श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ११ वा

देवासुर-संग्रामाची समाप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू इत्यादि देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते, त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागले. ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले, तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले. मूर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातचलाखीने त्यांचे धन लुटून नेतो, त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस. जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात, इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरूनसुद्धा खाली ढकलून देतो. अरे मतिमंदा, आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो. (१-६)

बली म्हणाला - जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात, त्या सर्वांनाच जयपराजय, यशापयश किंवा मृत्यू क्रमाने प्राप्त होतोच. म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत. हे तुम्हाला माहीत दिसत नाही ! या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणार्‍या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणार्‍या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. (७-९)

श्रीशुकदेव म्हणतात - वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारले फटकारले. त्यामुळे तो थोडासा वरमला. तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले. सत्यवादी, देवशत्रू बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला. त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीच चिडला. तो पाण‍उतारा त्याला सहन झाला नाही. शत्रुंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला. बलीचा हितचिंतक आणि घनिष्ट मित्र जंभासुर, आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणार्‍याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला. सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. त्याचबरोबर त्या महाबलीने ऐरावतावरसुद्धा गदेचा तडाखा दिला. गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूर्च्छित होऊन पडला. त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे जुंपलेला रथ घेऊन आला. तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला. दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जळजळीत त्रिशूळ त्याच्यावर फेकला. मातलीने मोठ्या धर्याने ते असह्य कष्ट सहन केले. तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडविले. (१०-१८)

देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमुची, बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले. आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात, त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केले. पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणाने रथाचा एकाच प्रयत्‍नात एक एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक अद्‌भुत घटना घडली. नमुचीने, सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात, त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून, इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. इंद्र कुठेच दिसत नाही, हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे, समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापार्‍याची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली. परंतु थोढ्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे, रथ, ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्रातःकाळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश, आणि पृथ्वी उजळून शोभतो, त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. परीक्षिता, त्या आठ धारा असलेया तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली. (१९-२८)

परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जिवापाड प्रयत्‍न करू लागला. "इंद्रा, आता तू वाचत नाहीस !" अशी आरोळी ठोकीत सोन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूल त्याने इंद्रावर फेकला. परीक्षिता, तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता, तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही. ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते, त्या वज्राला मनुचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे, ही मोठीच आश्चर्यकारक घटना घडली. वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही, हे पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की, "सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का ? पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्याफिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत, तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले होते. त्वष्ट्याच्या तपश्चर्येचे सार वृत्रासुररूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने खरचटतही नसे, अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठविले होते. तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले. म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले, तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की, "हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. याला मी वर दिला आहे की, सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ." ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की, समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही. म्हणून इंद्राने ना सुकलेला, ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून ताची स्तुती केली. गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले, देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी, वरुणादी दुसर्‍या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात, तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले. (२९-४३)

नारद म्हणाले - देवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हांला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभवसंपन्नही झालात. म्हणून आता लढाई बंद करा. (४४)

श्रीशुक म्हणतात - देवांनी त्यांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गान करीत होते. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणार्‍या बलीला पराजित होऊनसुद्धा खेद झाला नाही. (४५-४८)

स्कंध आठवा - अध्याय अकरावा समाप्त

GO TOP