श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १७ वा

क्ष्रत्रवृद्ध, रजी इत्यादी राजांच्या वंशांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - पुरूरव्याचा आयू नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले. राजा, आता क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र. सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे तीन पुत्र झाले. गृत्समदाचा शुनक पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदीयांमध्ये श्रेष्ठ शौनक झाले. (१-३)

काश्यपाचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा, आणि दीर्घतमाचा धन्वन्तरी. हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोक्ते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वन्तरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ. (४-५)

भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्याचे एक नाव प्रतर्दन असेसुद्धा आहे. हाच द्युमान शत्रुजित, वत्स, ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानाचेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता ! अलर्काखेरीज दुसर्‍या कोणत्याही राजाने सहासष्ट हजार वर्षे तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती. संततीचा सुनीथ. सुनीथाला सुकेतन. सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू. (६-८)

सत्यकेतूपासून धृष्टकेतु, धृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वीतिहोत्र, वीतिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला. (९)

हे सर्व क्षत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रभस, त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्‍नीपासून ब्राह्मणवंश चालू झाला. आता अनेना याचा वंश ऐक. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते. (१०-१२)

देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रह्लाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्हा रजीचा मृत्यू झाला, तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरू बृहस्पतींनी अभिचार-विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रती, प्रतीपासून संजय आणि संजयापासून राजा हर्यवन, हर्यवनापासून सहदेव, सहदेवापासून हीन आणि हीनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला. जयसेनाचा संकृती, संकृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले. आता नहुषवंशाचे वर्णन ऐक. (१३-१८)

अध्याय सतरावा समाप्त

GO TOP