|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १४ वा
मनू इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] राजाने म्हटले - भगवन, हे मनू इत्यादी आपापल्या मन्वन्तरांमध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात, ते मला सांगा. (१) श्रीशुक म्हणाले - परीक्षिता ! मनू, मनुपुत्र, सप्तर्षी, इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत. राजन, भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले, त्यांच्याच प्रेरणेने मनू इत्याची विश्वाचे व्यवहार चालवतात. चारी युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो, तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात. त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते. राजन, भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मन्वन्तरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात. संपूर्ण मन्वन्तरांमध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात. पंचमहायज्ञांत ज्यांचा संबंध आहे, त्यांच्याबरोबर देव त्या त्या मन्वंतरांमध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात. इंद्र, भगवनांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो. भगवंत युगा-युगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा, ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांचे रूपाने योगाचा उपदेश करतात. ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात, राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात. नाम-रूपाच्या मायेने प्राण्य़ांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंतांचा महिमा गातात; परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत. (२-१०) मी तुला हा महाकल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला. इतिहास जाणणार्या विद्वानांनी प्रत्येक अवांतर कल्पामध्ये चौदा मन्वंतरे सांगितली आहेत. (११) स्कंध आठवा - अध्याय चौदावा समाप्त |