|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २० वा
पुरूचा वंश, राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! आता मी राजा पुरूच्या वंशाचे वर्णन करीन. याच वंशात तुझा जन्म झाला आहे. याच वंशातील वंशज पुष्कळसे राजर्षी आणि ब्रह्मर्षीसुद्धा झाले आहेत. पुरूचा पुत्र जनमेजय झाला. जनमेयाचा प्रचिन्वान, प्रचिन्वानाचा प्रवीर, प्रवीराचा नमस्यू आणि नमस्यूचा पुत्र चारुपद झाला. चारुपदापासून संयाती, संयातीपासून अहंयाती आणि अहंयातीपासून रौद्राश्व झाला. (१-३) विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राणापासून जशी दहा इंद्रिये उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे ऋतेयू, कुक्षेयू, स्थंडिलेयू, कृतेयू, जलेयू, संततेयू, धर्मेयू, सत्येयू, व्रतेयू आणि सर्वांत लहान वनेयू, असे दहा पुत्र झाले. (४-५) परीक्षिता ! त्यांपैकी ऋतेयूचा पुत्र रंतिभार झाला आणि रंतिभाराचे सुमती, ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले. अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व होते. कण्वाचा मेधातिथी झाला. याच मेधातिथीपासून प्रस्कण्व इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाले. सुमतीचा पुत्र रैभ्य झाला. याच रैभ्याचा पुत्र दुष्यंत होता. (६-७) एकदा दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला होता. तेथे तो कण्व मुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. त्या आश्रमात देवमायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसली होती. तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणार्या अंगकांतीने तो आश्रम शोभत होता. त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहित झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला. त्याच्या मनात कामवासना जागृत झाली. थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुर वाणीने स्मित हास्य करीत तिला त्याने विचारले, "कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या हे देवी ! तू कोण आहेस आणि कुणाची कन्या आहेस ? माझे हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणार्या हे सुंदरी ! या निर्जन वनात तू कशासाठी राहतेस ? हे सुंदरी ! मला निश्चितपणे असे वाटते की, तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस. कारण पुरुवंशीयांचे चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही. (८-१२) शकुंतला म्हणाली - "आपले म्हणणे बरोबर आहे. मी विश्वामित्रांची कन्या आहे. मेनकेने मला वनामध्ये सोडून दिले होते. महर्षी कण्वांना हे माहीत आहे. मी आपली काय सेवा करू ? हे कमलनयना ! आपण येथे बसावे आणि आमच्या कडून आदरातिथ्य स्वीकारावे. आश्रमात अन्न आहे. आपली इच्छा असेल तर भोजन करावे आणि योग्य वाटत असेल तर येथेच राहावे. (१३-१४) हे सुंदरी ! तू कुशिकवंशात जन्मलेली असल्याकारणाने हे आदरातिथ्य तुझ्या दृष्टीने योग्यच आहे. कारण राजकन्या स्वतःच आपल्याला योग्य असा पती वरतात." शकुंतलेची संमती मिळाल्यानंतर देश, काल आणि शास्त्र जाणणार्या दुष्यंताने गांधर्वविधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला. अमोघवीर्य दुष्यंताने शकुंतलेशी सहवास केला आणि दुसर्या दिवशी सकाळी तो आपल्या राजधानीकडे परत गेला. योग्यवेळी शकुंतलेला एक पुत्र झाला. (१५-१७) वनामध्ये कण्वांनी राजकुमाराचे जातकर्मादी संस्कार केले. तो मुलगा लहानपणीच सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत असे. (१८) भगवंतांचा अंशांशावतार असलेल्या त्या अमर्याद पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन रमणीरत्न शकुंतला पतीकडे आली. आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र यांचा दुष्यंताने जेव्हा स्वीकार केला नाही, तेव्हा सर्वांना समक्ष आकाशवाणी झाली. "माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे. वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो. कारण पिताच पुत्ररूपाने उत्पन्न होतो; म्हणून दुष्यंता ! तू शकुंतलेचा त्याग करू नकोस. आपल्या पुत्राचे पालन-पोषण कर. राजन ! वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो. शकुंतलेचे म्हणणे खरे आहे. हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे." (१९-२२) दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला. त्याचा जन्म भगवंतांचा अंशापासून झाला होता. आजसुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गाइली जाते. त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिह्न होते आणि पायांवर कमलपुष्पाचे. महाभिषेकाच्या विधीने राजाधिराजाच्या पदावर याला अभिषेक झाला. भरत अतिशय शक्तिशाली राजा होता. ममतेचे पुत्र दीर्घतमा मुनींना भरताने पुरोहित नेमून गंगा तीरावर पंचावन्न आणि यमुना तीरावर अठ्ठ्याहत्तर अश्वमेध यज्ञ केले. या यज्ञांमध्ये त्यांनी धनाचे दान केले. भरताने अग्निस्थापना अतिशय पवित्र स्थानांमध्ये केली होती. त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक एक बद्व (१३०८४) गाई दिल्या होत्या. अशा प्रकारे भरताने १३३ यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केले. शेवटी त्याने आत्मज्ञानाने मायेवरही विजय मिळवून श्रीहरींना प्राप्त करून घेतले. यज्ञामध्ये ’मष्णार’ नावाचे एक कर्म असते, त्यामध्ये भरताने सुवर्ण विभूषित, पांढर्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्ती दान केले. भरताने जे महत्कार्य केले, ते यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा पुढेही कोणी करू शकणार नाही. स्वर्गाला कोणी हात लावू शकतो काय ? भरताने दिग्विजय करतेवेळी किरात, हूण, यवन, अंध्र, कंक, खश, शक, म्लेंच्छ इत्यादी सर्व ब्राह्मणद्रोही राजांना मारून टाकले. पूर्वी बलवान असुरांनी देवांवर विजय मिळवून ते रसातळात राहू लागले होते. त्यावेळी ते देवांगनांना रसातळात घेऊन गेले होते. भरताने त्यांना पुन्हा सोडवून आणले. त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते. भरताने सत्तावीस हजार वर्षेपर्यंत सर्व दिशांचे एकछत्री राज्य केले. शेवटी सार्वभौम संपत्ती, अखंड साम्राज्य आणि हे जीवनसुद्धा मिथ्या आहे, असा निश्चय करून तो संसारातून निवृत्त झाला. (२३-३३) परीक्षिता ! विदर्भराजाच्या तीन कन्या भरताच्या आवडत्या पत्न्या होत्या. जेव्हा भरताने त्यांना सांगितले की, "तुमचे पुत्र मला अनुरूप नाहीत," तेव्हा सम्राट कदाचित आपला त्याग करील, हा भितीने त्यांनी आपल्या पुत्रांना मारून टाकले. अशा प्रकारे भरताचा वंश खंडित होऊ लागला, तेव्हा त्याने संतानप्राप्तीसाठी ’मरुत्सोम’ नावाचा यज्ञ केला. तेव्हा मरुद्गणांनी प्रसन्न होऊन भरताला भरद्वाज नावाचा पुत्र दिला. एकदा बृहस्पतीने आपला भाऊ उतथ्य याच्या गर्भवती पत्नीशी सहवास करण्याची इच्छा केली. त्या वेळी गर्भामध्ये जो बालक दीर्घतमा होता, त्याने विरोध केला. परंतु बृहस्पतीने त्याच्याकडे लक्ष न देता त्याला "तू आंधळा हो" असा शाप देऊन बळजबरीने गर्भाधान केले. आता आपला पती आपला त्याग करील असे वाटून उतथ्याच्या पत्नीने नव्या मुलाचा त्याग करावा असे ठरविले. त्यावेळी देवांनी गर्भस्थ शिशूच्या नावाची व्युत्पत्ती करतेवेळी असे म्हटले. बृहस्पती म्हणाले - "हे मूर्ख स्त्रिये ! हा माझा औरस आणि माझ्या भावाचा क्षेत्रज - अशा प्रकारे दोघांचा पुत्र (द्वाज) आहे, म्हणून तू याचे भरण पोषण कर." यावर ममता म्हणाली - "बृहस्पते ! हा माझ्या पतीचा नव्हे, तर आपल्या दोघांचाच पुत्र आहे म्हणून आपणच त्याचे भरण पोषण करावे." अशाप्रकारे आपापसात वाद करीत माता-पिता असे दोघेही त्याला सोडून निघून गेले. म्हणून मुलाचे नाव ’भरद्वाज’ असे पडले. देवांनी नावाची अशी व्युत्पत्ती करूनही ममता असे समजली की, माझा हा पुत्र वितथ म्हणजेच अन्यायाने उत्पन्न झाला आहे. म्हणून तिने त्या बालकाला सोडून दिले. आता मरुद्गणांनी त्याचे पालन-पोषण केले आणि जेव्हा भरताचा वंश नष्ट होऊ लागला, तेव्हा त्याला आणून त्याच्याकडे दिले. हाच वितथ (भरद्वाज) भरताचा दत्तक पुत्र झाला. (३४-३९) अध्याय विसावा समाप्त |