श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २४ वा

मस्त्यावताराची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - मुनिवर्य, अद्‌भुत कर्म करणार्‍या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती, त्यांच्या त्या आदिअवताराची कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी, लोकांना न आवडणारे, असह्य असे हे माशाचे रूप का धारण केले ? भगवन, महात्म्यांना कीर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हांला सांगावी. (१-३)

सूत म्हणतात - जेव्हा परीक्षिताने भगवान श्रीशुकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी, भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले. (४)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! गाई, ब्राह्मण, देव, साधू, वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. ते सर्वशक्तिमान प्रभू वायूप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धिगत गुणांनी लहान-मोठे होत नाहीत. कारण ते निर्गुण आहेत. परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्राह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रलयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहणार्‍या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला. (५-९)

परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत्परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी वैवस्वत मनू बनविले. तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच नदीत सोडले. अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, "राजन, आपण दीनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतु आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहीत आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडीत आहात ? स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रूपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती, तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. त्या मासळीचे दीनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्यावेळी मासळी राजाला म्हणाली; आता मोठ्या कष्टानेसुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ. तेथे मी आरामात राहू शकेन. राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेर्‍यात ठेवले. परंतु तेथे सोडल्यानंतर ती मासळी दोन घटकात तीन हात मोठी झाली. "राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे. म्हणून मला राहण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे." परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले. परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले. आणि म्हणाली - "राजन, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून आपण सुरक्षितपणे मला एकादा विपुल पाण्याच्या खोल डोहात ठेवावे." त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणार्‍या अनेक जलाशयांत सोडले. परंतु जलाशय जेवढा मोठा असे, तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणाले. समुद्रात सोडीत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला, "हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहतात, त्या मला खाऊन टाकतील. म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये. (१०-२४)

मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळून गेला. तो म्हणाला, "मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात ? आपण एकाच दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले. एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही. आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी आहात. जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. हे पुरुषोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात, तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की, आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे ? हे कमलनयन प्रभो, जसे देहादी अनात्म पदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणार्‍या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो, त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होऊ शकत नाही. कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी, परम प्रियतम आणि आत्मा आहात. आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हांला दर्शन दिले आहे, ते अतिशय अद्‌भुत आहे. (२५-३०)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणार्‍या जगत्पती मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली, तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटले - (३१)

श्रीभगवान म्हणाले - सत्यव्रता, आजपासून सातव्या दिवशी भू, भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालच्या अथांग पाण्यात बुडू लागतील, तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षींसह त्या नौकेवर चढावेस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहानसहान अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागले, तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध. सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन. त्यावेळी जेव्हा तू प्रश्न विचारशील, तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेने, ज्याचे नाव ’परब्रह्म’ आहे, तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल. राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरूप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. एके दिवशी राजाने पाहिले की, प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहेत. पाहता पाहता सर्व पृथ्वी बुडू लागली. तेव्हा राजाला भगवंतांच्या आज्ञेच स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली, तेव्हा तो धान्य आणि इतर बीजे घेऊन सप्तर्षींसह तीत बसला. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, " राजा, तू भगवंतांचे ध्यान कर. तेच आम्हांला या संकटातून वाचवतील आणि आमचे कल्याण करतील" त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांच्ये ध्यान केले. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाने शरीर असलेला चार लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रगट झाला. भगवंतांच्या सांगण्यावरून ती नाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला. (३२-४५)

सत्यव्रत म्हणाला - जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादी अविद्येमुळे झाकले गेले आहे. याचमुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत. जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात, तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. म्हणून आम्हांला मुक्ती देणारे परम गुरू आपणच आहात. (४६)

हा जीव अज्ञानी आहे. आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्यांचे हे अज्ञान नष्ट होते, तेच माझे परम गुरू आपण, माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. जसे अग्नीमध्ये तापविलेल्याने सोन्याचांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते, त्याचप्रमाणे ज्यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खर्‍या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्वशक्तिमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परम गुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरू व्हा. सर्व देव, गुरू आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली, तरीसुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशाइतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. जसा एखादा आंधळा आंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवितो, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरू बनवितो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रियांचे प्रेरक आहात. आत्मतत्त्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरू केले आहे. अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो, ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररूपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता, त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खर्‍या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरू, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हेसुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टींचा त्यांना पत्ताच लागत नाही. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणार्‍या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा. (४७-५३)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशी प्रार्थना करणार्‍या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्त्वाचा उपदेश केला. भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ति आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला ’मत्स्यपुराण’ म्हणतात. ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले, तेव्हा भगवंतांनी हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापांतून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती, त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात घेऊन गेला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्त्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीलामत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो. (५४-६१)

स्कंध आठवा - अध्याय चोविसावा समाप्त
स्कंध आठवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP