श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १९ वा

ययातीचा गृहत्याग -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - अशा प्रकारे स्त्रीला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अधःपात त्याच्या लक्षात आला. तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला. हे भृगुनंदिनी ! पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांची ही शोकान्तिका ऐक. अशाच गृहस्थांविषयी वनात राहणार्‍या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटते. एक बोकड होता. तो आपल्याला प्रिय वाटणार्‍या वस्तू शोधत जंगलात एकटाच फिरत होता. त्याने स्वतःच्या कर्माने एक बकरी विहिरीत पडली आहे, असे पाहिले. तो कामातुर बोकड बकरीला विहिरीतून वर कसे काढावे याचा विचार करू लागला. त्याने आपल्या शिंगांनी विहिरीजवळची जमीन खोदून रस्ता तयार केला. जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली, तेव्हा तिला तो बोकड आवडला. तो दाढी-मिशावाला बोकड धष्ट-पुष्ट, तरुण आणि विहार करण्यात कुशल असल्यामुळे बकर्‍यांना अत्यंत प्रिय होता. विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रियकर म्हणून निवडलेले पाहून त्यांनीही त्याला आपला पती केले. त्या बोकडाच्या डोक्यावर कामरूपी पिशाच्च स्वार झाले होते. तो एकटाच अनेक बकर्‍यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरवून बसला. (१-६)

विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिले की, हा बोकड दुसर्‍या बकर्‍यांबरोबर रमत आहे, तेव्हा तिला त्याचे ते कृत्य सहन झाले नाही. तिने विचार केला की, हा तात्पुरते प्रेम दाखविणारा कामी मित्ररूपी शत्रूच आहे. म्हणून त्या बकरीने त्या इंद्रियलोलुप बोकडाला सोडून दिले आणि दुःखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली. तो दीन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी "बें-बें" करीत तिच्या पाठोपाठ गेला. परंतु वाटेत तो तिची समजून घालू शकला नाही. त्या बकरीचा मालक एक ब्राह्मण होता. त्याने रागावून बोकडाचा लटकता अंडकोष कापून टाकला. परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोडला. त्याला अशा प्रकारचे पुष्कळ उपाय माहीत होते. प्रिये ! अशाप्रकारे अंडकोष जोडल्यानंतर त्या बोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत उपभोग घेतले. परंतु अजूनही तो तृप्त झाला नाही. हे सुंदरी ! माझीसुद्धा अशीच दशा झाली आहे. तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मीसुद्धा अत्यंत दीन झालो आहे. तुझ्या मायेने मोहित होऊन मी स्वतःलाच विसरलो आहे. (७-१२)

प्रिये ! पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ, जव इत्यादी धान्ये, सुवर्ण, पशू आणि स्त्रिया आहेत, ते सर्वही कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करून शकत नाहीत. विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही; जशी तुपाने आग आणखीच भडकते, त्याचप्रमाणे भोगवासनासुद्धा भोग घेतल्यामुळे अधिक वाढतात. जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेषभाव ठेवीत नाही, तेव्हा तो समदर्शी होतो आणि त्याला सगळीकडे सुखच दिसते. विषयांची इच्छाच दुःखाचे उगमस्थान आहे. अज्ञानी लोकांना तिचा त्याग करणे जमत नाही. शरीर म्हातारे होत जाते, पण इच्छा नाही होत. म्हणून जो आपले कल्याण इच्छितो, त्याने तात्काळ या वासनांचा त्याग केला पाहिजे. आपली आई, बहीण किंवा मुलीबरोबरसुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये. कारण इंद्रिये इतकी बलवान आहेत की, ती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयांकडे ओढून नेतात. विषयांचे वारंवार सेवन करीत करीत माझी एक हजार वर्षे पुरी झाली. तरीसुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे. म्हणून मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंतःकरण परमात्म्यात ठेवून शीत-उष्ण, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे जाऊन, अहंकारातून मुक्त होऊन, हरिणांसह वनात विहार करीन. इहलोक-परलोकाचे भोग मिथ्या आहेत, असे समजून त्यांचा उपभोग घेऊ नये इतकेच नव्हे त्यांचे चिंतनही करू नये. त्यांच्या चिंतनानेच जन्म-मृत्यूरूप संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो, हे समजून त्यापासून अलिप्त राहणाराच आत्मज्ञानी होय. (१३-२०)

आपल्या पत्‍नीला असे सांगून ययातीने पुरूला त्याचे तारुण्य परत केले आणि त्याच्याकडून आपले म्हातारपण परत घेतले. कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषयवासना राहिली नव्हती. यानंतर त्याने आग्नेय दिशेकडे द्रुह्यूला, दक्षिणेकडे यदूला, पश्चिमेकडे तुर्वसूला आणि उत्तरेकडे अनूला राज्य दिले. सगळ्या भूमंडलावरील संपत्तीला योग्य अशा पुरूचा आपल्या सिंहासनावर राज्याभिषेक करून तसेच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून तो वनामध्ये निघून गेला. ययातीने जरी पुष्कळ वर्षेपर्यंत इंद्रियांद्वारा विषयसुख उपभोगले होते, तरीसुद्धा ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपले घरटे सोडून देतो, त्याप्रमाणे त्याने एका क्षणातच सर्व काही सोडून दिले. ययातीने वनात जाऊन सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली. आत्मसाक्षात्कारामुळे त्याचे त्रिगुणमय लिंगशरीर नष्ट झाले. निर्मळ अशा परब्रह्म वासुदेवांमध्ये एकरूप होऊन जाऊन, जी भगवंतांच्या भक्तांना प्राप्त होते, ती गती त्याला मिळाली. देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली, तेव्हा तिला असे वाटले की, हे मला निवृत्ति-मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत; कारण स्त्री-पुरुषांमध्ये प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होते, म्हणून मला सावरण्यासाठी यांनी ही कथा थट्टेत सांगितली. पाणपोईवर जसे वाटसरू येतात, त्याप्रमाणे ईश्वराच्या अधीन असणारे बांधव एकत्र येतात. हा भगवंतांच्या मायेचा खेळ असून स्वप्नवत आहे, असे जाणून देवयानीने सर्व पदार्थांच्या आसक्तीचा त्याग केला आणि आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून, बंधनाला हेतू असलेल्या लिंगशरीराचा त्याग केला. ती म्हणाली, "सर्व जगाचे निर्माणकर्ते, सर्वान्तर्यामी, सर्वांचे आश्रयस्वरूप, सर्वशक्तिमान भगवान वासुदेवांना नमस्कार असो. जे परम शांत आणि अनंत तत्त्व आहेत, त्यांना मी नमस्कार करते." (२१-२९)

अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP