श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १८ वा

ययाति - चरित्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - जशी शरीर धारण करणार्‍याची सहा इंद्रिये असतात, तसे नहुषाचे यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती असे सहा पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र यतीला नहुष राज्य देऊ इच्छित होता, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता. जो राज्यकारभारात प्रवेश करतो, तो आत्मस्वरूपाला विसरतो. जेव्हा इंद्रपत्‍नी शचीशी सहवास करण्याचा प्रयत्‍न केल्यामुळे नहुषाला ब्राह्मणांनी इंद्रपदापासून पदच्युत केले आणि त्याला अजगर बनविले, तेव्हा राजसिंहासनावर ययाती बसला. ययातीने आपल्या चार धाकट्या भावांना चार दिशांना नियुक्त केले आणि स्वतः शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून तो पृथ्वीचे रक्षण करू लागला. (१-४) परीक्षिताने विचारले - भगवन, शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती क्षत्रिय. तर मग ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय वर असा प्रतिलोम (उलटा) विवाह कसा झाला. (५) श्रीशुकदेव म्हणाले - दानवराज वृषपर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या एके दिवशी आपल्या गुरूंची कन्या देवयानी आणि हजारो मैत्रिणींसह आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीच्यामध्ये विहार करीत होते. त्यामध्ये एक मोठे सरोवर होते. सरोवरात कमळे उमललेली होती आणि त्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यांनी आपापली वस्त्रे घाटावर ठेवली आणि सरोवरात प्रवेश करून त्या एक-मेकींवर पाणी उडवून खेळू लागल्या. (६-८) त्याचवेळी तेथे पार्वतीसह नंदीवर आरूढ झालेले भगवान शंकर येऊन पोहोचले. त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोब वर येऊन त्यांनी आपापली वस्त्रे परिधान केली. शर्मिष्ठेने घाईने नकळत देवयानीचे वस्त्र आपले समजून परिधान केले. यावर देवयानी चिडून म्हणाली, " अग ! पहाना या दासीचे हे भलतेच धाडस ! कुत्र्याने यज्ञातील हविष्यान्न खावे, त्याप्रमाणे हिने माझे वस्त्र परिधान केले आहे ! ज्या ब्राह्मणांनी आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली, जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत, जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्म्याला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविला, लोकपाल, देवराज आणि लक्ष्मीदेवीचे परमपावन विश्वात्मा भगवानसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची सेवा करतात, त्या ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आम्ही भृगुवंशी. त्यात हिचा पिता वृषपर्वा आमचा शिष्य. असे असतानाही शूद्राने वेदपठण करावे, त्याप्रमाणे हिने माझी वस्त्रे परिधान केली." जेव्हा देवयानी अशाप्रकारे अद्वातद्वा बोलू लागली, तेव्हा शर्मिष्ठा क्रोधाने डिवचलेल्या नागिणीप्रमाणे निःश्वास टाकीत, दात-ओठ खात तिला म्हणाली, "ए भिकारिणी ! स्वतःला न ओळखता तू किती बडबड करतेस ? कावळ्या-कुत्र्यांप्रमाणे तू आमच्या घराकडे आशाळभूतपणे पाहात नाहीस काय ?" शर्मिष्ठेने अशाप्रकारे अतिशय कडवट शब्दांनी गुरुकन्या देवयानीला फटकारले आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत ढकलून दिले. (९-१७) शर्मिष्ठा घरी निघून गेल्यानंतर शिकार करीत योगायोगाने राजा ययाती तेथे येऊन पोहोचला. त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवयानीला त्याने पाहिले. त्यावेळी तिच्या अंगावर वस्त्र नव्हते; म्हणून त्याने आपला शेला तिला दिला आणि दयाळू अंतःकरणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढले. अत्यंत प्रेमळ शब्दांत वीर ययातीला देवयानी म्हणाली, "हे वीरशिरोमणे राजन ! आज आपण माझा हात धरलात. आता आपण माझा हात धरला आहे, म्हणून दुसर्‍या कोणीही तो धरू नये. हे वीरश्रेष्ठा ! विहिरीत पडल्याकारणाने मला जे अचानकपणे आपले दर्शन झाले, तो ईश्वराने ठरविलेला संबंध होय, असेच समजले पाहिजे. यामध्ये मनुष्य प्रयत्‍न नाहीत. हे वीरश्रेष्ठा ! मी यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच याला शाप दिला होता. म्हणून त्यानेसुद्धा मला शाप दिला होता की, ब्राह्मण माझे पाणिग्रहण करणार नाही." हा संबंध शास्त्रविरुद्ध असल्याने ययातीला मान्य नव्हता. परंतु प्रारब्धानेच आपल्याला ही भेट दिली असून आपले मनसुद्धा हिच्यकडे ओढ घेत आहे, असे पाहून ययातीने तिचे म्हणणे मान्य केले. वीर राजा ययाती जेव्हा निघून गेला, तेव्हा देवयानी रडत पित्याकडे गेली आणि शर्मिष्ठा जे काही म्हणाली, आणि जे तिने केले, ते सर्व तिने त्यांना सांगितले. ते ऐकून भगवान शुकाचार्यांचेसुद्धा मन उद्विग्न झाले. ते पौरोहित्याची निंदा करू लागले. त्यांनी असा विचार केला की, यापेक्षा कबुरताप्रमाणे धान्य वेचून खाणेसुद्धा चांगले. म्हणून ते कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर पडले. वृषपर्व्याला हे समजले, तेव्हा गुरू शत्रूला जाऊन मिळू नये, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याने रस्त्यातच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. भगवान शुक्राचार्यांचा क्रोध तात्कालिक होता. ते वृषपर्व्याला म्हणाले, "राजन ! मी देवयानीला सोडू शकत नाही. म्हणून तिची जी इच्छा असेल, ती तू पुरी कर." "ठीक आहे" असे वृषपर्व्याने म्हटल्यावर देवयानीने आपले मनोगत सांगितले. ती म्हणाली, "वडील मला जेथे देतील आणि मी जेथे जेथे जाईन, तेथे शर्मिष्ठा आपल्या सख्यांसह माझ्या सेवेसाठी येऊ दे." (१८-२८) आपल्या परिवारासह आलेले संकट आणि त्याच्या कार्याचे महत्त्व पाहून शर्मिष्ठेने देवयानीचे म्हणणे मान्य केले आणि एक हजार सख्यांसह ती दासीप्रमाणे तिची सेवा करू लागली. (२९) शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययातीबरोबर लावून दिला आणि शर्मिष्ठेला दासी म्हणून देऊन त्याला सांगितले की, "राजन ! हिला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस. परीक्षिता ! थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली. हे पाहून एक दिवस शर्मिष्ठेने सुद्धा आपल्या ऋतुकाळात देवयानीच्या पतीकडे एकांतात सहवासाची विनंती केली. शर्मिष्ठेने पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे, हे पाहून शुक्राचार्यांचे वचन लक्षात असूनही, धर्मज्ञ ययातीने प्रारब्धावर भरवसा ठेवला. यदू आणि तुर्वसू असे देवयानीला दोन पुत्र झाले आणि शर्मिष्ठेला द्रुह्यू, अनू आणि पुरू असे तीन पुत्र झाले. मानी देवयानीला जेव्हा समजले की, शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता, तेव्हा ती रागाने जळफळत पित्याच्या घरी गेली. कामी ययातीने गोड श्ब्दांनी, पाय चेपणे इत्यादी पद्धतींनी देवयानीची समजून घालण्याचा प्रयत्‍न केला, तिच्या पाठोपाठही तो गेला. परंतु तिचे मन वळवू शकला नाही. शुक्राचार्यसुद्धा क्रोधाने ययातीला म्हणाले, "तू अत्यंत स्त्रीलंपट, मंदबुद्धी आणि खोटारडा आहेस. म्हणून मनुष्याला कुरूप करणारे वृद्धत्व तुला येवो." (३०-३६) ययाती म्हणाला - "ब्रह्मन् ! आपल्या कन्येबरोबर विषयोभोगात अजून मी तृप्त झालो नाही." यावर शुक्राचार्य म्हणाले, "ठीक आहे, जो तुला आपले तारुण्य देईल, त्याला वृद्धत्व देऊन बदल्यात खुशाल तारुण्य घे." शुक्राचार्यांनी जेव्हा अशी व्यवस्था सांगितली, तेव्हा ययाती आपल्या ज्येष्ठ यदू नावाच्या पुत्रास म्हणाला, "पुत्रा ! तू तुझे तारुण्य दे आणि तुझ्या आजोबांनी दिलेले हे म्हातारपण तू स्वीकार; कारण हे पुत्रा, मी अजून विषय भोगून तृप्त झालो नाही; म्हणून तुझे आयुष्य घेऊन मी काही वर्षे विषयानंदाचा उपभोग घेईन." (३७-३९) यदू म्हणाला - "तात ! आपले हे म्हातारपण अकालीच घेऊन मी जिवंतही राहू इच्छित नाही; कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषयसुखाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्याला त्यापासून वैराग्य प्राप्त होत नाही." परीक्षिता ! अशा प्रकारे तुर्वसू, द्रुह्यू आणि अनूनेसुद्धा आपल्या पित्याचे म्हणणे मान्य केले नाही. खरे म्हणाल तर त्या मुलांना धर्माचे तत्त्व माहीत नव्हते. या अनित्य शरीरालाच ते नित्य मानीत होते. शेवटी ययातीने सर्वांत धाकटा परंतु गुणांनी श्रेष्ठ अशा आपल्या पुरू नावाच्या पुत्राला विचारले आणि म्हटले, "पुत्रा ! आपल्या मोठ्या भावांप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस." (४०-४२) पुरू म्हणाला - तात ! ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिले, अशा वडिलांच्या उपकाराची परतफेड या जगात कोण करू शकेल " जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र. सांगितल्यानंतर आज्ञापालन करणार्‍या पुत्राला मध्यम म्हटले जाते. जो आज्ञा केल्यानंतरसुद्धा मनात नसताना तिचे पालन करतो, तो अधम पुत्र होय आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही, त्याला पुत्र म्हणणेच चूक आहे. परीक्षिता ! असे म्हणून पुरूने मोठ्या आनंदाने आपल्या वडिलांचे म्हातारपण स्वीकारले. राजा ययातीसुद्धा त्याचे तारुण्य घेऊन पूर्वीप्रमाणेच विषयसेवन करू लागला. तो सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. प्रजेचे पुत्रवत पालन करीत होता. आणि आपल्या समर्थ इंद्रियांनी विषयांचा यथेच्छ उपभोग घेत होता. देवयानी त्यांची प्रियतमा पत्‍नी होती. तीही आपल्या प्रियतमाला आपले मन, वाणी, शरीर आणि वस्तूंच्या द्वारा दिवसेंदिवस एकांतात अधिकाधिक सुख देऊ लागली. राजा ययातीने सर्व वेदांचा प्रतिपाद्य, सर्वदेवतास्वरूप यज्ञपुरुष श्रीहरींचे पुष्कळ दक्षिणांनी युक्त यज्ञांनी पूजन केले. जशा आकाशात कधी ढगांच्या झुंडी दिसतात तर कधी दिसत नाहीत, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात जे जग स्वप्न, माया आणि मनोराज्याप्रमाणे केवळ कल्पनाच आहे. हे कधी अनेक नामे आणि रूपांनी प्रतीत होते कर कधी नाही. ते परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांचे स्वरूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. त्या सर्वशक्तिमान, सर्वव्यापी भगवान श्रीनारायणांना आपल्या हृदयात स्थापन करून ययातीने निष्काम भावाने त्यांचे पूजन केले. अशाप्रकारे हजारो वर्षे त्याने आपल्या उच्छृंखल इंद्रियांना मनाच्या अधीन करून त्याचे प्रिय विषय उपभोगले. परंतु एवढ्याने सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातीची भोगांच्या बाबतीत तृप्ती होऊ शकली नाही. (४३-५१)

अध्याय अठरावा समाप्त

GO TOP