श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १२ वा

मोहिनीरुपाने महादेवांना मोहिनी -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून शंकर पार्वतीसह नंदीवर बसून, समस्त भूतगणांना बरोबर घेऊन, जेथे भगवान मधुसूदन होते, तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी-शंकरांचे स्वागत केले. तेसुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले. (१-३)

महादेव म्हणाले - देवाधिदेवा, आपण विश्वव्यापी, जगदीशरव तसेच जगत्स्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थांचे मूळ कारण, ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी अंत आणि मध्य ज्याच्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदी मध्य आणि अंत नाहीत, ज्याच्यामध्ये द्रष्टा-दृश्य, भोक्ता-भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य, चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात. कल्याण इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आसक्ती सोडून तसेच कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. आपण अमृतस्वरूप, सर्व प्राकृत गुणांपासून रहित, शोकाच्या सावलीपासूनसुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ आनंदस्वरूप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणाते आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जीवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. स्वामी, जसे अलंकाररूपाने असणारे सोने आणि मूळ सोने यांमध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत, जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खर्‍या स्वरूपाला लोकांनी न जाणल्याकारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताता गुणांमुळे भेद आहे, असे वाटते. प्रभो, काहीजण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर मानतात, तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, प्रह्वी, सत्या, ईशाना आणि अनुग्रहा - या नऊ शक्तींनी युक्त परमपुरुष मानतात, तर दुसरे काहीजण स्वतंत्र, अविनाशी, महापुरुष मानतात. प्रभो, मी, ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी - जे सत्त्वगुणी सृष्टीतील आहेत, तेसुद्धा आपण बनविलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत, तर ज्यांचे चित्त मायेने मोहित आहे, असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार ? प्रभो ! आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात. म्हणून वायूप्रमाणे आकाशात अदृश्य राहूनसुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म तसेच संसाराचे बंध-मोक्ष हे सर्व जाणता. आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेला स्त्रीरूप अवतार पाहू इच्छितो. ज्याच्याद्वारे दैत्यांना मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले, ते रूप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हांला ते पाहण्याची उत्कंठा आहे. (४-१३)

श्रीशुक म्हणतात - जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली, तेव्हा ते गूढपणे हसून शंकरांना म्हणाले. (१)

श्रीभगवान म्हणाले - ज्यावेळी अमृतकलश दैत्यांच्या हाती गेला होता, तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी मी ते स्त्रीरूप धारण केले होते. हे महादेवा, आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन. परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावना उत्तेजित करणारे आहे. (१५-१६)

श्रीशुक म्हणतात - असे बोलता बोलताच भगवान तेथेच अंतर्धान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहोकडे पाहात तेथेच बसून राहिले. इतक्यात त्यांना एक उपवन दिसले, त्यामध्ये रंगीबेरंगी फुले आणि लालसर पालवी असलेले वृक्ष होते. त्या उपवनात एक सुंदर स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती. तिने रेशमी पैठणी परिधान केलेली असून तिच्यावर कमरपट्टा शोभत होता. चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्यामुळे तिचे स्तन आणि त्यावरील हार हालत होते. त्यावेळी वाटत होते की, जणू त्यांच्या भाराने मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणिक सावरीत ती आपली पालवीसारखी तांबूस सुकुमार पावले टाकीत आहे. उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे, तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे. त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्ण नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत. कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालांवर झगमगत होते आणि काळे भर केस त्यांच्यावर भुरभुरत होते. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच शोभत होता. जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत, तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरीत असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटीत असे. अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे. चेंडूने खेळता खेळता तिने शंकरांकडे बघितले. अशा तिला पाहताच शिव स्वतःला विसरले. ते मोहिनीकडे निरखून पाहता पाहता तिच्या कटाक्षांनी इतके बेभान झाले की, त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही. मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणांचे तरी भान कोठून असणार ? एकदा मोहिनीच्या हातातून चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला. तीसुद्धा त्याच्या पाठीमागे धावली. मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयनमनोहर होते. जेथे दृष्टी पडेल, तेथे मन गुंतत असे. मोहिनीसुद्धा आपल्यावर आसक्त आहे, असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले. तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला. तिच्या हावभावांनी ते कामातुर झाले आणि पार्वतीसमोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्यापाठोपाठ गेले (१७-२५)

शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली. ती एका झाडाआडून दुसर्‍या झाडाआड जाऊन लपत होती आणि हसत होती. परंतु एके ठिकाणी थांबत नसे. भगवान शंकरांचे मन त्यांच्या अधीन राहिले नाही. ते कामवश झाले. म्हणून हत्ती हत्तिणीच्या पाठीमागे धावत जातो, त्याप्रमाणे तिच्या मागे मागे ते धावू लागले. वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला व तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले. हत्ती हत्तिणीला आलिंगन देतो, तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले. इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्‍न केला, तेव्हा तिचे केस विस्कटले. हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वतःला सोडविले आणि ती वेगाने पळून गेली. शंकरसुद्धा त्या अद्‌भुत कृत्य करणार्‍या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणार्‍या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. कामुक हत्तिणीच्या मागे धावणार्‍या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघवीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले. हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य पृथ्वीवर जेथे जेथे पडले तेथे तेथे सोन्या-चांदीच्या खाणी तयार झाल्या. नद्या, सरोवरे, पर्वत, वने उपवने, तसेच जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आश्चर्य वाटले नाही. कारण भगवंतांच्या शक्तींचा अंत कोणाला लागणार आहे ? भगवंतांनी पाहिले की, भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही, तेव्हा ते पुरुषशरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले. (२६-३७)

भगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा आपण आपल्या मूल रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधीही मोहित करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करून शकत नाही. (३८-४०)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांचा निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणार्‍या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरूपाच्या अंशभूत मायेविषयी असे सांगितले. "देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तू पाहिलीस ना ? मी सर्व कलांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणार्‍या सामान्य जीवांची काय कथा ? जेव्हा मी एक हजार वर्षांच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद यांचे वर्णन करू शकत नाहीत." (४१-४४)

श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परीक्षिता, ज्यांनी समुद्र मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्‍न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ति भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो. (४५-४७)

स्कंध आठवा - अध्याय बारावा समाप्त

GO TOP