श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १३ वा

आगामी सात मन्वंतरांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वन्तराचा सातवा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नभग, धृष्ट, शर्याती, नरिष्यंत नाभाग, दिष्ट, करूष, पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत. राजा, या मन्वन्तरात आदित्य, वसू, रुद्र, विश्वेदेव, मरुद्‌गण, अश्विनीकुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वन्तरामध्ये सुद्धा कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने, भगवान विष्णूंनी अवतार घेतला. (१-६)

अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वन्तरांचे वर्णन ऐकविले. आता भगवंतांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणार्‍या सात मन्वन्तरांचे वर्णन करतो. (७)

परीक्षिता मी तुला यापूर्वीच (सहाव्या स्कंधामध्ये) सांगितले होते की, संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्‍न्या होत्या. काही लोक म्हणतात की, त्यांची वडवा नावाची तिसरी पत्‍नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून, यम, यमी आणि श्राद्धदेव अशी तीन संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनैश्चर आणि तपती नावाची कन्या, अशी तीन संताने झाली. तपती संवरणाची पत्‍नी झाली. वडवेचे पुत्र अश्विनीकुमार झाले. आठव्या मन्वंन्तरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल. (८-१२)

तीन पावले भूमी मागणार्‍या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते, त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परम सिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यश्रृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वन्तरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहात आहेत. देवगुह्याची पत्‍नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून बलीला देतील. (१३-१७)

हे राजा, वरुणाचा पुत्र दक्षसावर्णी नववा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार, मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्‌भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वन्तरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्‍नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्‌भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल. (१८-२०)

उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी दहावा मनू होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्‌गुण असतील. भूरिषेण इत्यादी त्याचे पुत्र असतील आणि हविष्मान, सुकृती, सत्य, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होईल. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल. विश्वसृजाची पत्‍नी विषूचीपासून भगवान विष्वकसेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील. (२१-२३)

अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी अकरावे मनू होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. आर्यकाची पत्‍नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील. (२४-२६)

परीक्षिता, रुद्रसावर्णी बारावा मनू होईल. देववान, उपदेव देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्या मन्वन्तरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, अग्नीध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. सत्यसहीची पत्‍नी सूनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान या मन्वन्तराचे पालन करतील. (२७-२९)

परम जितेंद्रिय देवसावर्णी तेरावा मनू होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगण होतील. तसेच इंद्राचे नाव दिवस्पती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादी सप्तर्षी होईल. देवहोत्राची पत्‍नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवस्पतीला इंद्रपद देतील. (३०-३२)

इंद्रसावर्णी चौदावा मनू होईल. उरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी पवित्र, चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. त्यावेळी सत्रायणाची पत्‍नी वितानापासून बृहद्‌भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील. (३३-३५)

परीक्षिता, ही चौदा मन्वन्तरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात. यांच्याच द्वारे एक सहस्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते. (३६)

स्कंध आठवा - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP