|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २१ वा
बलीचे बंधन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून, त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. वेद, उपवेद, नियम, यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराणसंहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला, ते महात्मे, याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणार्या सत्यलोकात पोहोचले होते ते, अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले. भगवंतांच्या नाभीकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली. परीक्षिता, ब्रह्मदेवांच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय. जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केला. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाला, दिव्य सुगंधयुक्त उटी, सुगंधित धूप, दीप, लाह्या, अक्षता, फळे, अंकुर, भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जयजयकार, नृत्य, वाद्ये, गाणी, शंखनाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. त्यावेळी ऋक्षराज जांबवनाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली. (१-८) दैत्यांनी पाहिले की, तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणार्या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली. त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले. "अरे हा सामान्य ब्राह्मण नाही. हा सर्वांत श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे. ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले, तेव्हा या शत्रूने ब्रह्मचार्याचा वेष धारण करून अगोदर विनंती आणि नंतर मात्र आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत. शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसेच ते ब्राह्मणभक्त असून दयाळू आहेत. म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे, हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे." असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली. परीक्षिता, बलीची इच्छा नसतानासुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल, पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी पाहिले की, दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत, तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले. नंद, सुनंद, जय, विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष, विष्वक्सेन, गरुड, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत आणि सात्वत हे दहा दहा हजार हत्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले. ते पार्षद आपल्या सैनिकांना मारत आहेत आणि तेही संतापलेले आहेत, असे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केले. त्याने विप्रचित्ती, राहू, नेमी या दैत्यांना संबोधून म्हटले, "माझे म्हणणे ऐका. लढाई करू नका. परत फिरा. आम्हांला ही वेळ अनुकूल नाही. दैत्यांनो, जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो, त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे. जो अगोचर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता, तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे. बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि साम इत्यादी उपाय, यांपैकी कशानेही माणूस कालावर विजय मिळवू शकत नाही. जेव्हा दैव अनुकूल होते, तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते. पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत. दैव अनुकूल झाले, तर आम्ही सुद्धा यांना जिंकू. म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा." (९-२४) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्यसेनापती रसातळाला निघून गेले. ते गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षिराज गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधले. त्या दिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते. जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले, तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकार उडाला. जरी वरूणाच्या पाशाने बली बांधला गेला होता, जरी त्याची संपत्ती गेली होती, तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळी भगवान म्हणाले, "हे असुरा, तू मला तीन पावले जमीन दिली होतीस. दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले, आता तिसरे पाऊन ठेवण्याची व्यवस्था कर. जिथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात, जिथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात, आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात, तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या अधिपत्याखाली होती. तुझ्यादेखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश व दिशा आणि दुसर्या पावलाने स्वर्लोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे. तू जी प्रतिज्ञा केली होतीस, ती पुरी न केल्याकारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल. तुझ्या गुरूची तर या बाबतील संमती आहेच. म्हणून आता तू नरकात प्रवेश कर. (२५-३२) जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशाप्रकारे त्याला फसवतो, त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात. स्वर्गाची गोष्ट तर दूरच; पण त्याला नरकात पडावे लागते. मी मोठा संपत्तीमान आहे, या गोष्टीचा तुला फार गर्व होता. तू मला ’देतो’ म्हणून सांगून फसवलेस. असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरकयातना भोग. (३३-३४) स्कंध आठवा - अध्याय एकविसावा समाप्त |