श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ८ वा

समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनू प्रगट झाली. हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणार्‍या यज्ञासाठी उपयोगी पडेल, असे पवित्र हविर्द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. नंतर उच्चैःश्रवा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्यासाठी बळीने इच्छा प्रकट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंतांच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे चार दात होते. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजात निघाला. तू ज्या पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता. यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणार्‍या ठरल्या. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ति लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणार्‍या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. तिचे सौंदर्य, औदार्य, तारुण्य, रूप-रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की, ही आपल्याला मिळावी. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यांतून पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गाईंनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्र-वैशाखात मिळणारी सर्व फुलेफळे आणून दिली. ऋषींनी विधिपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगल गान करू लागले. नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या. मेघ देह धारण करून मृदंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्या वेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिली. (१-१६)

ब्राह्मणांनी स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे, तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणार्‍या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरुष आढळला नाही. जो तपस्वी होता, त्याने क्रोधावर विजय मिळविलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते, परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते, परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसर्‍याचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला ईश्वर कसे म्हणायचे ? काहीजण धर्माचे आचरण करणारे होते, परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता, परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते, परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते, ते वर होणार नव्हते. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे, परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे, परंतु त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल गुण ज्याच्या ठायी आहेत, ते मला इच्छित नाहीत. (१७-२२)

असा विचार करून श्रीलक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणार्‍या भगवंतांनाच वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्‌गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत. अणिमादी सिद्धी, त्यांची इच्छा धरतात; परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मीदेवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत. म्हणून तिने त्यांनाच वरले. जिच्याभोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारव करीत आहेत, अशी त्याज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणार्‍या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षःस्थळाकडे पाहात ती त्यांच्याजवळच उभी राहिली. त्रैलोक्यनिर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्रीलक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित गाऊ नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणार्‍या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली, तेव्हा ते निर्बल, आळशी, निर्लज्ज आणि लोभी झाले. (२३-२९)

यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणीदेवी (सुरा) प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. त्यानंतर महाराज, कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यांत लालिमा होता. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पीतांबर परिधान केलेल्या त्याच्या कानांत चमचमणारी रत्‍नकुंडले होती. रुंद छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणार्‍या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक ’धन्वन्तरी’ या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली, तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृतकलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृतकलश घेऊन निघून गेले, तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दीनवाणी दशा पाहून भक्तवांछाकल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, "देवांनो ! तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो." (३०-३७)

परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरू झाले. सर्वजण म्हणू लागले, "मी अगोदर पिणार, अगोदर मी; तू नाही, तू नाही." हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता, त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की, "बंधूंनो, देवांनीसुद्धा आमच्या बरोबरीने परिश्रम केले आहेत. म्हणून त्यांनासुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय." एवढ्यात सर्व युक्त्या जाणणार्‍या भगवंतांनी अत्यंत अद्‌भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाने श्यामल होता. अंगप्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणार्‍या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणार्‍या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यांत भिती तरळत होती. आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगर्‍यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायांतील नूपुर रुणझुण असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनीरूपधारी भगवान दैत्यसेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले. (३८-४६)

स्कंध आठवा - अध्याय आठवा समाप्त

GO TOP