श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १८ वा

भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्युरहित पीतांबरधारी भगवान अदितीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीनच झळकत होती. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न, हातांमध्ये कडी, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कशपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रगट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला. (१-४)

ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंवांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. परीक्षिता, ज्या स्थितीला भगवंतांचा जन्म झाला होता, तिला "विजयाद्वादशी" असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळी शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुतार्‍यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनू, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्याचबरोबर त्यांनी अदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला. (५-१०)

जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनीसुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून, आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला. भगवान स्वतः अव्यक्त आणि चित्स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते, त्या शरीराने, कश्यप आणि अदितींच्या समोरच जसा नट आपला वेष बदलतो, त्याप्रमाणे, बटुवेषधारी ब्रह्मचार्‍याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे. (११-१२)

त्या वामन ब्रह्मचार्‍याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादि संस्कार करविले. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला, तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला,. देवगुरू बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. पृथ्वीने कृष्णाजिन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता अदितीने कौपीन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तर्षींनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली. अशा रीतीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला, तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती, जगज्जननी, साक्षात भगवती पार्वतीदेवींनी भिक्षा घातली. अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटुवेशधारी भगवंतांचा सन्मान केला, तेव्हा ते ब्रह्मर्षींनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. यानंतर भगवंतांनी, स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले. (१३-१९)

त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्वमेध यज्ञ करीत आहे, असे ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावला पावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. नर्मदा नदीच्या उत्तर तटावर ’भृगुकच्छ’ नावचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथेच भृगुवंशी ऋत्विज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले, तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला, असे वाटले. परीक्षिता, वामनांच्या तेजाने ऋत्विज, यजमान आणि सभासद असे सगळेच निस्तेज झाले. ते विचार करू लागले की, यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनत्कुमार तर येत नाहीत ना ? शिष्यांसह भृगू याप्रकारे अनेक कल्पना करीत होते, त्याचवेळी हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. त्यांच्या कमरेला मुंजाची मेखला, गळ्यात जानवे, मृगाजिन आणि मस्तकार जटा होत्या. अशाप्रमारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचार्‍याच्या वेषात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह, त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले. ते सर्वजण अग्नींसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले. भगवंतांच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहान लहान, अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते. त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले. नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पादप्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांनासुद्धा अत्यंत मनोहर वाटणार्‍या त्यांची पूजा केली. देवाधिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते, तेच अत्यंत मंगल, लोकांचे पाप-ताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले. (२०-२८)

बली म्हणाला - हे ब्राह्मणकुमार, आपले स्वागत असो. आपणांस मी नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ? आर्य, असे वाटते की, आज ब्रह्मर्षींची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे. आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला. हे ब्राह्मणकुमार, आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली. विधिपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्शाने पृथ्वीही पवित्र झाली. हे सर्वपूज्य ब्राह्मणकुमार, असे वाटते की, आपण काही मागण्यासाठी आला आहात. आपल्याला गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेले घर, पवित्र अन्न, पाणी किंवा ब्राह्मणकन्या, संपत्तींनी भरलेले गाव, घोडे, हत्ती, रथ, असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या. (२९-३२)

स्कंध आठवा - अध्याय अठरावा समाप्त

GO TOP