श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ७ वा

समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणार्‍या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. परंतु भगवंतांचे हे कृत्य दैत्यसेनापतींना पसंत पडले नाही. ते म्हणाले, शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे. आम्ही ते पकडणार नाही. आम्ही वेदशास्त्रांचे विधिपूर्वक अध्ययन केले आहे, उच्च कुळात आमचा जन्म झाला आहे आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहेत. असे म्हणून ते गुपचूपपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले. ते पाहून, भगवंतांनी स्मित हास्य करून, वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले. अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृतप्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले. (१-५)

परीक्षिता, जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले, तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला. अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्‍न धुळीस मिळत आहेत, असे पाहून त्यांचे मन खट्टू झाले. सर्वांच्या चेहर्‍यावर उदासीनता पसरली. त्यावेळी भगवंतांनी ओळखले की, ही विघ्नराजाची करामत आहे. म्हणून त्यांनी त्याच्या निवारणाचा उपाय शोधून अत्यंत विशाल व विस्मयकारक कूर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले. भगवंतांची शक्ति अपार असून ते सत्यसंकल्प आहेत. त्यांना अशक्य ते काय ? देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेला पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले. त्यावेळी भगवंतांनी जंबूद्वीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केले होते. परीक्षिता, मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरविण्यास सुरुवात केली, तेव्हा तो भगवंतांच्या पाठीवर फिरू लागला. अनंत शक्तिशाली आदिकच्छप भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खाजविणे वाटत होते. त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढवीत आसुरी शक्तिरूपात त्यांच्यात प्रवेश केला. त्याप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकीनागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला. इकडे पर्वताच्या वर दुसर्‍या पर्वतासारखे होऊन सहस्रबाहू भगवंतांनी आपल्या हातांनी त्याला दाबून धरले. त्यावेळी आकाशात ब्रह्मदेव, शंकर, इंद्र वगैरे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून, देव आणि असुरांच्या शरीरांमध्ये शक्तीच्या व पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्तिसंपन्न केले. आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले. त्यावेळी समुद्र आणि त्यात राहणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली. नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र, मुख आणि श्वासांमधून विषारी आग बाहेर पडू लागली. तिच्या धुरामुळे पौलोम, कालेय, बली, इल्वल इत्यादी असुर निस्तेज झाले. ते असे वाटू लागले की, वणव्याने होरपळून गेलेले जणू सागवान. वासुकीच्या श्वासांच्या फुत्काराने देवांचेसुद्धा तेज फिके पडले. त्यांची वस्त्रे, माळा, श्रेष्ठ कवचे आणि मुखे धुरकट झाली. त्यांची ही दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यवर वर्षाव करून लागले आणि समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले. (६-१५)

अशा रीतीने देव आणि असुर यांनी समुद्रमंथन करून सुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही, तेव्हा स्वतः भगवान समुद्र मंथन करू लागले. मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पीतांबर, कानामध्ये विजेसारखी चमकणारी कुंडले, कपाळावर झुलणारे कुरळे केस, डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती. संपूर्ण जगाला अभय देणार्‍या आपल्या विश्वविजयी भुजांनी वासुकी नागाला पकडून तसेच कूर्मरूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवंत मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले, त्यावेळी ते दुसर्‍या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले. अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरुवातीला हालाहाल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले. त्यामुळे समुद्रातून मासे, मगरी, साप व कासवे भयभीत होऊन वर आली आणि तिमि, तिमिंगल इत्यादि मासे, समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकूळ झाल्या. ते अत्यंत उग्र विष दिशा-दिशांना, वरखाली, सगळीकडे उडू आणि पसरू लागले. या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता. संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांना शरण गेले. भगवान शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते. ते तेथे मुनींना संमत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते. प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रणाम केला. (१६-२०)

प्रजापती म्हणाले - हे देवाधिदेवा महादेवा, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. त्रैलोक्याला भस्म करणार्‍या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे. सार्‍या जगाला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात. म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात; कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे जगद्‌गुरू आहात. हे प्रभो, आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय जेव्हा करता, तेव्हा स्वतःसिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा, विष्णू, शिव अशी नावे धारण करता. आपण स्वयंप्रकाश आहात. कारण आपण परम रहस्यमय ब्रह्मतत्त्व आहात. सर्व प्रकारच्या उच्च-नीच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात. आपणच सर्वांचे आत्मा आहात. अनेक शक्तींच्याद्वारे आपणच जगद्‌रूपाने प्रतीत होता. आपणच जगाचे ईश्वर आहात. सर्व वेद आपल्यापासून प्रगट झाले आहेत; आपणच जगताचे आदिकारण महत्तत्त्व आणि त्रिविध अहंकार आहात. तसेच प्राण, इंद्रिये, पंचमहाभूते, शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात. आपणच काळ, यज्ञ, सत्य, ऋत, आणि धर्म आहात. आपणच ’अ-उ-म’ या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात, असे वेदवेत्ते म्हणतात. सर्वदेवस्वरूप अग्नी आपले मुख आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणार्‍या हे देवा, ही पृथ्वी आपले चरणकमल आहे. आपण अखिल देवस्वरूप आहात. हा काळ आपली गती आहे, दिशा कान आहेत आणि वरुण रसनेंद्रिय आहे. आकाश नाभी आहे, वायू श्वास आहे, सूर्य नेत्र आहेत, आणि पाणी वीर्य आहे. आपला अहंकार उच्च-नीच सर्व जीवांचा आश्रय आहे. चंद्र मन आहे आणि हे प्रभो, स्वर्ग आपले मस्तक आहे. हे वेदस्वरूप भगवन, समुद्र आपले पोट आहे, पर्वत हाडे आहेत, सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत. गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे. हे स्वामी, पाच उपनिषदेच आपली पाच मुखे आहेत. त्यांच्याच पदच्छेदापासून अडतीस कलात्मक मंत्र निघाले आहेत. हे देवा, आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले ’शिव’ नावाचे स्वयंप्रकाश परमार्थतत्त्व आहे. दंभ, लोभ इत्यादी अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे. ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सत्त्व, रज, तम हे आपले तीन नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आपणच आहात. हे गिरिशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्त्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल, एवढेच काय परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रिपुरासुर, कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत, असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यांतून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. जीवन्मुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहतात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहता. म्हणून जे लोक आपल्याला आसक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्टुर आहात असे समजतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत ! या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणार्‍या मायेपासूनही दूर असणार्‍या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादिकांनाही होत नाही; तर ते स्तुती कशी करू शकतील ? आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार ? तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगान केले आहे. आम्ही तर केवळ आपले हे लीलाविहारी रूप पाहात आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या, तरी संसाराचे कल्याण करणासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे. (२१-३५)

श्री शुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणीमात्रांचे सुहृद भगवान शंकर करुणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्‍नीला म्हणाले - (३६)

श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणार्‍या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. आपल्या क्षणभंगुर प्राणांनी सज्जन दुसर्‍यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्याच्यावर सर्वात्मा श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणूने मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो. (३७-४०)

श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणार्‍या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून ते विष पिण्याची तयारी केली. देवींना त्यांचा प्रभाव माहित असल्यामुखे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणिमात्रांना जीवन देणार्‍या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हालाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखविला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणार्‍या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वतःच ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे. (४१-४४)

सर्वांची कामना पूर्ण करणार्‍या देवाधिदेव शंकरांचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप, अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले. (४५-४६)

स्कंध आठवा - अध्याय सातवा समाप्त

GO TOP