|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ९ वा
मोहिनीरूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूंप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृतकलश हिसकावून घेत होते. एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली. ते विचार करू लागले, "किती अनुपम सौंदर्य हे । किती हे तेज । काय हे हिचे नवतारुण्य !" असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले. काममोहित होऊन त्यांनी तिला विचारले, "हे कमलनयने, तू कोण आहेस ? कोठून आलीस ? काय करू इच्छितेस ? हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस ? तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे. आम्ही तर असे समजतो की, आतापर्यंत देव, दैत्य, सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपालांनीसुद्धा तुला स्पर्श केला नसेल ? हे सुंदरी, विधात्याने दया येऊन शरीर धारण करणार्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठविले आहे काय ? हे मानिनी, आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे. म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव. आम्ही सर्वजण कश्यपाचे पुत्र असल्याकारणाने सख्खे भाऊ आहोत. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. म्हणून तू निःपक्षपातीपणे हे आम्हांला असे वाटून दे की, आमच्यात भांडण होणार नाही." असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्रीवेषधारी भगवान किंचितसे हसले आणि सुंदर नेत्रकटाक्ष टाकीत त्यांना म्हणाले. (१-८) श्रीभगवान म्हणाले - आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज कुलटेच्या मागे कसे लागलात ? कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवीत नाही. दैत्यांनो, लांडगे आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही. कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात. (९-१०) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला. नंतर अमृतकलश घेऊन किंचित सिमत हास्य करीत भगवान म्हणाले, "उचित असो वा अनुचित, मी जे काही करीन, ते तुम्हांला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटीन." मोहिनीचे हे बोलणे ऐकून मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातील खुबी समजली नाही. म्हणून सर्वांनी ’ठीक आहे’ असे म्हणून ते मान्य केले. (११-१३) नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हविर्द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गाई, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. जेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या, पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या, भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृतकलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्णनूपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मुख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मीदेवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. जन्मतःच क्रूर असणार्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे; म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्तीत त्यांना बसविले. यानंतर अमृतकलश हातात घेऊन भगवंत दैत्यांजवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेमही होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. म्हणून ते गप्प बसून राहिले. मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिऊन होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता. त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत. (१४-२३) त्याचवेळी राहू दैत्य देवाचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही अमृत प्याला. परंतु त्याचक्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले. अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला ’ग्रह’ बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले, तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणार्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. परीक्षिता, पहा ना ! देव आणि दैत्य दोघांचीही एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूने, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने, एकच कर्म केले होते. परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यांपैकी देवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलरजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यांच्यापासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण, धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर, पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो, ते व्यर्थ होते. कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याचे प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करण्याने ते सर्वांना मिळते. (२४-२९) स्कंध आठवा - अध्याय नववा समाप्त |