|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १७ वा
भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्णरूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रगट झाले. परीक्षिता, त्यांनी पीतांबर परिधान केला होता. त्यांना चार हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून अदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेमविह्वल होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. नंतर उठून, हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले, त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती, लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहात होती. अंतर मोठ्या प्रेमाने, गदगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करू लागली. (१-७) अदिती म्हणाली - आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तनाचे श्रवणसुद्धा संसार तरून नेणारे आहे. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो, त्याची सर्व संकटे आपण दूर करता. भगवन, आपण दीनांचे स्वामी आहात. आपण आमचे कल्याण करावे. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात. अनंत असूनसुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता. आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता. नित्य निरंतर वाढणार्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहता. भगवन, मी आपल्याला नमस्कार करते. हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता, तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्यांच्याचसारखे दिव्य शरीर, प्रत्येक इच्छित वस्तू, पुष्कळ धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ. योगाच्या सर्व सिद्धी, धर्म, अर्थ, कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते. असे असता शत्रूंवर विजय मिळविणे यासारख्या ज्या लहानसहान कामना आहेत, त्यासंबंधी काय सांगावे ? (८-१०) श्रीशुक म्हणतात - राजन, अदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली; तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले - (११) श्रीभगवान म्हणाले - हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती ह्सकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे. तुझी अशी इच्छा आहे की, आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे. तुझी अशीसुद्धा इच्छा आहे की, तुझे इंद्रादि पुत्र जेव्हा शत्रूला युद्धात मारतील, तेव्हा तू त्यांच्या रडणार्या पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पहावे. अदिती, तुला असेही वाटते की, तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत. त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. परंतु देवी, त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही, असे मल निश्चितपणे वाटत आहे. कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही. तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताचे अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे, म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच लागेल. कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधिपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस. म्हणून मी अंशरूपाने कश्यपाच्या तपश्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करीन. कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपात पहा आणि पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसर्या कोणाला सांगू नकोस. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील, तितके ते अधिक सफल होते. (१२-२०) श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत, ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृत्यकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्यदृष्टी कश्यपांनी समाधियोगाने जाणले की, भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायू जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठविलेले तेज अदितीमध्ये स्थापन केले. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत, तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागले. (२१-२४) ब्रह्मदेव म्हणाले - हे समस्त कीर्तीचे आश्रय असणार्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तींच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्रह्मण्यदेवा, त्रिगुणांच्या नियामका, आपल्या चरणांना माझा नमस्कार असो. पृष्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणार्या, वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठविणार्या प्रभो, आपण्च सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे. जीवांच्या अंतःकरणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो. प्रभो, आपणच संसाराचे आदि अंत आणि मध्य आहात. म्हणूनच वेद अनंतशक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात. जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेता. आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींनासुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवाधिदेवा, जसा पाण्यात बुडणार्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे. (२५-२८) स्कंध आठवा - अध्याय सतरावा समाप्त |