|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १६ वा
कश्यपांकडून अदितीला पयोव्रताचा उपदेश - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला, त्यावेळी देवमाता अदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसांनंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली, तेव्हा ते अदितीच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की, तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तेथे जाऊन आसनावर बसले, तेव्हा अदितीने विधिपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहर्यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले. "कल्याणी, या वेळी जगात ब्राह्मणांवर काही संकट तर आलेले नाही ना ? धर्म बुडाला नाही ना ? स्वच्छंद वागणार्या मृत्यूचे लोकांना भय नाही ना ? प्रिये, जे लोक योगसाधना करू शकत नाहीत, त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणारा आहे. त्या गृहस्थाश्रींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना ? किंवा तू कुटुंवाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील, म्हणून तर तू उदास नाहीस ना ? आलेल्या अथिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊनसुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात, ती घरे निश्चितच कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे आहेत. प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल, म्हणून तू वेळेवर हविष्याने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का ? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंतांचे मुख आहेत, गृहस्थाने जर हा दोन्हींचे पूजन केले, तर सर्व कामना पूर्ण करणार्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानिनी, तुम्हा बर्याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना ? (१-१०) अदिती म्हणाली - हे गृहस्थाश्रमी ब्रह्मन ! ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. हा गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तीस्थान आहे. हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात, तेव्हा माझ्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होणार नाही. हे मरीचिपुत्र ! सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने, तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता. तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणार्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे, अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढले आहे. त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की, माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील. (११-१७) श्रीशुक म्हणतात - अदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली, तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य ! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा ? कुणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही की बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणार्या भक्तांचे दुःख दूर करणार्या, जगद्गुरू भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ति कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही. (१८-२१) अदितीने विचारले, भगवन, जगदीश्वर भगवंतांची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की, ज्यामुळे ते सत्यसंकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील. हे ब्राह्मणश्रेष्ठ, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे. ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील, तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा. (२२-२३) कश्यप म्हणाले - संतान असावे असे मला जेव्हा वाटले, तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले, तेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्लपक्षात बारा दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन रहावे आणि परम भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. "हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो ! तू माझी पापे नष्ट कर." यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्ती, पूजास्थल, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरू यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. प्रथम पुढील नऊ मंत्रांनी आवाहन करावे. - हे प्रभो ! आपण सर्वशक्तिमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात; म्हणूनच आपणास "वासुदेव" म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण चोवीस गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याची प्रायणीय आणि उदयनीय ही दोन कर्मे ही मस्तके आहेत, प्रातःकाळ मध्याह्नकाळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत, चार वेद चार शिंगे आहेत, गायत्री इत्यादी सात छंद सात हात आहेत, असे तिन्ही वेदांनी सांगितलेले, फळ देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्वशक्तिसंपन्न, सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार असो. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नर-नारायण ऋषींच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात, आपणास माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पीतांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात, वर देणार्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीवमात्राला वरणीय आहात. म्हणून विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होवोत. - भगवान हृषीकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी समर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध, धूप इत्यादी अर्पण करून द्वादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी. ऐपत असेल तर दुधात शिजविलेल्या आणि तूप-गूळ घातलेल्या साळीच्या तांदळांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे. तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वतः खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंतांचे स्तवन करावे. प्रदक्षिणा घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसर्या दिवशी सकाळीच स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंतांचे पूजन करावे. (२४-४५) भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मणभोजन हेही केले पाहिजे. अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवसपर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मणभोजन घालावे. (४६-४७) फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून तीन वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंतांच्या आराधनेतच एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणार्या ब्राह्मणांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृतस्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. अत्यंत एकाग्र चित्ताने, त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गाई इत्यादी दान करून संतुष्ट करावे. हीसुद्धा भगवंतांचीच आराधना होय. प्रिये, आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. तसेच अंत्यजादी कोणी आल्यास त्याला किंवा दीन-दुबळे, आंधळे-पांगळे यांना अन्न-वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले, असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत्कथा यांच्यायोगे भगवंतांचे पूजन करावे. (४८-५७) ही भगवंनांची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव "पयोव्रत" असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जे सांगितले होते, तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून, शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर, कल्याणी, हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे; म्हणून याचे नाव ’सर्वयज्ञ’ आणि ’सर्वव्रत’ असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात, तेच खरे नियम होत. तेच उत्तम यम आहेत. तेच वास्तविक तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे अनुष्ठा कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. (५८-६२) स्कंध आठवा - अध्याय सोळावा समाप्त |