श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ११ वा

भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवान श्रीरामांनी वसिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्वदेवतास्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले. त्यांनी होत्याला पूर्व, ब्रह्मदेवाला दक्षिण, अध्वर्यूला पश्चिम आणि उद्‌गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली. त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती, ती त्यांनी आचार्यांना देऊन टाकली. त्यांना माहीत होते की, संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ निःस्पृह ब्राह्मणच आहे. अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्याजवळ ठेवले. तसेच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्यलंकारच शिल्लक राहिले. (१-४)

जेव्हा आचार्यादि ब्राह्मणांनी पाहिले की, भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात, त्यांच्या अंतःकरणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे, तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले. त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले, "प्रभो ! आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात. आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञानांधकाराचा नाश करीत आहात. अशा स्थितीत आपण आम्हांला काय दिले नाहीत बरे ? आपले ज्ञान अनंत आहे. पवित्र कीर्ति असणार्‍या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. जे कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत, अशा महात्म्यांना आपण आपले चरणकमल दिले आहेत. असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्ट दैवत मानता. भगवन ! अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत. (५-७)

एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत असता त्यांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले. तो पत्‍नीला म्हणत होता, तू दुष्ट कुलटा आहेस. तू दुसर्‍याच्या घरी राहून आली आहेस. स्त्रीलोभी राम खुशाल सीतेला ठेवून घेऊ देत, परंतु मी तुला पुन्हा घ्रात घेणार नाही. मूर्ख लोकांना खूष ठेवणे अवघड आहे. जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांनी लोकापवादाला भिऊन सीतादेवींचा त्याग केला. तेव्हा त्या वाल्मीकींच्या आश्रमात राहू लागल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. वेळ येताच त्यांनी दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला. वाल्मीकींनी त्यांचे जातकर्मादी संस्कार करून त्यांना कुश आणि लव अशी नावे ठेवली. परीक्षिता ! लक्ष्मणाला अंगद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र आणि भरतालाही तक्ष आणि पुष्कल असे दोन पुत्र होते. तसेच शत्रुघ्नालाही दोन पुत्र झाले - सुबाहू आणि श्रुतसेन. भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला, त्याने त्यांची सर्व संपत्ती आणून ती श्रीरामांकडे सोपविली. शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधूचा पुत्र लवण नावाच्या राक्षसाला मारून तेथे मथुरा नावाची नगरी वसविली. श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मीकींच्या हाती सोपविले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमिप्रवेश केला. ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धिपुरःसर शोकावेग आवरण्याचा प्रयत्‍न केला, परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते तो आवरू शकले नाहीत. हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे. श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो, मग गृहासक्त, विषयी पुरुषांच्यासंबंधी काय सांगावे ? (८-१७)

यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचर्य धारण करून तेरा हजार वर्षेपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले. त्यानंतर आपले स्मरण करणार्‍या भक्तांच्या हृदयात, दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले. (१८-१९)

भगवंताच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही, मग त्यांच्यापेक्षा वरचढ कसा असू शकेल. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतात धारण केला होता. अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नव्हे की, त्यांनी शस्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला. तसे पाहता, शत्रुंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे साहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती. ही सर्व त्यांचे लीलाच आहे. (२०)

ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीरसुद्धा आज उजळ करते, मोठ-मोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्याचे गायन करतात, स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले कीरीट जेथे टेकवतात. त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना मी शरण जात आहे. ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यांना स्पर्श केला, त्यांचा सहवास घेतला आणि अनुयायित्व स्वीकारले ते सगळे अयोध्या निवासीसुद्धा त्याच लोकी गेले, जेथे योगी योगसाधनेने जातात. राजा ! जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामांचे चरित्र ऐकतो, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते आणि तो सर्व कर्मबंधनांपासून मुक्त होतो. (२१-२३)

परीक्षिताने विचारले - भगवान श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते. तसेच भरतादी भाऊ आणि अयोध्यानिवासी प्रजानन भगवान श्रीरामांशी कशा रीतीने वागत ? (२४)

श्रीशुक म्हणतात - त्रिभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वतः निजजनांना दर्शन देत आपल्या अनुयायांसह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले. त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जल आणि हत्तींच्या मदरसाने भिजलेले असत. त्यावेळी असे वाटत होते की, ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे. तेथील महाल, गोपुरे, सज्जागृहे, विहार, देवालये इत्यादींवर सुवर्णकलश बसविले होते आणि ठिकठिकाणी पताका फडकत होत्या. ते नगर देठांपासून सुपारीचे घोस, केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकांनी सजविलेले होते. आरसे, वस्त्रे आणि पुष्पमाळांनी तसेच मंगल चित्रांनी आणि पाना-पुलांच्या तोरणांनी संपूर्ण नगरी झगमगत होती. नगरवासीजन आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना देऊन प्रार्थना करीत की, "महाराज ! पूर्वी आपणच वराहरूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता. आता आपण तिचे पालन करावे." पुष्कळ वर्षांनंतर महाराज आलेले कळले, तेव्हा सर्व स्त्री-पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसेने घरदार सोडून गच्च्यांवर चढून अतृप्त नेत्रांनी कमलनयन भगवंतांना पाहात पाहात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत. (२५-३०)

अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पूर्वज राजे राहात असलेल्या आपल्या महालात येत असत. त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके मोठे खजिने होते की ज्यातील संपत्ती कधीच संपत नसे. ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळ्शा सामग्रींनी सुसज्ज होते. महालांची उंबराची दारे पोवळ्यांनी मढविलेली होती. खांब वैडूर्य मण्यांचे होते. पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरशा होत्या. तसेच स्फटिकाच्या भिंती चमचम करीत असत. रंगी-बेरंगी माळा, पताका, वस्त्रांची आणि मण्यांची चमक, चैतन्याप्रमाणे उज्ज्वल मोती, सुंदर भोगसामग्री, सुगंधी धूप, दीप, तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महाल अतिशय सजविलेले होते. अलंकारांना सुद्धा विभूषित करणार्‍या देवतांप्रमाणे असणारे स्त्री-पुरुष तेथे राहात असत. आत्माराम जितेंद्रिय पुरुषांत अग्रगण्य भगवान श्रीराम त्या महालात आपल्या प्राणप्रिय पत्‍नी श्रीसीतादेवींसह आनंदात राहात असत. सर्व स्त्री-पुरुष ज्यांच्या चरणकमलांचे धान करीत असतात, तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ-काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले. (३१-३६)

अध्याय अकरावा समाप्त

GO TOP