|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १५ वा
बळीराजाचा स्वर्गावर विजय - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] राजाने विचारले - श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत; तर ग त्यांनी दरिद्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली ? शिवाय ती मिळाल्यावरसुद्धा त्यांनी बलीला का बांधले । माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतुहल आहे. पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले, ते आम्ही जाणूम घेऊ इच्छितो. (१-२) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळविण्याची इच्छा करणार्या बलीला त्यांनी महाभिषेकविधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करविला. हविर्द्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिह्नाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रह्लाद यांनी त्याला न कोमेजणार्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामग्री मिळवून त्यांच्याचकरवी स्वस्तिवाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रह्लादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला. नंतर तो बली, भृगुंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून, धनुष्य, तलवार, बाणांचे भाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा, तसा शोभला. त्याच्याबरोबर त्याच्याचसारखे ऐश्वर्य, बल आणि सामर्थ्य असणारे दैत्यसेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली. (३-११) अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती. त्यांमध्ये पक्ष्यांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत. कोवळी पालवी आणि फळा-फुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असत. तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत. देवांना प्रिय अशा देवांगना तेथेच जलक्रीडा करीत असत. ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत. तेथील दारे सोन्याची असून तेथे स्पटिकमण्यांची गोपुरे आहेत. तीत मोठमोठे, वेगवेगळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्म्याने त्या नगरीची निर्मिती केली आहे. सभास्थाने, ओटे, आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे. दहा कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मढविलेले मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत. तेथील स्त्रिया नेहमी षोडषवर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते. त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वालांनी देदीप्यमान दिसतो, तशा दिसतात. (१२-१७) देवांगनांच्या केशांच्या अंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यांवरून वाहात असते. सोनेरी खिडक्यांमधून अगुरूचा सुगंधी सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो. त्याच मार्गावरून देवांगना ये-जा करतात. मोत्यांच्या झालरींनी सजविलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात. गच्च्यांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात. मोर, कबुतरे आणि भुंगे गायन करीत असतात. देवांगना गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते. मृदंग, शंख, नगारे, ढोल, वीणा, बासरी, टाळ, ऋष्टी, ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात. वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करीत असतात. त्यामुळे अमरावती जणू सौंदर्य देवतेलाही जिंकून घेते. अधर्माने वागणारे, दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाहीत. हे दोष ज्यांच्या अंगी नसतील तेच तेथे जातात. असुरांचा सेनापती असणार्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भिती निर्माण शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड आवाजाचा शंख वाजविला. (१८-२३) बलीने युद्धाची मोठी तयारी केली आहे, हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरू बृहस्पती यांचेकडे गेला व त्यांना म्हणाला. भगवन, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करून शकणार नाही, असे मला वाटते. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे, ते कळत नाही. मला वाटते, यावेळी बलीला कोणीच, कोणत्याही प्रकार रोखू शकणार नाही. प्रलयकाळाच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे. तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील. जिभांनी दाही दिशा चाटील आणि डोळ्यांतील ज्वालांनी दिशा भस्म करून टाकील, असे वाटते. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय ? त्याचे शरीर, मन आणि इंद्रिये यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कोठून आले आहे की, ज्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे, ते आपण मला सांगा. (२४-२७) देवगुरू म्हणाले - इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे. ज्याप्रमाणे कालासमोर कुणीही उभा राहू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वशक्तिमान भगवंतांखेरीज तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही. म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत, तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट पहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करील, तेव्हा परिवारासह नष्ट होईल. देवांचे हित जाणणार्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला, तेव्हा ते स्वेच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. देव लपून राहिल्यानंतर विरोचनपुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि तिन्ही लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला, तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी शंभर अश्वमेध यज्ञ करविले. त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकांत प्रसिद्ध कीर्ति दाही दिशांना पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्राह्मणदेवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वतःला कृतकृत्य मानू लागला. (२८-३६) स्कंध आठवा - अध्याय पंधरावा समाप्त |