|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १ ला
वैवस्तव मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले - भगवन् ! सर्व मन्वंतरे आणि त्यांत अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण केलेले वर्णन मी ऐकले. मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंतांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादि त्याच्या राजा झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केलेत. ब्रह्मन् !आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्रे वेगवेगळी वर्णन करा. महाभाग, हे ऐकण्याची आम्हांला नेहमीच उत्सुकता असते. वैवस्वत मनूच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्याच्या आणि पुढे होणार्या सर्व पवित्रकीर्ति पुरुषांच्या पराक्रमाचे वर्णन करा. (१-५) सूत म्हणतात - वेद जाणणार्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा धर्माचे परम मर्मज्ञ असणारे भगवान श्रीशुकदेव म्हणाले. (६) श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता ! मनुवंशाचे वर्णन तू थोडक्यात ऐक. शेकडो वर्षांमध्येसुद्धा त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही. जे परमपुरुष परमात्मा लहान-मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते. त्यावेळी हे विश्व किंवा आणखी काहीही नव्हते. महाराज ! त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमलकळी प्रगट झाली. त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला. ब्रह्मदेवांच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप. त्यांना दक्षकन्या अदितीपासून विवस्वान (सूर्य) हा पुत्र झाला. विवस्वानाच्या संज्ञा-नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनूचा जन्म झाला. परीक्षिता ! संयमी राजा शाद्धदेवाला श्रद्धेपासून दहा पुत्र झाले. इक्ष्वाकू, नृग, शर्याति, दिष्ट, धृष्ट, करूष, नरिष्यंत, पृषध्र, नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती. (७-१२) प्रथम वैवस्वत मनूला पुत्र नव्हता. म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वसिष्ठांनी संतानप्राप्तीसाठी त्याच्याकडून मित्रावरुण देवतेचा यज्ञ करविला होता. फक्त दूध पिऊन राहणार्या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्धेने, होत्याकडे जाऊन "मला कन्या व्हावी" अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली. तेव्हा अध्वर्यूच्या प्रेरणेने ’होता’ बनलेल्या ब्राह्मणाने, श्रद्धेने जे सांगितले होते, त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषट्काराचा उच्चार करीत कन्या व्हावी, यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. ’होत्याने’ अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली. तिला पाहून मनूला वाईट वाटले आणि तो गुरू वसिष्ठांना म्हणाला, "भगवन ! आपण मंत्रवेत्ते आहात. आपले कर्म असे विपरीत फल देणारे कसे झाले. अहो, हे फार वाईट झाले. वैदिक मंत्रांचे असे विपरीत फळ असता कामा नये. आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे. आपण जितेंद्रिय सुद्धा आहात. त्याचबरोबर तपश्चर्येने निष्पाप झालेले आहात. देवांनी असत्य बोलावे, त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला ?" (१३-१८) आमचे वृद्ध प्रपितामह महर्षी वसिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले की, होत्याने विपरीत संकल्प केला. म्हणून ते वैवस्वत मनूला म्हणाले, "राजन् ! तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पुरा झाला नाही. तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईन." (१९-२०) परीक्षिता ! परम यशस्वी महर्षी वसिष्ठांनी असा निश्चय करून त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनविण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली. सर्वशक्तिमान भगवान् श्रीहरींनी संतुष्ठ होऊन त्यांना मागितलेला वर दिला. त्यामुळे ती कन्याच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली. (२१-२२) महाराज ! सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधुदेशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांसह वनामध्ये गेला. वीर सुद्युम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच एक अत्यंत अद्भुत बाण घेऊन हरिणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे खूप लांब गेला. शेवटी सुद्युम्न मेरुपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात गेला. त्या वनात भगवान शंकर पार्वतीसह विहार करीत असतात. हे राजा ! त्यात प्रवेश करताच वीरवर सुद्युम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे, असे दिसले. त्याचबरोबर त्याचा सर्व सेवकवर्ग सुद्धा स्वतःला स्त्रीरूपात पाहून उदासपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. (२३-२७) परीक्षिताने विचारले - भगवन् ! त्या जागी असा विचित्र प्रकार कसा झाला ? ती जागा अशी कोणी केली ? आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे. कारण आम्हांला अतिशय कुतुहल आहे. (२८) श्रीशुक म्हणाले - एके दिवशी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधकार नाहीसा करीत त्या वनामध्ये गेले. त्यावेळी अंबिकादेवीचे वस्त्र थोडेसे घसरलेले होते. ऋषींना अचानक आल्याचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली. ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरून उठून तिने वस्त्र सावरले. (२९-३०) ऋषीसुद्धा गौरी-शंकर यावेळी विहार करीत आहेत, असे पाहून तिथून मागे फिरून नरनारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले. त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की, "माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील, तो स्त्री होईल." तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाहीत. आता सुद्युम्न स्त्री झाला होता. म्हणून तो स्त्रिया झालेल्या आपल्या सेवकांसह एका वनातून दुसर्या वनात, याप्रमाणे फिरू लागला. (३१-३३) त्याचवेळी भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी, अशी इच्छा केली. चंद्रकुमार बुध आपला पती व्हावा, असे त्या स्त्रीलासुद्धा वाटले. त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरूरवा नावाचा पुत्र झाला. अशा प्रकारे अनुपुत्र राजा सुद्युम्न स्त्री झाला. आम्ही असे ऐकले आहे की, त्याने त्या अवस्थेत आपल्या कुलपुरोहित वसिष्ठांचे स्मरण केले. (३४-३६) सुद्युम्नाची ही दशा पाहून दयाळू वसिष्ठांना खूप वाईट वाटले. त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनविण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकर वसिष्ठांवर प्रसन्न झाले. परीक्षिता ! त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करीत व आपली वाणीही सत्य राखीतच म्हटले, (३७-३८) "वसिष्ठा ! तुमचा हा यजमान एक महिना पुरुष आणि एक महिना स्त्री राहील. या व्यवस्थेनुसार सुद्युम्नाने खुशाल पृथ्वीचे पालन करावे." वसिष्ठांच्या अनुग्रहाने या व्यवस्थेनुसार, इच्छित पुरुषत्व मिळवून सुद्युम्न पृथ्वीचे पालन करू लागला. परंतु प्रजा त्याचा मान राखीत नसे. उत्कल, गय आणि विमल असे त्याला तीन पुत्र झाले. परीक्षिता ! ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले. पुष्कळ दिवसांनंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुद्युम्न याने आपला पुत्र पुरूरवा याला राज्य दिले आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. (३९-४२) अध्याय पहिला समाप्त |