|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ६ वा
देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली, तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रगट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत, असे वाटावे. त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी, किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीत, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पीतांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमळ, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नूपुर शोभून दिसत होते. वक्षस्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाला शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले. (१-७) ब्रह्मदेव म्हणाले - ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत गुणांपासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप आनंद आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. हे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही हे आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटीसुद्धा हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्य-कारणापलीकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याप्रमाणे. आपल्या आश्रयाने राहणार्या आपल्या मायेने, आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपणे आपले मन एकाग्र करून या गुणांच्या, विषयांच्या गर्दीमध्येसुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात. जसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गाईपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. हे कमलनाभा, ज्याप्रमाणे वणव्याने व्याकूळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार ? प्रभो ! मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हांला कोठून कळणार ? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे, त्याची आज्ञा आपणच करावी. (८-१५) श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे ब्रह्मदेवादी देवतांनी इंद्रियनिग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली. त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघगंभीर वाणीने त्यांना म्हणाले. सर्व देवतांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते, तरीसुद्धा समुद्रमंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले - (१६-१७) श्री भगवान म्हणाले - ब्रह्मदेव, शंकर आणि देवांनो, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका. यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे. म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. देवांनो, एखादे मोठे कार्य चालवायचे असेल, तर शत्रुंशी सुद्धा सख्य केले पाहिजे. परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करावे. वेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा. ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होते. क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत, वेली, औषधी वनस्पती टाका. नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या साहाय्याने समुद्राचे मंथन करा. या कामात दैत्यांना श्रम, आणि फळ मात्र तुम्हांला मिळेल. देवांनो, तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा. सामोपचाराने जशी सर्व कामे होतात, तशी क्रोधाने होत नाहीत. समुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका. कोणत्याही वस्तूला लोभ धरू नका. इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका. (१८-२५) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, देवांना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्यापुढेच अंतर्धान पावले. नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतास नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर इंद्रादि देव बलिराजाकडे गेले. शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्यसेनापती खवळले. परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणणार्या पुण्यश्लोक बळीने दैत्यांना थांबविले. बळीने तिन्ही लोक जिंकले होते. सर्व संपत्तींनी युक्त आणि असुर सेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता. तेथे देव गेले. बुद्धिमान इंद्राने, स्वतः भगवंतांनी त्याला जे शिकविले होते, ते सर्व मधुर शब्दांत सामोपचाराने बळीला सांगितले. ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली. तेथे बसलेल्या शंबर, अरिष्टनेमी आणि त्रिपुरनिवासी असुर राजांनासुद्धा आवडली. तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली. आणि परीक्षिता, ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले. त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्रतटाकडे घेऊन गेले. त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते. शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता. परंतु तो मंदार पर्वत एक तर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता. त्यामुळे इंद्र बळी वगैरे सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला. तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता. जमिनीवर पडतेवेळी त्याने पुषळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला. (२६-३५) त्या देव आणि असुरांचे हात, पाय आणि खांदे तुटून गेलेच, मनसुद्धा निराश झाले. त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंत तेथे प्रगट झाले. पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली. नंतर त्यांना पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्यासह ते समुद्राकडे निघाले. पक्षिराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला. नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला. (३६-३९) स्कंध आठवा - अध्याय सहावा समाप्त |