|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ९ वा
भगीरथ चरित्र आणि गंगावतरण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. परंतु त्यात त्याला यश आले नाही. कालांतराने त्याला मृत्यू आला. अंशुमानाचा पुत्र दिलीप यानेसुद्धा तशीच तपश्चर्या केली. परंतु तोही असफल झाला. पुढे त्यालाही मृत्यू आला. दिलीपाचा पुत्र भगीरथ. त्याने दीर्घ कालपर्यंत तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगेने त्याला दर्शन दिले आणि म्हटले - "मी तुला वर देण्यासाठी आले आहे." तेव्हा भगीरथाने अतिशय नम्रतेने आपले मनोगत प्रकट केले की, "आपण मृत्यूलोकात चलावे." (१-३) गंगा म्हणाली, "ज्यावेळी मी स्वर्गातून पृथ्वीवर पडेन, त्यावेळी माझा वेग धारण करणारा कोणीतरी असला पाहिजे. भगीरथा ! असे न झाल्यास मी पृथ्वी फोडून रसातळात पोचेन. याखेरीज, लोक आपली पापे माझ्यामध्ये धुतील, यासाठीसुद्धा मी पृथ्वीवर येणार नाही. कारण मग मी ती पापे कुठे धुणार ? भगीरथा ! याविषयीही तू विचार कर." (४-५) भगीरथ म्हणला - "सत्पुरुष, संनासी, शांत, ब्रह्मनिष्ठ आणि लोकांना पवित्र करणारे सज्जन आपल्या अंगस्पर्शाने तुझी पापे नष्ट करतील. कारण त्यांच्यामध्ये पाप नाहीसे करणारे भगवान निवास करतात. सर्व प्राण्यांचा आत्मा असणारे रुद्रदेव तुझा वेग धारण करतील. कारण ज्याप्रमाणे वस्त्र सुताने ओतप्रोत भरलेले असते, त्याचप्रमाणे हे सर्व विश्व भगवान रुद्रांमध्येच ओतप्रोत आहे." परीक्षिता ! गंगेला असे सांगून भगीरथाने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. थोड्याच दिवसात महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. संपूर्ण विश्वाचे कल्याण करणार्या शंकरांनी ’तथास्तु’ असे म्हणून राजाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर भगवंतांच्या चरणांच्या स्पर्शाने जिचे पाणी पवित्र आहे, अशा गंगेला दक्ष राहून मस्तकावर धारण केले. यानंतर राजर्षी भगीरथ, जेथे त्यांच्या पितरांची शरीरे राखेचे ढीग होऊन पडली होती, तेथे जगाला पवित्र करणार्या गंगेला घेऊन गेला. वायूप्रमाणे वेगाने चालणार्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता आणि त्याच्या मागे मागे, मार्गात असणार्या देशांना पवित्र करीत, गंगा वेगाने जात होती. शेवटी तिने सगरांच्या जळालेल्या पुत्रांना आपल्या पाण्यात बुडविले. जरी सगराचे पुत्र ऋषींच्या शापाने भस्म झाले होते, तरीसुद्धा केवळ शरीराच्या राखेशी गंगाजलाचा स्पर्श होताच स्वर्गात गेले. जर गंगाजलाचा शरीराच्या राखेशी स्पर्श झाल्यानेही सगरांच्या पुत्रांना स्वर्गाची प्राप्ती झाली, तर मग जे लोक श्रद्धेने नियमपूर्वक गंगामातेचे सेवा करतात, त्यांच्यासंबंधी जे काही येथे सांगितले, त्यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काही नाही. कारण ती भगवंतांच्या चरणकमलांपासून निघाली आहे. ज्या चरणांचे श्रद्धेने चिंतन करून मुनी पवित्र होऊन तिन्ही गुणांचे कठीण बंधन तोडून ताबडतोब भगवत्स्वरूप होतात; तर मग गंगा संसारबंधन तोडून टाकील, यात काय आश्चर्य आहे ? (६-१५) भगीरथाचा पुत्र होता श्रुत. श्रुताचा नाभ. पूर्वी कथन केलेल्या नाभापेक्षा हा वेगळा आहे. नाभाचा पुत्र सिंधुद्वीप होता आणि सिंधुद्वीपाचा आयुतायू. आयुतायूच्या पुत्राचे नाव होते ऋतुपर्ण. तो नलाचा मित्र होता. त्याने नलाला फासा फेकण्याच्या विद्येचे रहस्य सांगितले होते आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून अश्वविद्या शिकून घेतली होती. ऋतुपर्णाचा पुत्र सर्वकाम. परीक्षिता ! सर्वकामाच्या पुत्राचे नाव होते सुदास. सुदासाचा पुत्र होता सौदास आणि