श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २२ वा

बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचे त्याच्यावर प्रसन्न होणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने तो म्हणाला - (१)

बली म्हणाला - हे पवित्रकीर्ति देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवितो, म्हणजे आपली फसवणून होणार नाही. आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकार ठेवा. नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही. दारिद्र्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही. जितका मी माझ्या अपकीर्तीला भितो. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे. कारण तसा दंड माता, पिता, भाऊ आणि सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परम गुरू आहात. कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता, बल इत्यादींच्या मदाने आंधळे होतो, तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यांत अंजन घालता. आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात, तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणार्‍या पुष्कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे. अशा ज्यांच्या अनंत लीला आहेत, त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरुणपाशाने बांधले. याबद्दल मला लज्जा वाटत नाही की, कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. प्रभो, माझे आजोबा प्रह्लाद यांची कीर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्यकशिपू याने त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले. परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली. त्यांनी विचार केला की, हे शरीर घेऊन काय करावयाचे आहे ? हे तर एक ना एक दिवस आपली साथ सोडणारच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी ते स्वजन झाले आहेत, त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे ? पत्‍नीपासून सुद्धा कोणता लाभ ? ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे. मरणार तर आहोतच; मग घराचा मोह कशाला ? या सर्व वस्तूत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणेच होय. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी, संतश्रेष्ठ पह्लाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरणकमलांना शरण गेले. खरे तर, आपण अलौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात, हे ते जाणत होते. तसे पाहू गेले असता आपण माझेसुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राज्यलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले आहे, हे त्याला समजत नाही. (२-११)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रिय भक्त प्रह्लाद तेथे येऊन पोहोचले. बलीने पाहिले की, आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकर्ण आणि हात लांबसडक आहेत.ते सुंदर आणि उंच आहेत. तसेच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पीतांबर धारण केला आहे. बली यावेळी वरुणपाशामध्ये बांधलेला होता; म्हणून प्रह्लाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे, तशी पूजा करू शकला नाही, म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. लाजून त्याने मान खाली घातली. केवळ मस्तक लववून त्याने तांना नमस्कार केला. प्रह्लादांनी पाहिले की, भक्तवत्सल भगवान तिथेच उभे आहेत आणि सुनंद, नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत. प्रह्लादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलकित झाले, डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आनंदपूर्ण हृदयाने, मस्तक लाववून, ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. (१२-१५)

प्रह्लाद म्हणाले - प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले, हेच चांगले झाले. ही आपण याच्यावर फार मोठी कृपा केलीत, असेच मला वाटते. आत्म्याला मोहित करणार्‍या राज्यलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत. लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खर्‍या स्वरूपाला चांगल्या तर्‍हेने कोण जाणू शकेल ? सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला - श्रीनारायणदेवांना मी नमस्कार करतो. (१६-१७)

श्रीशुक म्हणतात - राजा प्रह्लाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवानांना काही सांगू इच्छित होते. हे राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्‍नी विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून, भयभीत होऊन, भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमिनीकडे पाहात ती भगवंतांना म्हणाली - (१८-१९)

विंध्यावली म्हणाली - प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केले. जे लोक निर्बुद्ध आहेत, तेच स्वतःला याचा स्वामी मानतात. आपणच याचे उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असूनही तुमच्यामुळेच स्वतःला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार ? (असत्यापासून वाचण्यासाठी तिसरे पाऊन ठेवण्याकरता तुमच्याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो, हे बलीच म्हणणे निर्लज्जपणाचे आहे.) (२०)

ब्रह्मदेव म्हणाले - समस्त प्राण्यांना जीवन देणारे, त्यांचे स्वामी आणि जगत्स्वरूप देवाधिदेवा, आता आपण याला सोडून द्यावे. आपण याचे सर्वस्व हरण केले आहे. म्हणून आता ह्याला बांधणे योग्य नाही. याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळविलेले स्वर्ग इत्यादी लोक, आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय, असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली. प्रभो, जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्घ्य देतो आणि फक्त दूर्वादलानेसुद्धा आपली खरीखरी पूजा करतो, त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त होते. असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने, धर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे. मग ह्याला दुःख का व्हावे ? (२१-२३)

श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो, त्याचे धन हिरावून घेतो, कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो, तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो. आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्यशरीर प्राप्त करतो, त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही, तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे, असे समजावे. सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणार्‍या मला जे शरण येतात, ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पन्न करणार्‍या कारणांमुळे मोहित होत नाहीत. हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशांमध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढविणारा आहे. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे, त्या मायेवर याने विजय मिळविला आहे. तू पाहातच आहेस की, एवढे दुःख भोगूनसुद्धा हा खचला नाही. याचे धन हिरावून घेतले, शत्रूंनी बांधले, बांधव सोडून निघून गेले, इतके याला कष्ट भोगावे लागले. एवढेच काय, गुरुदेवांनी निर्भर्त्सना करून शापसुद्धा दिला. शिवाय मी याला उपहासाने बोललो. पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही. म्हणून मोठमोठ्या देवतांनासुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही, ते स्थान मी त्याला दिले आहे. सावर्णी मन्वन्तरामध्ये हा माझा परम भक्त इंद्र होईल. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनविलेल्या सुतल लोकामध्ये राहील. तेथे राहणार्‍या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुखे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा, ग्लानी, शत्रूकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. महाराज इंद्रसेन, तुझे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह, स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात, त्या सुतल लोकात जा. मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकनार नाहीत. मग इतरांची काय कथा ! जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील, त्यांचा माझे चक्र नाश करील. तुझे, तुझ्या अनुयायांचे आणि तुझ्या भोगसामग्रीचे सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन. वीर बली, तू मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहशील. दानव आणि दैत्यांच्या संसर्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल, तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल. (२४-३६)

स्कंध आठवा - अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP