श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ५ वा

देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंतांची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्रमोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे. ही मी तुला सांगितली. आता रैवत मन्वंतराची कथा ऐक. पाचव्या मनूचे नाव रैवत होते. चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता. अर्जुन, बली, विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते. राजा, त्या मन्वंतरात इंद्राचे नाव विभू होते; आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते. त्या वेळी हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू इत्यादी सप्तर्षी होते. त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषीच्या पत्‍नीचे नाव विकुंठा होते. त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मीदेवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले. सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे. त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी तिसर्‍या स्कंधात केले आहे. ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केली असेल, तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल. (१-६)

सहावा मनू चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता. पुरू, पुरुष, सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आप्य इत्यादी देवगण होते. त्या मन्वंतरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगत्पती भगवंतांनी त्यावेळी सुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला. (७-१०)

राजाने विचारले - मुनिवर्य, भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले ? कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले ? त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळवले ? आणखी कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळवल्या ? भगवंतांची ही मोठी अद्‌भूत लीला आपण मला सांगा. आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता, तसतसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचे तर नावच नाही. कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे. (११-१३)

सूत म्हणाले - शौनकादी ऋषींनो, श्रीशुकदेवांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले. (१४)

श्रीशुकाचार्य म्हणतात - ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले, त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले. ते पुन्हा उठू शकले नाहीत. दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते. यज्ञ-यागादी कर्मेही लोप पावली होती. हे पाहून इंद्र, वरुण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला. परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले. ब्रह्मदेवांनी पाहिले की, इंद्र, वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत विकट असून असुर आनंदात आहेत. (१५-१९)

श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंतांचे स्मरण केले. नंतर प्रफुल्लित चेहर्‍याने देवांना ते म्हणाले. मी, शंकर, तुम्ही, असुर, दैत्य, मनुष्य, पशु-पक्षी, स्वेदज, वृक्ष, इत्यादी सर्व प्राणी ज्या विराट स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झालो आहोत, त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ. त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला, कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला, तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण, सत्त्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात. यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी सत्त्वगुणाचा स्वीकार केला आहे. हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्याचा आहे. म्हणून आपण सर्वजण त्या जगद्‌गुरू परमात्म्याला शरण जाऊ. ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत. म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ते आमचे कल्याण करतील. (२०-२३)

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, देवांना असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंतांचे निजधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेले. हे राजा, भगवंतांविषयी अगोदर देवांनी ऐकले होते, परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते. म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने वेदवाणीने भगवंतांची स्तुती करू लागले. (२४-२५)

ब्रह्मदेव म्हणाले - भगवन, आपण निर्विकार, सत्य, अनंत, आदिपुरुष, सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान, अखंड तसेच अतर्क्य आहात. मनाच्याही पुढे आपण जाता. वाणी आपले वर्णन करू शकत नाही. सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. आपण प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात. आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत. आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात. सत्य, त्रेता आणि द्वापार यांमध्ये आपण अवतार घेता, म्हणून त्रियुग आहात. आम्ही आपणास शरण आहोत, हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे. दहा इंद्रिये आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आरे आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून याचा परिघ आहे. स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे. स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा. तेच एकमेव सत्य आहेत. आम्ही त्यांना शरण आहोत. जे एकमात्र ज्ञानस्वरूप, प्रकृतीच्या पलीकडचे तसेच अदृश्य आहेत, जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश, काल किंवा वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही, तेच प्रभू या जीवाच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असतात. विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात. ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे, तिला कोण तरून जाऊ शकणार ? परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात, त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो. आम्ही व ऋषी ज्यांच्या प्रिय सत्त्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत, तरीसुद्धा त्यांच्या आतबाहेर व्यापून असणार्‍या सूक्ष्म स्वरूपाला जाणत नाही. तर मग रजोगुण आणि तमोगुणप्रधान असुरादी त्यांना कसे जाणू शकतील (२६-३१)

स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत. या पृथ्वीवर जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्‍‌भिज असे चार प्रकारचे प्राणी राहतात. ते परम स्वतंत्र, परम ऐश्वर्यशाली, पुरुषोत्तम परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होवोत. हे परम शक्तिशाली पाणी त्यांचे वीर्य आहे. यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात, वाढतात आणि जिवंत राहतात. ते परम ऐश्वर्यशाली परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होवो. श्रुती सांगतात, देवांचे अन्न, बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे. तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृद्धी करणारा आहे. अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होवोत. सर्वज्ञ अग्नी प्रभूंचे मुख आहे. यज्ञ-यागादी कर्मकांडासाठी याचा जन्म झाला आहे. हा अग्नीच शरीरात जठराग्निरूपाने आणि समुद्रात वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न, पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो. असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्याच्या द्वारे जीव देवयानमार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो, जो वेदांची साक्षात मूर्ती आणि भगवंतांचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे, जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे, असा सूर्य ज्यांचा नेत्र आहे, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या प्राणापासूनच चराचराचा प्राण तसेच मानसिक, शारीरिक आणि इंद्रियसंबंधी बळ देणारा वायू प्रगट झाला आहे. ते चक्रवर्ती सम्राट आहेत, तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबुन आहोत, असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या कानांपासून दिशा, हृदयापासून इंद्रियगोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे, जे प्राण, इंद्रिये, मन, उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या बलापासून इंद्र, प्रसन्नतेपासून सर्व देवगण, क्रोधापासून शंकर, बुद्धीपासून ब्रह्मदेव, इंद्रियांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या वक्षःस्थळापासून लक्ष्मी, सावलीपासून पितृगण, स्तनापासून धर्म, पाठीपासून अधर्म, डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेतून अप्सरा प्रगट झाल्या आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद, ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय, वैश्य हे जांघा आणि वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या खालच्या ओठापासून प्रीती, नाकापासून कांती, स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम, भुवयांपासून यम आणि डोळ्याच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. शास्त्र असे सांगते की, पंचमहाभूते, काल, कर्म, सत्त्वादि गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत, जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान ’नेति नेति’ शब्दांनी ज्यांचे वर्णन करतात, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. जे मायेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृत्तींमध्ये आसक्त होत नाहीत, जे वायूप्रमाणे समान व असंग आहेत, त्या आपल्या आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असोत. (३२-४४)

प्रभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावे असे आम्ही इच्छितो. तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हांस दाखवावे. प्रभो, आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हाला कठीण असणारी कामे सहज करता. विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत, त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते, किंवा मिळतही नाही. परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात, ती मात्र आनंददायक आणि सफल असतात. भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही. कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्मा आहेत. झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्याच्या फांद्या आणि डहाळ्यांनाही पाणी देणे होय. त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंतांची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या अत्म्याचीसुद्धा आराधना होय. ज्यांच्या लीलांचे रहस्य तर्काच्या पलीकडचे आहे, जे स्वतः गुणांच्या पलीकडे राहूनसुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत, तसेच सध्या सत्त्वगुणामध्ये स्थित आहेत, अशा अनंत असणार्‍या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत. (४५-५०)

स्कंध आठवा - अध्याय पाचवा समाप्त

GO TOP