श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १० वा

भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघू झाला. रघूचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला. देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती. (१-२)

परीक्षिता ! सीतापती भगवान श्रीरामांचे चरित्र तत्त्वज्ञानी ऋषींनी पुष्कळसे वर्णन केले आहे आणि तू ते अनेकवेळा ऐकलेही आहेस. (३)

भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी रानावनांत फिरत राहिले. त्यांचे चरण इतके कोमल होते की, प्रियेच्या हातांचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता. तीच पावले जेव्हा वनात चालून चालून थकून जात, तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांचा थकवा दूर करीत. शूर्पणखेला विद्रूप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला, या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भुवया चढवल्या, त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला. यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दावग्नीप्रमाणे भस्म करून टाकले. ते अयोध्यापती आमचे रक्षण करोत. (४)

श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणादेखतच मारीच इत्यादी राक्षसश्रेष्ठांना ठार केले. परीक्षिता ! सीतेच्या स्वयंवर मंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते. श्रीरामांनी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले, तोच मधोमध त्याचे दोन तुकडे झाले. हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणे. वक्षःस्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकले. त्या गुण, शील, वय, शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत श्रीरामांना शोभत होत्या. अयोध्येला परत येताना वाटेत, ज्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती, त्या परशुरामांचा गर्व त्यांनी नष्ट केला. जरी महाराज दशरथांनी पत्‍नीच्या अधीन होऊन तिला तसे वचन दिले होते, तरीसुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते. म्हणून श्रीरामांनी त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो, तसे राज्य, लक्ष्मी, मित्र, हितचिंतक आणि महाल सोडून पत्‍नीबरोबर वनवास पत्करला. वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केले. कारण ती कामुक विचारांची होती. तिच्या खर, दूषण, त्रिशिरा या भावांना व अन्य चौदा हजार राक्षसांना, हातात महान धनुष्य घेऊन श्रीरामांनी ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले. परीक्षिता ! रावणाने जेव्हा सीतेच्या रूप-गुणांविषयी ऐकले, तेव्हा त्याचे हृदय कामवासनेने आतुर झाले. त्याने मारीचाला अद्‌भुत हरिणाच्या रूपात तिच्या पर्णकुटीजवळ पाठविले. तो श्रीरामांना दूरवर घेऊन गेला. जसे दक्षप्रजापतीला वीरभद्राने मारले होते, तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तत्काळ मारून टाकले. नीच राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे श्रीरामलक्ष्मणांच्या अनुपस्थितीत विदेहनंदिनी श्रीसीतादेवींचे अपहरण केले. त्यानंतर ते आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने, भाऊ लक्ष्मणासह, जंगलामध्ये दीनवाणे होऊन फिरू लागले. जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात, त्यांची अशीच गती होते, हेच जणू त्यांनी दाखविले. यानंतर, ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत्सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती, त्या जटायूवर श्रीरामांनी अग्निसंस्कार केला. पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्यापाठोपाठ सुग्रीव इत्यादी वानरांशी मैत्री करून वालीचा वध केला. त्यानंतर वानरांच्या द्वारा आपल्या प्रियेचा शोध लावला. ब्रह्मदेव आणि शंकर ज्यांच्या चरणांची पूजा करतात, तेच मनुष्यरूप भगवान श्रीराम वानरसेनेसह समुद्रतटावर पोहोचले. (तेथे तीन रात्री उपवास करूनही समुद्र भेटायला आला नाही, तेव्हा) त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले. भ्याल्यामुळे समुद्राची गर्जना शांत झाली. तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्यादी वस्तू भेट घेऊन समुद्र भगवंतांच्या चरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला, "अनंता ! आम्ही मूढ असल्याकारणाने जगाचे एकमेव स्वामी, आदिकारण आणि अविनाशी अशा आपल्या खर्‍या स्वरूपाला जाणत नाही. आपण सर्व गुणांचे स्वामी आहात. म्हणून जेव्हा आपण सत्त्वगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा स्वीकार करता, तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होते. हे वीरशिरोमणे ! आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रैलोक्याला रडविणार्‍या विश्रवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्‍नीला घेऊन या. येथे माझ्यावर एक सेतू बांधा. त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठे-मोठे नरपती दिग्विजय करीत येथे येतील, तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील." (५-१५)

भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला. जेव्हा मोठ-मोठे वानर आपल्या हातांनी पर्वत उचलून आणीत, तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठ-मोठे शिलाखंड थरथर कापत असत. यानंतर भगवंतांनी बिभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव, नील, हनुमान इत्यादी प्रमुख असणार्‍या वानरसेनेच्या बरोबर लंकेत प्रवेश केला. हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती. त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरफटका मारण्याची ठिकाणे, खेळाची मैदाने, धान्याची गोदामे, खजिने, दरवाजे, फाटके, सभागृहे, सज्जे आणि पक्ष्यांची घरटीसुद्धा वेढली. त्यांनी तेथील आसने, ध्वज, सोन्याचे कळस आणि चौक तोडून-फोडून टाकले. हत्तींच्या झुंडींनी नदीचे पाणी खळबळून टाकावे त्याप्रमाणे. हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मुख, सुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती, पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठविले. राक्षसांची ती विशाल सेना तलवारी, त्रिशूळ, धनुष्ये, प्रास, ऋष्टी, शक्ती, बाण, भाले, खड्गे इत्यादी शस्त्रास्त्रांमुळे अजिंक्य होती. भगवान श्रीरामांनी सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, गंधमादन, नील, अंगद, जांबवान, पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला. श्रीरामांचे अंगदादी सर्व सेनापती, राक्षसांच्या हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करून त्यांना वृक्ष, पर्वतशिखरे, गदा आणि बाणांनी मारू लागले. वास्तविक श्रीसीतादेवींना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते, त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते. (१६-२०)

राक्षसराज रावणाने जेव्हा पाहिले की, आपली सेना नष्ट होऊ लागली आहे, तेव्हा तो चिडून पुष्पक विमानात बसून, श्रीरामांच्यावर चालून आला. त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला. श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले, तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला. श्रीराम त्याला म्हणाले, "नीच राक्षसा ! कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्‍नीचे हरण केलेस. तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोणी असू शकेल ? ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्वसंपन्नसुद्धा टाळू शकत नाही, त्याचप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो." अशाप्रकारे रावणाची निर्भर्त्सना करीत श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर चढविलेला बाण त्याच्यावर सोडला. त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदीर्ण केले. जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातून खाली पडतात, त्याप्रमाणे तो आपल्या दहाही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला. त्यावेळी बांधव "हाय हाय" करून ओरडू लागले. (२१-२३)

त्यावेळी हजारो राक्षसिणी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालांतून बाहेर पडून रणभूमीवर आल्या. लक्ष्मणांच्या बाणांनी छिन्न-विछिन्न होऊन पडलेल्या आपल्या आप्तांना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या. हाय ! हाय ! लोकांना दहशत बसविणारे रावण महाराज ! आज आमचा घात झाला ! आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे. आता तिचे रक्षण कोण करणार ? महाराज ! आपण कामवश झाल्याने सीतादेवींचा प्रभाव जाणला नाही. त्यामुळे आपली ही दशा झाली. आपण राक्षसकुळाला आनंद देत होता. पण आज तुम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली. आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनला. (२४-२८)

श्रीशुक म्हणतात - श्रीरामचंद्रांच्या आज्ञेने बिभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टिकर्म केले. नंतर भगवान श्रीरामांनी अशोकवाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्रीसीतादेवींना पाहिले. त्या आपल्या विरहाने दुःखी आणि कृश झाल्या होत्या. आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामांचे हृदय करुणेने व्याकूळ झाले. इकडे भगवंतांचे दर्शन झाल्याने सीतदेवींचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्हसित झाले. भगवंतांनी बिभीषणाला राक्षसांचे आधिपत्य, लंकेचे राज्य आणि एक कल्पाचे आयुष्य दिले. त्यानंतर अगोदर सीतादेवींना विमानात बसविले. नंतर लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत यांसह आपण बसले. अशा प्रकार चौदा वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले. त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते. (२९-३३)

इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंतांच्या लीलांचे गायन करीत होते. जेव्हा भगवंतांना समजले की, भरत फक्त गोमूत्रात शिजविलेल्या जवाच्या कण्या खातो, वल्कले नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो, तसेच त्याने जटा वाढविल्या आहेत. तेव्हा करुणेने भगवंतांचे हृदय भरून आले. जेव्हा भरताला समजले की, आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम येत आहेत, तेव्हा तो नागरिक, मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला. जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदीग्राम येथून निघाला, तेव्हा लोक त्याच्याबरोबर मंगलगीते गात व वाद्ये वाजवीत चालू लागले. शेठ सावकार, श्रेष्ठ वारांगना आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान-मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्या बरोबर निघाले. श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भरताचे हृदय आणि डोळे भरून आले. अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहात होत्या. श्रीरामांनी आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपापल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी त्याला न्हाऊ घातले. त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणांसह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांना नमस्कार केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने श्रीरामांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने, आपले स्वामी पुष्कळ दिवसांनंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्पवर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवान केली. भरताने हातात पादुक्या घेतल्या. बिभीषणाने उत्कृष्ट चवर्‍या, सुग्रीवाने पंखा, आणि श्रीहनुमंतांनी पांढरे छत्र धरले. परीक्षिता, शत्रुघ्नाने धनुष्य व भाता, सीतादेवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू, अंगदाने सोन्याचे खड्ग आणि जांबवानाने ढाल घेतली. या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले. योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या. भाट स्तुती करू लागले. राजा ! ग्रह-तार्‍यांनी चंद्र शोभावा, तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते. (३४-४५)

अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या नगरीत प्रवेश केला. त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौसल्या, अन्य माता, गुरुजन, बरोबरीचे मित्र आणि लहान यांचा यथायोग्य सन्मान केला. तसेच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. श्रीसीतादेवी आणि लक्ष्मणसुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले. प्राणांच्या संचाराने मृतशरीरे उठावी, त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि नेत्रांतील अश्रूंनी त्यांना अभिषेक केला. त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला. त्यानंतर वसिष्ठांनी इतर गुरुजनांसह विधिपूर्वक भगवंतांच्या जटा उतरविल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला, त्याचप्रमाणे त्यांना चारही समुद्रांचा पाण्याने व इतर द्रव्यांनी अभिषेक केला. अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्रे, पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले. सर्व बंधू आणि श्री जानकीदेवींनी सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले. त्यांच्या सह भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते. भरताने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली. तेव्हा भगवान श्रीरामांनी राजसिंहासनाचा स्वीकार केला. त्यानंतर ते आपापल्या धर्मामध्ये तत्पर व वर्णाश्रमानुसार आचार करणार्‍या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले. त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती. जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजा झाले, तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते, परंतु ते सत्ययुग आहे असे वाटत होते. परीक्षिता ! त्यावेळी वने, नद्या, पर्वत, वर्षे, द्वीपे आणि समुद्र हे सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करीत. इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग होत नसत. वृद्धावस्था, दुर्बलता, दुःख, शोक, भय आणि थकवा, नाममात्रसुद्धा नव्हते. एवढेच काय, ज्यांना मरण नको असे, त्यांचा मृत्यूही होत नसे. भगवान श्रीरामांनी एकपत्‍नीव्रत घेतले होते. त्यांचे चरित्र राजर्षीसारखे पवित्र होते. गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करीत होते. पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम, सेवा, शील, नम्रता, बुद्धी, लज्जा इत्यादी गुणांनी पतीचे चित्त वेधून घेत असत. (४६-५६)

अध्याय दहावा समाप्त

GO TOP