त्याच्या पत्नीचे नाव मदयंती होते. सौदासालाच काहीजण मित्रसह म्हणतात आणि काही काही ठिकाणी त्याला कल्माषपाद असेही म्हटले गेले आहे. वसिष्ठांच्या शापाने तो राक्षस झाला होता आणि पुन्हा आपल्या कर्मामुळे तो निपुत्रिक झाला. (१६-१८) परीक्षिताने विचारले - भगवन् ! आम्ही हे जाणू इच्छितो की, महात्मा सौदासाला गुरू वसिष्ठांनी शाप का दिला ? जर यात काही गुप्त नसेल तर सांगावे. (१९) श्रीशुक म्हणाले - सौदास एकदा शिकारीसाठी गेला होता. तेथे त्याने एका राक्षसाला मारले आणि त्याच्या भावाला सोडून दिले. त्याने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आचार्याचे रूप घेऊन तो त्याच्या घरी आला. एक दिवस भोजनासाठी जेव्हा गुरू वसिष्ठ राजाच्या घरी आले, तेव्हा त्याने मनुष्याचे मांस शिजवून त्यांना वाढले. भगवान वसिष्ठांनी अभक्ष्य मांस वाढताना पाहून रागावून राजाला झटकन शाप दिला की, "या कृत्यामुळे तू राक्षस होशील." हे राक्षसाचे काम आहे, असे त्यांना समजले, तेव्हा त्यांनी तो शाप फक्त बारा वर्षापुरताच ठेवला. त्यावेळी सौदाससुद्धा आपल्या ओंजळीत पाणी घेऊन गुरू वसिष्ठांना शाप देण्यासाठी उद्युक्त झाला. परंतु मदयंतीने त्याला अडविले. तेव्हा सौदासाने दिशा, आकाश आणि पृथ्वी ही सर्व जीवमय आहेत, असा विचार करून ते शापजल आपल्या पायावर टाकले. (म्हणूनच त्याचे नाव ’मित्रसह’ असे पडले.) त्या पाण्यामुळे त्याचे पाय काळे पडले होते, म्हणून त्याचे नाव ’कल्माषपाद’ असेही पडले. आता तो राक्षस झाला होता. राक्षस झालेल्या कल्माषपादाने एके दिवशी एका वनवासी ब्राह्मण दांपत्याला एकांतात असताना पाहिले. कल्माषपादाला भूक लागली होती (म्हणून) त्याने ब्राह्मणाला पकडले. ब्राह्मणपत्नीची कामना पूर्ण झाली नव्हती. ती म्हणाली "राजा ! तू राक्षस नाहीस. महाराणी मदयंतीचा पती आणि इक्ष्वाकुवंशाचा वीर महारथी आहेस. असा अधर्म करू नकोस. मला संतानाची इच्छा आहे आणि या ब्राह्मणाची सुद्धा कामना अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून मला हा माझा पती परत दे. हे मनुष्यशरीर जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून हे वीरा ! शरीराची हत्या म्हणजे सर्व पुरुषार्थांची हत्या, असे म्हटले जाते. शिवाय हा ब्राह्मण विद्वान आहे. तपश्चर्या, शील इत्यादी गुणांनी संपन्न आहे. जो सर्व पदार्थांमध्ये असूनही त्यांच्या वेगवेगळ्या गुणांमुळे लपून राहिलेला आहे, त्या पुरुषोत्तम परब्रह्माची, सर्व प्राण्यांच्या आत्म्याच्या रूपामध्ये हा आराधना करू इच्छितो. हे धर्म जाणणार्या राजा ! जसा पित्याच्या हातून पुत्राचा मृत्यू होणे योग्य नाही, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या श्रेष्ठ राजर्षीच्या हातून श्रेष्ठ ब्रह्मर्षीचा वध होणे कसे योग्य आहे ? तू सन्माननीय आहेस. असे असता तू परोपकारी, निरपराध, वैदिक आणि ब्रह्मवादी ब्राह्मणाचा, गाईचा वध करावा तसा वध करणे कसे योग्य आहे ? असे असताही जर तू याला खाणार असशील, तर अगोदर मला खा; कारण याच्याशिवाय मी मेल्यासारखीच असून एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही." असे काकुळतीने बोलून ती अनाथ असल्यासारखी रडू लागली. परंतु शापाने मूढ झाल्यामुळे सौदासाने, वाघाने एखाद्या पशूला खावे, त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. ब्राह्मणपत्नीने गर्भाधानास उद्युक्त झालेल्या पतीला राक्षसाने खाल्लेले पाहून तिला अतिशय शोक झाला. तिने संतापून राजाला शाप दिला. "अरे पाप्या ! मी कामपीडित असताना तू माझ्या पतीला खाल्लेस. म्हणून मूर्खा ! तू जेव्हा स्त्रीबरोबर संग करण्यास जाशील, तेव्हा तुझाही मृत्यू होईल, ही गोष्ट मी तुझ्या निदर्शनाला आणते." अशा प्रकारे मित्रसहाला शाप देऊन पतिलोकात जाऊ इच्छिणारी प्राह्मणपत्नी, आपल्या पतीच्या अस्थींनी धगधगणार्या चितेत उडी घेऊन स्वतः सती गेली. (२०-३६) बारा वर्षानंतर राजा शापातून मुक्त झाला. जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला, तेव्हा तिने त्यांना अडविले. कारण तिला त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप ठाऊक होता. यानंतर त्याने स्त्रीसुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. नंतर त्याच्या सांगण्यावरून वसिष्ठांनी मदयन्तीच्या ठिकाणी गर्भाधान केले. मदयंतीने सात वर्षेपर्यंत गर्भ धारण केला. परंतु तो जन्माला आला नाही. तेव्हा वसिष्ठांनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला, त्यामुळे तो जन्माला आला. तोच अश्माच्या (दगडाच्या) आघाताने उत्पन्न झाल्यामुळे त्याचे ’अश्मक’ नाव ठेवले. अश्मकापासून मूलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला निःक्षत्रिय करीत होते, तेव्हा स्त्रियांनी त्याला लपवून ठेवले होते. म्हणून त्याचे एक नाव ’नारिकवच’ असे पडले. त्याला मूलक यासाठी म्हणतात की, पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवर्तक बनला. मूलकाचा पुत्र दशरथ. दशरथाचा ऐडविड आणि ऐडविडाचा विश्वसह. विश्वसहाचा पुत्रच चक्रवर्ती खट्वांग झाला. युद्धामध्ये त्याला कोणी जिंकू शकत नव्हता. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्याने दैत्यांचा वध केला होता. देवतांकडून त्याला जेव्हा समजले की, आपले आयुष्य फक्त दोन घटकाच उरले आहे, तेव्हा तो आपल्या राजधानीकडे परत आला आणि आपले मन त्याने भगवंतांचे ठिकाणी स्थिर केले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की, "माझ्या कुलाची इष्ट देवता ब्राह्मण आहे. त्यांच्यापेक्षा अधिक माझे माझ्या प्राण्यांवरही प्रेम नाही. पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य आणि पृथ्वीसुद्धा मला त्यांच्याइतकी प्रिय वाटत नाही. लहानपणीसुद्धा माझे मन अधर्माकडे कधी गेले नाही. पवित्रकीर्ति भगवंतांच्या व्यतिरिक्त मी आणखी कोणतीही वस्तू कुठे पाहिली नाही. तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या देवतांनी मला कोणताही वर मागण्यास सांगितले. परंतु मी त्या भोगांची अजिबात लालसा धरली नाही; कारण सर्व प्राण्यांचे जीवनदाते श्रीहरी यांच्या भक्तीमध्येच मी मग्न होऊन राहिलो होतो. ज्या देवतांची इंद्रिये आणि मने विषयांमध्ये भटकत असतात, त्या देवता सत्त्वगुणप्रधान असूनसुद्धा आपल्या हृदयात विराजमान, सदैव प्रियतमाच्या रूपाने राहणार्या आपल्या आत्मस्वरूप भगवंतांना ओळखत नाहीत. तर मग जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत, ते कसे जाणू शकतील ? ईश्वरेच्या मायेचा खेळ असणार्या, गंधर्व-नगरांसारख्या या विषयांना मी सोडून देत आहे. कारण अज्ञानानेच हे चित्तात जाऊन बसले होते. आता जग उत्पन्न करणार्या भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन मी त्यांनाच शरण जात आहे. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. म्हणूनच त्याने असा निश्चय केला. आता त्याने अनात्म वस्तूंमध्ये जो अज्ञानमूलक आत्मभाव होता, त्याचा त्याग केला आणि आपल्या खर्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला. ते स्वरूप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म, शून्यासमानच आहे. परंतु ते शून्य नाही, परम सत्य आहे. भक्तजन त्याच वस्तूचे ’भगवान वासुदेव’ या नावाने वर्णन करतात. (३७-४९) अध्याय नववा समाप्त |