श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १० वा

देवासुर-संग्राम -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, जरी दैत्यदानवांनी मोठ्या हुषारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्‍न केले होते, तरीसुद्धा भगवंतांशी विन्मुख असल्याकारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. हे राजन, भगवंतांनी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनिशी देवांवर हल्ला चढवला. इकडे सर्व देवांनी एक तर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती. शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे तेसुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. राजा, क्षीरसागराच्या किनार्‍यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला. हाच देवासुरसंग्राम होय. तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. त्यावेळी शंख, तुतार्‍या, मृदंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. तसेच हत्तींचे चीत्कार, घोड्यांची खिंकाळणी, रथांचे खटखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तेथे मोठाच हलकल्लोळ माजला. रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले. त्यांपैकी काही वीर उंटांवर, हत्तींवर आणि गाढवांवर बसून लढत होते; तर काहीजण गौरमृग, अस्वल, वाघ आणि सिंहांवर बसून लढत होते. काही सैनिक गिधाडे, कावळे, बगळे, ससाणे आणि कोंबडे यांच्यावर बसले होते; तर पुष्कळसे तिमिंगल मासे, चित्ते, रेडे, गेंडे, गौरेडे, गवे आणि रानडुकरांवर स्वार झाले होते. काहीजण तर कोल्हा, उंदीर, सरडे, ससे, मनुष्ये, बकर्‍या, काळवीट, हंस आणि डुकरांवर चढून बसले होते. हे राजा, अशा प्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहणार्‍या तसेच भयंकर दिसणार्‍या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले. (१-१२)

राजा त्यावेळी रंगीबेरंगी ध्वज, शुभ्र छत्रे, रत्‍नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चवर्य़ा आणि वार्‍याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चमकणारी कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यांमुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे, अशा शोभत होत्या. परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळिराज मय दानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तेथे जाणार्‍या विमानावर आरूढ झाला. युद्धाची सर्व सामग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आश्चर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमानसुद्धा करता येत नव्हते, तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे ? त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह वसला होता. त्याच्याजवळ ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र यांमुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची, शंबर, बाण, विप्रचित्ती, अयोमुख, द्विमूर्धा, कालनाभ, प्रहेती, हेती, इल्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रदंष्ट्र, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुभी, तारक चक्राक्ष, शुंभ, निशुंभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिष्टनेमी, त्रिपुराधिपती मय, पौलोम, कालेय आणि निवातकवच वगैरे सेनाविभागप्रमुख होते. हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते. परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले. या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपालले कर्कश आवाजाने शंख वाजवू लागले. जेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला. तेव्हा अनेक झर्‍यांनी शोभणार्‍या उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा वाटत होता. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने, ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरुण इत्यादी लोकपाल येऊन उभे ठाकले. (१३-२६)

दोन्ही सैन्ये एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता. बली इंद्राशी, कार्तिकस्वामी तारकासुराशी, वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंबरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. नमुची अपराजिताशी, अश्विनीकुमार वृषपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले. राहूबरोबर चंद्राचे आणि पुलोमाबरोबर वायूचे युद्ध झाले. भद्रकाशी देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. परीक्षिता, जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवांच्या पुत्रांची लढाई जुंपली. दुर्मर्षाची कामदेवाशी, उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची बृहस्पतीशी आणि नरकासुराची शनैश्चराशी लढाई होऊ लागली. निवातकवचांच्या बरोबर मरुद्‍गणांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा पौलोमाबरोबर विश्वेदेवांचा तसेच क्रोधवशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला. (२७-३४)

अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांबरोबर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, मुद्‍‌गल, आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोढे, रह इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न-भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काहीजणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले, त्यांच्या पायांची आदळ‍आपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीवर खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती की, तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढाईचे मैदान, तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुगुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रगट होत होता. काहीजणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शास्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली. (३५-४०)

राजा बलीने दहा इंद्रावर, तीन ऐरावत हत्तीवर, चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत-हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडून आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली. परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. यानंतर बलीने एकापाठोपाठ एक शूल, भाला, तोमर, आणि शक्ती यातात घेतली. परंतु जे जे शत्र हातात घेई, त्याचे इंद्र तुकडे तुकडे करून टाकी. (४१-४४)

परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या, त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन "मारा, तोडा" असे ओरडत शेकडो नागड्या-उघड्या राक्षसिणी आणि राक्षससुद्धा तेथे प्रगट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना करणे होणे सुरू झाले. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरू होऊन ढतून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वार्‍याच्या सहाय्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रगट झाले. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. त्याज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पीतांबर परिधान केला होता. त्यांच्या आठ हातात आठ आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभ मणी, मस्तकावर अमूल्य मुगुट तसेच कानांमध्ये कुंडले झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात, त्याचप्रमाणे परमात्मा प्रगट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते, हे योग्यच आहे. हे राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडवाहन भगवंतांना आलेले पाहिले, तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुड्याच्या डोक्यावर आपटणार होता. तेव्हढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला मारले. माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडविली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला. परंतु त्याचक्षणी गर्जना करणार्‍या त्याचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडले. (४५-५७)

स्कंध आठवा - अध्याय दहावा समाप्त

GO TOP