|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ३ रा
गजेंद्राकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंतांची स्तुती करू लागला. (१) गजेंद्र म्हणाला - जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञरूपात विराजमान आहेत, तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे हे विश्व चेतनस्वरूप आहे, त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेने प्रेरीत होते, ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे, हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे, ते कधी प्रतीत होते तर कधी नाही; परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते, जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्वांना पाहतात, जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत, प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यावेळी लोक, लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात, त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहतो. परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात, ते प्रभू माझे रक्षण करोत. जे नटाप्रमाणे अनेक वेष धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग सामान्य प्राणी कसा जाणील ? ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे, ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात, तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे, असे जाणून सर्वांचे कल्याण करतात, त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत. तेच माझी गति होत. ज्यांना जन्म-कर्म, नाम-रूप नाही, की ज्यांच्यात गुण-दोष नाहीत. असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात. त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्यसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. माझा त्यांना नमस्कार. स्वयंप्रकाश, सर्वांचे साक्षी अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन, वाणी आणि चित्त यांना कळत नाही, त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. (२-१०) विवेकी पुरुष कर्मसंन्यास किंवा कर्मसमर्पणाच्या द्वारे आपले अंतःकरण शुद्ध करून ज्यांना प्राप्त करतात, तसेच जे स्वतः नित्यमुक्त, परमानंद व ज्ञानस्वरूप असून दुसर्यांना कैवल्यमुक्ति देणारे आहेत, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. जे सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या धर्मांचा स्वीकार करून अनुक्रमे शांत, घोर आणि मूढ अवस्था सुद्धा धारण करतात, त्या भेदरहित स्वभावाने स्थित असणार्या ज्ञानघन प्रभूंना मी वारंवार नमस्कार करतो. आपण सर्वांचे स्वामी, सर्व क्षेत्रांना जाणणारे आणि सर्वसाक्षी आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. आपण स्वतःच आपले कारण आहात. पुरुष आणि मूळ प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणच आहात. आपणास माझे वारंवार नमस्कार. आपण सर्व इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचे साक्षी आहात, सर्व प्रचीतींचे आधार आहात. अहंकार इत्यादि भासमान असत् वस्तूंतून आपलेच अस्तित्व प्रगट होते. सर्व वस्तूंच्या सत्तेच्या रूपातसुद्धा केवळ आपलाच भास होत आहे. मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण सर्वांचे मूळ कारण आहात’ पण आपले कोणी कारण नाही. आपण सर्वांचे विलक्षण कारण आहात. आपणांस माझा वारंवार नमस्कार असो. जसे सर्व नद्या, झरे, इत्यादींचा अंतिम आधार समुद्र आहे, तसेच आपण सर्व वेद आणि शास्त्रांचे मुख्य आधार आहात. आपण मोक्षस्वरूप आहात आणि सर्व भक्तांची परम गती आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. ज्याने त्रिगुणरूप अरणीमध्ये ज्ञानरूप अग्नी गुप्त ठेवला आहे आणि त्या गुणांमध्ये क्षोभ निर्माण करून त्यांच्याद्वारा विविध प्रकारची सृष्टी रचण्याचा ज्याने संकल्प केला, जे लोक आत्मचिंतनाने वेदाने सांगितलेल्या विधिनिषेधांच्या पलीकडे जातात, त्यांच्या अंतःकरणात जे स्वतःच प्रकाशित होतात, त्या तुम्हांला मी नमस्कार करतो. (११-१६) जाळ्यात अडकलेल्या पशूला सोडवावे, त्याप्रमाणे आपण माझ्यासारख्या शरणागताचा संसारपाश तोडून त्याला मुक्त करता. याबाबतीत आपल्याला आळस नाही. आपण नित्यमुक्त आहात, परम करुणामय आहात. आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात आपल्या अंशाने अंतरात्म्याच्या रूपामध्ये उपलब्ध होत असता. आपण सर्व ऐश्वर्यांनी पूर्ण तसेच अनंत आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. जे लोक शरीर, पुत्र, बांधव घर, संपत्ती आणि स्वजनांमध्ये आसक्त आहेत, त्यांना आपली प्राप्ती होणे कठीण आहे. आपण गुणांच्या पलीकडे आहात. जीवन्मुक्त पुरुष आपल्या हृदयात आपले निरंतर चिंतन करीत असतात. त्या सर्व ऐश्वर्यपूर्ण ज्ञानस्वरूप भगवंतांना मी नमस्कार करतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या इच्छेने मनुष्य ज्यांचे भजन करून आपले इष्ट ध्येय प्राप्त करून घेतो. इतकेच नव्हे तर जे त्याला सर्व प्रकारचे सुख देऊन अविनाशी पार्षद शरीरसुद्धा देतात, तेच परम दयाळू प्रभू मला मुक्त करोत. ज्यांचे अनन्य भक्त त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरीत नाहीत. उलट त्यांच्या परम दिव्य मंगलमय लीलांचे गायन करीत आनंद समुद्रात डुंबत राहतात, जे अविनाशी, सर्वशक्तिमान, अव्यक्त, इंद्रियातीत आणि अत्यंत सूक्ष आहेत, जे अत्यंत जवळ असूनसुद्धा अतिशय लांब आहेत, असे वाटते, जे ज्ञानयोगाने प्राप्त होतात, त्या आदिपुरुष, अनंत, तसेच परिपूर्ण परब्रह्म परमात्म्यांची मी स्तुती करीत आहे. (१७-२१) ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली, जसे धगधगणार्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश प्रमात्म्यापासून बुद्धी, मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादे गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा, देव नाही, असुर नाही, मनुष्य नाही, नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहते, तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवोत. मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून, बाहेरून, सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा ? आत्मप्रकाश झाकणार्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे. जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात, विश्वरूप सामग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रह्म परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे. त्या अजन्मा परमपदस्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. योगी लोक योगाच्या द्वारे कर्म, कर्म-वासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. प्रभो ! सत्त्व, रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिये आणि मनाच्या विषयांच्या रूपामध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत, त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ति अनंत आहे. आपण शरणागतवत्सल आहात, आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो. आपल्या मायेच्या अहंबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, अशा भगवंताना मी शरण आलो आहे. (२२-२९) श्रीशुक म्हणतात - गजेंद्राने नामरूपरहित भगवंतांची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रूपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादि देव त्याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी स्वतः प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी, गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे, असे पाहून चक्रधारी भगवान, वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता, तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तेथे आले. शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्राला पकडून ठेवले होते, त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन, हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, "हे नारायणा, जगद्गुरो, भगवन्, आपणास नमस्कार असो." गजेंद्राला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले, तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्राला सोडविले. (३०-३३) स्कंध आठवा - अध्याय तिसरा समाप्त |