श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय ८ वा

सगर - चरित्र

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - रोहिताचा पुत्र हरित होता. हरिताचा पुत्र चंप झाला. त्यानेच चंपापुरी वसविली होती. चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय झाला. विजयाचा भरुक, भरुकाचा वृक आणि वृकाचा पुत्र बाहुक झाला. शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतले, तेव्हा तो आपल्या पत्‍नीसह वनात निघून गेला. वनात गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा बाहुकाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याची पत्‍नीसुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाThee उद्युक्त झाली. परंतु ती गर्भवती आहे, हे महर्षी और्व यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबविले. जेव्हा तिच्या सवतींना हे माहीत झाले, तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिले. पण त्या विषाला घेऊनच एका बालकाचा जन्म झाला. विषासह (गर) जन्म झाल्याकारणाने ’सगर’ नाव पडले. हा अतिशय कीर्तिमान होता. (१-४)

सगर चक्रवर्ती होता. त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता. सगराने आपले गुरुदेव और्व यांची आज्ञा मानून तालजंघ, यवन, शक. हैहय आणि बर्बर जातीच्या लोकांचा वध केला नाही, परंतु त्यांना विद्रूप केले. त्यांपैकी काहींच्या डोक्यांचे मुंडन केले, काहींना दाढीमिशा ठेवण्यास सांगितले, काहींना केस मोकळे सोडावयास सांगितले, तर काहींचे अर्धे मुंडन केले. सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली, नेसण्याची नाही; आणि काहींना फक्त लंगोटी नेसण्यासच सांगितले, वस्त्र पांघरण्यास नव्हे. यानंतर राजा सगराने और्व ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञाच्या द्वारा संपूर्ण वेद व देवतामय, आत्मस्वरूप, सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना केली. त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला होता, तो इंद्राने चोरून नेला. त्यावेळी सुमतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्विष्ठ मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यासाठी पृथ्वी धुंडाळली. पण जेव्हा घोडा सापडला नाही, तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पृथ्वी खोदली. खोदता-खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल-मुनींजवळ आपला घोडा दिसला. घोड्याला पाहून ते साठ हजार राजकुमार शस्त्रे हातात घेऊन "हाच आमचा घोडा चोरणारा चोर आहे, आणि वर डोळे मिटून बसला आहे. मारा, मारा ह्या नीचाला," असे म्हणत त्यांच्याकडे धावले. त्याचवेळी कपिल मुनींनी आपल्या पापण्या उघडल्या. इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतली होती. म्हणूनच त्यांनी त्या महापुरुषाचा तिरस्कार केला. यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन, तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्व जळून खाक झाले. सगराचे पुत्र कपिलमुनींच्या क्रोधामुळे जळून गेले, हे म्हणने योग्य नाही. कारण ते तर शुद्ध सत्त्वगुणाचे आश्रय आहेत. त्यांचे शरीर जगाला पवित्र करीत असते. क्रोधरूपी तमोगुण त्यांच्यामध्ये असणे कसे शक्य आहे बरे ? पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते काय ? हा संसार-सागर एक मृत्यूकडे नेणारा मार्गच आहे. याला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे. परंतु कपिल मुनींनी या जगात सांख्यशास्त्ररूपी एक अशी भक्कम नाव बनविली आहे की, मुक्तीची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती हिच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते. ते केवळ परम ज्ञानीच नव्हेत, तर स्वतः परमात्मा आहेत. हा शत्रू हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांचे ठिकाणी कशी असेल बरे ? (५-१४)

सगराची दुसरी पत्‍नी केशिनी. हिच्यापासून त्याला असंजस नावाचा मुलगा झाला होता. असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते. तो आपले आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्याच सेवेत मग्न राहात असे. असमंसस मागच्या जन्मी योगी होता. आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झाला होता. परंतु आताही त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते. म्हणून बांधवांना प्रिय वाटणारी नाही असे काम तो करी. तो कधी कधी निंद्य कर्मे करी आणि स्वतः वेडा आहे असे दाखवी. इतकेच काय, खेळताना मुलांना शरयू नदीत टाकून देई. अशा प्रकारे त्याने लोकांना उद्विग्न केले होते. शेवटी त्याचे असे उपद्‌व्याप पाहून पित्याने मुलाबद्दलचा स्नेह टाकून त्याचा त्याग केला. त्यानंतर असमंजसाने योगबलाने त्या सर्व बालकांना जिवंत दाखवून तो तेथून निघून गेला. आपली मुले परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली, तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि राजालासुद्धा पश्चात्ताप झाला. यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला. त्याने, आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्राच्या किनार्‍या-किनार्‍याने जाऊन, त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिले. भगवंतांचे अवतार कपिल-मुनी तेथेच बसले होते. थोर अंशमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून एकाग्र मनाने त्यांची स्तुती केली. (१५-२१)

अंशुमान म्हणाला - भगवन ! अजन्मा ब्रह्मदेव स्वतःहून श्रेष्ठ असणार्‍या आपल्याला प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत. इतकेच काय, पण समाधीने किंवा तर्कानेही आजपर्यंत आपल्याला ते समजू शकले नाहीत. आम्ही तर त्यांच्या मन, शरीर आणि बुद्धीने निर्माण होणार्‍या सृष्टीत उत्पन्न झालेले अज्ञानी जीव आहोत. तर मग आम्ही आपल्याला कसे बरे समजू शकू ? जगातील शरीर धारण करणारे जीव सत्त्वगुण, रजोगुण किंवा तमोगुणप्रधान आहेत. ते जागेपणी आणि स्वप्नावस्थेमध्ये फक्त गुणमय पदार्थ, तर सुषुप्ती अवस्थेमध्ये फक्त अज्ञानच पाहतात. कारण, ते आपल्या मायेने मोहित आहेत. त्यांची दृष्टी बहिर्मुख असल्यामुळे बाहेरच्या वस्तू ते पाहतात, परंतु स्वतःच्या हृदयात असलेल्या आपल्याला पाहात नाहीत. आपण ज्ञानघन आहात. सनंदनादी मुनी, आत्मस्वरूपाच्या अनुभवाने मायेच्या गुणांमुळे उत्पन्न होणारा भेद आणि त्याचे कारण अज्ञान, यांना दूर सारून आपलेच चिंतन करीत असतात. मायेच्या गुणांनी भुलून गेलेला मी मूर्ख आपले चिंतन कसे करणार ? माया, तिचे गुण आणि गुणांमुळे होणारी कर्मे तसेच कर्मांच्या संस्कारांनी बनलेले लिंग शरीर हे आपल्याला नाहीच. आपल्याला नाव नाही की रूप नाही. आपल्यामध्ये कार्य नाही, की कारण नाही. आपण सनातन आत्मा आहात. ज्ञानाचा उपदेश करण्यासाठीच आपण हे शरीर धारण केले आहे. आम्ही आपणांस नमस्कार करतो. प्रभो ! हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे. याला सत्य समजून लोभ, ईर्ष्या आणि मोहामुळे लोकांचे चित्त, शरीर तसेच घर इत्यादीमध्ये भटकत राहते. सर्व प्राण्यांचे आत्मा असणार्‍या हे प्रभो ! माझ्या मोहाचा घट्ट फास आज आपल्या दर्शनाने तुटला आहे. (२२-२७)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! कपिल देवांच्या प्रभावाने जेव्हा अंशुमान याने असे वर्णन केले, तेव्हा त्यांनी मनोमन अंशुमानावर अतिशय कृपा केली आणि म्हटले, (२८)

श्रीभगवान म्हणाले - "पुत्रा ! हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञपशू आहे. याला तू घेऊन जा. तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार फक्त गंगाजलानेच होईल. त्याला दुसरा कोणताही उपाय नाही." अंशुमानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो घोड्याला घेऊन आला. सगराने त्या यज्ञपशूच्या द्वारा यज्ञाची समाप्ती केली. (२९-३०)

तेव्हा सगराने अंशुमानावर राज्याचा कारभार सोपविला आणि तो स्वतः विषयांविषयी निःस्पृह आणि बंधनयुक्त झाला. महर्षी और्व यांनी दाखविलेल्या मार्गाने त्याने परमपदाची प्राप्ती करून घेतली. (३१)

अध्याय आठवा समाप्त

GO TOP