|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ४ था
हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] म्हणतात - त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषी आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू-गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी "हुहु" नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न, आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे, अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहात असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला. (१-५) भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले. तो पीतांबरधारी आणि चतुर्भुज झाला. पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रद्युम्न एकदा मलयपर्वतावरील आश्रमात राहात होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तेथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. त्यांनी राजाला शाप दिला की, "हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे. म्हणून याला नीच अज्ञानी-हत्तीची योनी प्राप्त होवो. (६-१०) श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यांसह तेथून निघून गेले. हे आपले प्रारब्धच होते, असे इंद्रद्युम्नाने मानले. यानंतर स्वतःचे विस्मरण घडविणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपला पार्षद बनविले. गंधर्व, सिद्ध, देवता त्यांच्या या लीलेचे गायन करू लागले. नंतर पार्षदरूप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठ धामाकडे गेले. हे कुरुश्रेष्ठ परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकविली. ही कथा ऐकणार्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल. म्हणूनच आपले कल्याण इच्छिणारे द्विजगण दुःस्वप्न इत्यादीच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन याचा पाठ करतात. हे कुरुश्रेष्ठा, गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्वव्यापक तसेच सर्वभूतस्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला सांगितले. (११-१६) श्रीभगवान म्हणाले - जे लोक पहाटे उठून इंद्रियनिग्रह करून, एकाग्र चित्ताने माझे, तुझे तसेच हे सरोवर, परव, गुहा, वन, वेत, वेळू आणि बांबू यांची बेटे, येथील दिव्य वृक्ष, माझे, ब्रह्मदेवाचे आणि शंकराचे निवासस्थान असलेली ही शिखरे, माझे प्रिय ठिकाण क्षीरसागर, प्रकाशमय श्वेतदीप, श्रीवत्स, कौस्तुभमणी, वनमाला, माझी कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, पक्षिराज गरुड, माझा सूक्ष्म अंश असणारा शेष, माझ्या आश्रयाने राहणारी लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रह्लाद, मत्स्य, कच्छप वराहादी अवतारात मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला, सूर्य, चंद्र, अग्नी, ॐकार, सत्य, मूलप्रकृती, गाय, ब्राह्मण, अविनाशी सनातनधर्म, सोम, कश्यप आणि धर्माच्या पत्न्या दक्षकन्या, गंगा, सरस्वती, अलकनंदा, यमुना, ऐरावत हत्ती, ध्रुव, सप्त ब्रह्मर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील, त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल. कारण ही सगळी माझीच रूपे आहेत. हे गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील, त्यांना मृत्युसमयी मी निर्मळ बुद्धी देईन. (१७-२५) श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले. (२६) स्कंध आठवा - अध्याय चौथा समाप्त |