये बृहद्रथ, कुशांब, मत्स्य, प्रत्यग्र, चेदिप इत्यादि चेदिदेशाचे राजे झाले. बृहद्रथाचा पुत्र कुशाग्र होता. कुशाग्राचा ऋषभ, ऋषभाचा जहू नावाचा पुत्र होता. बृहद्रथाच्या दुसर्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले. (५-७) त्यांना त्यांच्या मातेने बाहेर फेकून दिले. तेव्हा "जरा" नावाच्या राक्षसीने "जिवंत हो, हिवंत हो" म्हणून खेळत खेळत ते दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले. त्या जोडलेल्या बालकाचे नाव जरासंध असे झाले. जरासंधाचा पुत्र सहदेव, सहदेवाचा सोमापी आणि सोमापीचा पुत्र श्रुतश्रवा झाला. कुरूचा ज्येष्ठ पुत्र परीक्षित याला काही संतान झाले नाही. जह्नूचा पुत्र सुरथ होता. सुरथाचा विदूरथ, विदूरथाचा सार्वभौम, सार्वभौमाचा जयसेन, जयसेनाचा राधिक आणि राधिकाचा पुत्र अयुत होता. (८-१०) अयुताचा क्रोधन, क्रोधनाचा देवातिथी, देवातिथीचा ऋष्य, ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप. प्रतीपाचे देवापी, शंतनू आणि बाह्लिक असे तीन पुत्र होते. देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात गेला. म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला. पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभिष असे होते. तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी, तो तरुण होऊन त्याला पूर्वीसारखा आनंद मिळत असे. याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव ’शंतनू’ पडले. एकदा शंतनूच्या राज्यात बारा वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही. यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले, "तू थोरला भाऊ देवापी याच्या अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस, म्हणून तू ’परिवेत्ता’ आहेस. म्हणून तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. आता जर आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे." जेव्हा ब्राह्मणांनी शंतनूला असे सांगितले, तेव्हा त्याने वनात जाऊन देवापीला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतू शंतनूचा मंत्री अश्मरात याने अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठविले होते की, ज्यांनी वेदांना दूषण देणार्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केले होते. त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला. म्हणून तो राज्याभिषेकाला अपात्र ठरला. आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. देवापी अजूनही योगसाधना करीत कलापग्रामात राहात आहे. जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील. शंतनूचा लहान भाऊ बाह्लीक याला सोमदत्त पुत्र झाला. सोमदत्ताला भूरी, भूरेश्रवा आणि शल असे तीन पुत्र झाले. शंतनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा मोठा पुत्र झाला. तो सर्व धर्म जाणणार्यांत अग्रगण्य, भगवंतांचा भक्त आणि परमज्ञानी होता. तो वीरसमूहांचा अग्रगण्य, नेता होता. त्याने आपले गुरू परशुराम यांनासुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाले. (सत्यवती ही उपरिचरवसूची मुलगी एका मासोळीपासून जन्मली होती. तिचे पालन एका कोळ्याने केले होते. म्हणून तिला दाशकन्या म्हटले आहे) चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वाने मारले. शंतनूशी विवाह होण्यापूर्वी याच सत्यवतीपासून पराशरांना भगवंतांचे साक्षात कलावतार, वेदसंरक्षक भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनी झाले. मी त्यांच्याकडूनच या श्रीमद्भागवत महापुराणाचे अध्ययन केले. हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे. म्हणूनच माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत अशा मला शिकविले. शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य. याने स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशिराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला. विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला. तसेच त्याच्या दासीपासून विदुराला जन्म दिला. (११-१५) परीक्षिता ! धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला शंभर पुत्र आणि एक कन्या झाली. त्यांपैकी सर्वांत थोरला दुर्योधन. कन्येचे नाव दुःशला होते. पांडूची पत्नी कुंती. शापित पांडू स्त्रीसहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी कुंती हिला यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे तीन पुत्र झाले. हे तिघेही महारथी होते. (२६-२७) पांडूच्या दुसर्या पत्नीचे नाव माद्री असे होते. दोन्ही अश्विनीकुमारांपासून तिला नकुल आणि सहदेव असे दोन पुत्र झाले. या पाच पांडवांच्या द्वारा द्रौपदीपासून तुझ्या पाचही चुलत्यांचा जन्म झाला. यांपैकी युधिष्ठिराच्या पुत्राचे नाव प्रतिविंध्य होते. भीमसेनाचा पुत्र श्रुतसेन, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानीक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा. यांखेरीज युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक आणि भीमसेनाला हिडिंबेपासून घटोत्कच व कालीपासून सर्वगत नावाचा पुत्र झाला. पर्वतकुमारी विजयेपासून सहदेवाचा सुहोत्र आणि मणिपुर नरेशाच्या कन्येपासून बभ्रुवाहनाचा जन्म झाला. बभ्रुवाहन कराराप्रमाणे मातामहाचाच पुत्र मानला गेला. कारण अगोदरच तसा निर्णय झाला होता. अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला. वीर अभिमन्यूने सर्व अतिरथींना जिंकले होते. त्याच्यापासूनच उत्तरेच्या ठिकाणी तुझा जन्म झाला. ज्यावेळी कुरुवंश नष्ट झाला होता, तेव्हा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास. परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रभावाने तुला मृत्यूच्या जबड्यातून सोडविले. (२८-३४) हे राजा ! तुझे हे जनमेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत. (३५) तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला, हे समजल्यानंतर जनमेजय क्रोधाने सर्प-यज्ञ करून अग्निकुंडात सर्पांचे हवन करील. तो कावयेष तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करील आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारा भगवंतांची आराधना करील. (३६-३७) हे राजा जनमेजयाचा पुत्र शतानीक होईल. तो याज्ञ वल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचे आणि कर्मकांडाचे तसेच कृपाचार्यांनक्डून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. शतानीकाचा सहस्रानीक, सहस्रानीकाचा अश्वमेधज, अश्वमेधजाचा असीमकृष्ण आणि असीमकृष्णाचा पुत्र नेमिचक्र होईल. जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीत वाहून जाईल, तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमिचक्राचा पुत्र होईल चित्ररथ. चित्ररथाचा कविरथ, कविरथाचा वृष्टिमान, वृष्टिमानाचा राजा सुषेण, सुषेणाचा सुनीथ, सुनीथाला नृचक्षू, नृचक्षूचा सुखीनल, सुखीनलाचा परिप्लव, परिप्लवाचा सुनय, सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपंजय, नृपंजयाचा दूर्व आणि दूर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीपासून बृहद्रथ, बृहद्रथापासून सुदास, सुदासापासून शतानीक, शतानीकापासून दुर्दमन, दुर्दमनापासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल. अशाप्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्तीस्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकविले. देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबर समाप्त होईल. आता मी भविष्यात होणार्या मगध राजांचे वर्णन करून सांगतो. (३८-४५) सहदेवापासून मार्जारी, मार्जारीपासून श्रुतश्रवा, श्रुतश्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून निरमित्र नावाचा पुत्र होईल निरमित्राचा सुरक्षत्र, सुरक्षत्राचा बृहत्सेन, बृहत्सेनाचा कर्मजित, कर्मजिताचा सृतंजय, सृतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची होईल. शुचीपासून क्षेम, क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्रापासून शम, शमापासून द्युमत्सेन, स्युमत्सेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा सुनीथ, सुनीथाचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सर्व बृहद्रथवंशाचे राजे होतील. यांचा शासनकाल एक हजार वर्षांचा असेल. (४६-४९) अध्याय बाविसावा समाप्त |