श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २३ वा

बलीचे बंधनातून सुटून सुतललोकात जाणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा साधूंना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. हात जोडून गद्‍गद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला - (१)

बली म्हणाला - प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्‍न केला, तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते, तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही, ती माझ्यासारख्या नीच असुरावर केलीत. (२)

श्रीशुक म्हणतात - वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला. अशा प्रकारे भगवंतांनी बलीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले; अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. जेव्हा प्रह्लादांनी पाहिले की, माझा वंशज नातू बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली. (३-५)

प्रह्लाद म्हणाले - प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्षी आणि शंकरांनासुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसर्‍यांची गोष्ट कशाला ? अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात, तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. हे शरणागतवत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मतःच दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्ण दृष्टी कशी काय वळली ? आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळता खेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणार्‍यांच्या बाबतील पक्षपाती आणि विन्मुख असणार्‍यांच्या बाबतीत निर्दय बनता ! (६-८)

श्रीभगवान म्हणाले - बाळ प्रह्लादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जातिबांधवांना सुखी कर. तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्याकारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील. (९-१०)

श्रीशुक म्हणतात - राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्ध बुद्धी प्रह्लादांनी ’ठीक’ असे म्हणून हात जोडून, भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्य़ांना म्हटले. ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी तृटी राहिली असेल, ती आपण पूर्ण करावी. कारण कर्म करण्यात जी उणीव राहते, ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते. (११-१४)

शुक्राचार्य म्णाले, भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर, यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली आहे, त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील. कारण मंत्रांचे, अनुष्ठान पद्धतीचे, देश, काल, पात्र आणि वस्तूंविषयीचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात. तथापि अनंत, आपणच जर म्हणत असाल, तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन. कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परम कल्याण आहे. (१५-१७)

श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षींसह, बलीचा यज्ञ पूर्ण केला. परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणार्‍या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पितर, मनू, दक्ष, भृगू, अंगिरा, सनत्कुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी, तसेच सर्व प्राण्यांचा अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला. (१८-२१)

परीक्षिता ! वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष, या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने, लोकपालांसह वामनांना सर्वांच्या पुढे विमानात बसविले आणि त्यांना आपल्याबरोवर स्वर्गात नेले. इंद्राला एक तर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. ब्रह्मदेव, शंकर, सनत्कुमार, भृगू इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगण, भगवंतांच्या या परम अद्‌भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली. (२२-२७)

परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणार्‍यांची सर्व पापे नष्ट होतात. भगवंतांच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रद्रष्ट्या महर्षी वसिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की, जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल, असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. अद्‌भुत लीला करणार्‍या देवाधिदेव वामनांच्या अवतारचरित्राचे जो श्रवण करतो, त्याला परमगती प्राप्त होते. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे कीर्तन होते, ते कर्म सफल होते. (२८-३१)

स्कंध आठवा - अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP